बारामतीच्या उद्योजकाचा सन्मान — पंढरीनाथ कांबळे यांना आंत्रप्रेन्युअर अवॉर्ड..!
बारामती (ता. ३०) –
बारामती एमआयडीसीतील हर्षल इंडस्ट्रीज अँड पावडर कोटिंग सोल्युशनचे संचालक पंढरीनाथ श्रीरंग कांबळे यांना ३२ व्या आंत्रप्रेन्युअर दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात आंत्रप्रेन्युअर अवॉर्डने गौरविण्यात आले.
हा भव्य कार्यक्रम आंत्रप्रेन्युअर इंटरनॅशनल क्लब, पुणे यांच्या वतीने मंगळवारी (दि. २९) पार पडला. या प्रसंगी मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, क्लबचे सुनील थोरात, राजेंद्र जाधव, सुभाष माहीमकर, तसेच बारामती आंत्रप्रेन्युअर क्लबचे चेअरमन प्रमोद काकडे, संजय थोरात, सचिन माने, संजय खटके, अरुण म्हसवडे, राजेंद्र साळुंखे, सुनील गोळे, नरेश तुपे, अनिल काळे, शरद भोसले, अनिल फडतरे, संजय गोलांडे, सुधीर उमाप, सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योगजगतातील योगदानाची दखल
गेल्या २१ वर्षांपासून पंढरीनाथ कांबळे यांनी बारामती परिसरात उद्योजक घडविण्याचे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे, तज्ज्ञ व्याख्यानांचे आयोजन करण्याचे, औद्योगिक सहलीचे नियोजन करण्याचे आणि बारामती आंत्रप्रेन्युअर क्लब मजबूत करण्याचे मोलाचे कार्य केले आहे. या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानामुळे वाढली जबाबदारी
पुरस्कार स्वीकृतीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना कांबळे म्हणाले,
“या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे. आता नवनवीन शासनाच्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपक्रम राबविणार आहे.”
या सन्मानामुळे बारामतीच्या औद्योगिक विश्वात नवा उत्साह निर्माण झाला आहे.


