राष्ट्रीय मीडिया महासम्मेलन आणि मुद्दे…
‘जमीं बेच देगें, गगन बेच देगें,
कली बेच देगें, सुमन बेच देगें,
अगर कलम के पुजारी सो गये,
तो वतन के पुजारी वतन बेच देंगे…’
भारतात प्रसारमाध्यमे अर्थात वृत्तपत्रे, मासीक व टीव्ही न्यूज चॅनल्स (मीडिया) जोमात आहेत. त्यात सोशल मीडियाची मोठी भर पडली आहे. भारतीय राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलमानुसारच प्रसार माध्यमेही स्वतंत्र आहेत. परंतु ही स्वतंत्रता उपभोगतांना काही जबाबदारी किंवा कर्तव्ये असली पाहिजेत, त्याकडे मात्र प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष आहे. हे दूर्लक्ष सहज झालेले नाही तर प्रामुख्याने ‘अर्थपूर्ण’ आहे. म्हणूनच मीडियामध्ये मुल्ये, नैतिकता, आदर्श, सिध्दांत, जबाबदारी, बांधिलकी, जनहित आणि मानवहित राहिले नाही, अशी ओरड होत आहे. त्यामुळेच ‘जो कभी छपकर बिकता था अखबार, सुना है आजकल बिककर छप रहा है’, असे उघड उघड बोलल्या जात आहे. वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्सने राजकीय पक्ष, बडे राजकारणी, उद्योग घराणे व सरकार यांचेशी साटेलोटे केल्याचा हा आरोप आहे. पैसे कमविण्याच्या लालसेपोटी मीडिया ही ‘सेवा’ नव्हे तर व्यवसाय झाला असून जगातील पहिल्या सात नफा देणार्या उद्योगामध्ये ‘मीडिया’ चा समावेश झाला आहे. त्यामुळे मीडियाचे वागणे चूक की बरोबर तसेच नैतिक की अनैतिक हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे ताकदवार असलेला व सत्ता गाजविणारा हा मीडिया आपले तर्क मांडतांना म्हणतो, जेव्हा समाजात सर्वच क्षेत्रातील मुल्यांचा, नैतिकतेचा र्हास होत आहे, राजकारण पासून वैद्यकीय व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्रापर्यंत पैसे कमविण्याची स्पर्धा सुरु आहे, तेव्हा पत्रकारांकडूनच त्यागी, तपस्वी, आणि साधु-संत राहण्याची अपेक्षा का केली जावी? परंतु या तर्काचा आधार घेऊन मीडियाने अनैतिकतेला समर्थन व समर्पण करणे, हे कुठपर्यंत उचीत ठरेल? हा खरा प्रश्न आहे. मागे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, आता वाचकांची तक्रार आहे की, ‘पत्रकार त्यांचा विश्वासघात करतात, ते पैसे कमविण्याच्या नादात आहेत. त्यामुळे विचार करायला हवे, आणि या रंगात न रंगता देशहिताचा विचार केला पाहिजे’.
उपरोक्त सर्व मुद्दे ब्रह्माकुमारीजद्वारा आयोजित माऊंट अबू येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. देशभरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील शेकडो संपादक, अनेक मालक, ज्येष्ठ, पत्रकार, टीव्ही पत्रकार व संचालक आणि देशभरातील विविध पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रोफेसर असे सुमारे ३०० पत्रकार या महासम्मेलमध्ये सहभागी झाले होते. ब्रह्माकुमारीजची मीडिया विंग गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत असून मीडियामध्ये मुल्यनिष्ठ पत्रकारिता व्हावी, यासाठी दरवर्षी दोन मीडिया संमेलन घेऊन हजारो पत्रकारांना एकत्रित करते तर चर्चा, मार्गदर्शन उपलब्ध करुन देते. दिनांक ५ ते ९ मे २०२३ दरम्यान राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनात ‘राष्ट्रविकासात प्रसार माध्यमांची जबाबदारी’ अंतर्गत ‘मीडिया : नैतिक मुद्दे – समाधान’, सोशल मीडियाचे फायदे व नुकसान, मीडियाची विश्वासहर्ता, आदीसह विविध बारा विषयांवर चर्चा व प्रबोधन झाले.
या सम्मेलनात प्रसारमाध्यमे ही काळाची गरज आहे, काळानुरुप पत्रकारिता बदलत आहे, असंवेदनशील होत असलेली पत्रकारिता दबावात, दहशतीत आहे, असे मत मांडतांना मीडियाची सत्ता आहे, ताकद आहे, सर्वच काही खराब झालेले नाही, पत्रकारांनी स्वत: प्रयत्न करुन काही निर्बंध घातले पाहिजेत, चांगल्या गोष्टीबाबत आग्रही असले पाहिजे, असा सूर उपस्थित वक्त्यांनी काढला. तसेच प्रसार माध्यमांनाही आचारसंहिता असावी, यासाठी मागील काळात प्रयत्न झाले ते नव्याने करण्याची गरज व्यक्त झाली. सन १९६६ मध्ये स्थापन प्रेस कॉन्सीलच्या कलम १३ ब नुसार आचारसंहिता झाली नाही, अ.भा. संपादक परिषदेने केलेली ‘आचार निती’ त्यांच्या घटनेपुरती मर्यादित राहीली, तर १७ संपादकांनी ८ जानेवारी १९७६ रोजी राज्यसभेत लेखी दिले. त्याचेही पुढे काही झाले नाही. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिझम ऑल इंडिया स्मॉल मीडियम न्यूज पेपर असोसिएशनने प्रयत्न केले, मात्र आमसभेत मान्यता मिळाली नाही. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी गांधीवादी आचारसंहिताचा विचार मांडला, त्याबाबत सप्टेंबर १९८३ च्या ‘इंडिया टूडे’मध्ये लेख लिहिला. २१ कलमांची आचारसंहिता मांडली. तसेच ३ डिसेंबर १९८३ रोजी ‘द एकॉनॉमिक्स टाईम्स’ ने ‘कोड फॉर द प्रेस’ पुरवणी काढली, मात्र आचारसंहितेची चर्चाच होत राहीली. प्रत्यक्षात काही झाले नाही.
तेव्हा आचारसंहितासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज असून त्यामध्ये प्रसार माध्यमांची जबाबदारी, स्वातंत्र्य, स्वावलंबन, सत्य आणि प्रामाणिकपणा, नि:पक्षता, न्याय भूमिका व सभ्यता आदी मुद्द्यांचा समावेश असावा, असाही सूर निघाला. परंतु बंधने कुणालाही नको असतात, त्यामुळे या दिशेने पुढे काही होईल, असे वाटत नाही.
शेवटी मीडियाने नैतिकता न सोडता, समाजहितासाठी कठोर भूमिका घ्यावी व ठणकावून सांगावे, या आशयाचा शेर आठवतो….
मै आईना हूँ, मेरी अपनी जिम्मेदारी है,
जिस किसी को पसंद ना हो, वो सामने से हट जाये।
- - राजेश राजोरे
खामगाव, जि. बुलडाणा.