बारामतीचे अरुण जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कामगार सेलच्या सहसचिव पदी निवड
बारामती, दि. 30 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या संघटनात्मक बळकटीस नवे पंख देत बारामतीतील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते, कामगारांचे खंदे हक्काचे लढवय्ये श्री. अरुण सटवा जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या सहसचिव पदी प्रतिष्ठेची निवड झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष श्री. शिवाजी रामचंद्र खटकाळे यांच्या शुभहस्ते श्री. जाधव यांना अधिकृत निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर फॅक्टरीपासून सुरुवात करून कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारा हा धडाडीचा नेता आज पुणे जिल्ह्यापासून राज्य पातळीवर पोहोचला आहे. शेकडो मजुरांना न्याय मिळवून देणारे, सातत्याने संघर्ष करणारे आणि संघटन बांधणीसाठी अहोरात्र झटणारे श्री. जाधव यांचा हा सन्मान पक्षाने केला आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आनंदोत्सवाचे वातावरण होते. मित्रपरिवार, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुष्पहार, शुभेच्छा व गजरात श्री. जाधव यांचे भव्य स्वागत केले. “अभिनंदनाचा वर्षाव” होत असताना संपूर्ण परिसर टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला.
निवडीनंतर भावना व्यक्त करताना श्री. अरुण जाधव म्हणाले –
“पक्ष संघटनेच्या वाढीसाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. कामगार, मजूर व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हाच माझा ध्यास राहील.”
या निवडीमुळे बारामती तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पक्ष संघटनेला नवे बळ, नवी ऊर्जा आणि लढाऊ कार्यकर्त्यांचा हातभार लाभल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

