बारामतीकरांना सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांची ग्वाही

0
90

बारामतीकरांना सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांची ग्वाही

बारामती शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणार – पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका

बारामती | प्रतिनिधी
बारामती शहरातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च प्राधान्य देत मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच बारामतीचा नावलौकिक राज्य व देशपातळीवर वाढवण्यासाठी माझ्यासह सर्व सहकारी नगरसेवक मनापासून काम करतील, अशी ठाम ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.

गुरुवार, दि. 1 रोजी बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली विकासात्मक भूमिका सविस्तरपणे मांडली. यावेळी मुख्याधिकारी पंकज भुसे, सहकारी नगरसेवक, नगरसेविका व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
जनतेने दिलेला विश्वास माझ्यासाठी सन्मान आणि जबाबदारी – सचिन सातव
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले,
“बारामतीच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, पण त्याचबरोबर ती एक मोठी जबाबदारीही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांचे बारामतीला देशातील सर्वांगीण सुंदर शहर करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक जिवाचे रान करू.”
“अजित दादांनी दिलेल्या संधीचे सोने करत पुढील पाच वर्षे अहोरात्र झटून काम करू,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य
नगराध्यक्ष सातव यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांनाच सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. त्यामध्ये –
स्वच्छता व्यवस्था
पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी
खड्डेमुक्त व दर्जेदार रस्ते
नव्या उपनगरांमध्ये भुयारी गटार योजना
घनकचरा व्यवस्थापन
पार्किंग समस्येवर ठोस उपाय
आरोग्य व शिक्षण सुविधा
या सर्व बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
डिजिटल सेवा, पारदर्शक प्रशासन आणि जलद निर्णय प्रक्रिया
नगराध्यक्ष सातव म्हणाले की,
“अधिकाधिक डिजिटल सेवा, पारदर्शक प्रशासन आणि जलद निर्णय प्रक्रिया हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.”
नागरिकांना घरबसल्या तक्रारी मांडता याव्यात यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रशासनात तंत्रज्ञान व एआयचा (AI) वापर करून मानवी हस्तक्षेप कमी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीर्घकालीन व्हिजन : सर्व प्रभागांचा समतोल विकास
बारामती शहराचा विकास करताना समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन, प्रत्येक प्रभागातील गरजांनुसार विकासकामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“समतोल विकास व्हावा, हे अजित दादा पवार यांचे स्वप्न असून, बहुसंख्य नागरिकांना फायदा होईल अशाच योजना प्राधान्याने राबवण्यात येतील,” असे सचिन सातव म्हणाले.
झोपडपट्टीमुक्त बारामतीसाठी प्रयत्न
बारामती शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले.
युवकांचा विकासात सक्रिय सहभाग
देशाच्या जडणघडणीत युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत नगराध्यक्ष सातव म्हणाले,
राष्ट्रीय छात्रसेना (NCC)
राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
स्काऊट-गाईड
इतर सामाजिक उपक्रम
यांच्या माध्यमातून युवक-युवतींना बारामतीच्या विकासात अधिकाधिक सहभागी करून घेतले जाईल.
महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य; स्वयंरोजगार व प्रशिक्षणावर भर
महिलांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले,
“महिला नगरसेविकांच्या मदतीने प्रत्येक प्रभागात भेटी देऊन महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील.”
महिलांना स्वयंरोजगार, कौशल्य प्रशिक्षण व सक्षमीकरणासाठी खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांशी थेट संवाद; दारे कायम खुली
नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले की,
प्रत्येक प्रभागात स्वतः फिरून नागरिकांशी थेट संवाद
तक्रारींची शास्त्रशुद्ध नोंद व वेळेत निराकरण
नागरिकांसाठी नगराध्यक्षांचे दार कायम खुले
अशी प्रशासनाची भूमिका राहील.
राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम
“निवडणूक संपली असून आता राजकारण बाजूला ठेवून बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
नागरिकांनाही सहभागाचे आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपेक्षेनुसार इंदूरच्या धर्तीवर बारामती देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर व हरित शहर व्हावे, यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.
स्वच्छता राखणे
अधिकाधिक वृक्षारोपण
शहर सुशोभीकरणात सहभाग
लोकसहभाग वाढवणे
यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
“बारामतीकरांच्या सर्व सूचनांचे स्वागत”
“पुढील पाच वर्षांत बारामतीकरांची साथ मला आणि माझ्या सर्व नगरसेवकांना मिळावी, हीच अपेक्षा आहे. बारामतीच्या विकासासाठी नागरिकांनी पुढे येऊन हातभार लावल्यास त्यांचे मनापासून स्वागत करू,” असे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी पत्रकार परिषदेत सांगून आपल्या भाषणाचा समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here