‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा’ युद्धपातळीवर तयार करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
पुणे, दि. ११ : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिकस्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जल पर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, परिपयर्टन, ग्रासलँड सफारी आदीबाबींचा विचार करुन सर्वसमावेशक, पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा’ युद्धपातळीवर तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित एकत्रित पर्यटन विकास आराखडाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप वनसंरक्षक तुषार चव्हाण, महादेव मोहिते, अमोल सातपुते, पर्यटन उपसंचालक शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दानी आदी उपस्थित होते.
श्री. डूडी म्हणाले, पर्यटन विकास आराखड्यात संगणकीकृत पायाभूत सुविधेच्या माध्यमातून पर्यटकांना पर्यटनस्थळावरील प्रवेश शुल्क, निवासव्यवस्था, अल्पोहार, भोजनालय, पिण्याचे पाणी, थांब्याचे ठिकाण, शौचालय आदीसुविधांबाबत सर्व प्रकारची माहिती मिळाली पाहिजे. पर्यटनस्थळाला देश विदेशातील अधिकाधिक पर्यटक भेट देतील, येणाऱ्या पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध होतील, यादृष्टीने प्रत्येक बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे. देशातील इतर राज्यात करण्यात येणाऱ्या पर्यटन महोत्सवाचा अभ्यास करावा, याकरीता नामांकित वास्तुविशारद, पर्यटनक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.
या बैठकीत जिल्ह्यातील पयर्टनस्थळे निश्चित करण्यात आली होती, त्यादृष्टीने इको टुरिझम, साहसी खेळ, स्थानिकांना रोजगार, स्थानिक लोकपंरपरा, साहित्य, कला, संगीत, नाट्य तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बाबींवरही बाबींवर चर्चा करण्यात आली.
