
पुढे धोका आहे
वातावरणात तणाव आहे
चौकामध्ये जमाव आहे
हा सत्तेसाठी डाव आहे
मित्रा,धोक्यात गाव आहे.
वनव्यासारखी दंगल पेटेल
प्रत्येक हाताला काम भेटेल
निवडणुका रंगतील
धर्माला पंख फुटतील
तू तुझी जात उंबऱ्यात
मी माझी जात घरात ठेवायची
ही गिधाडांची धाव आहे
मित्रा,धोक्यात गाव आहे.
धर्माची शाल पांघरून
ते मतांचा जोगवा मागतील
ते तुला भडकवतील
ते मला पेटवतील
पण,
तू माझा हात घट्ट धर
मी तुझा हात घट्ट धरीन
ही नुसतीच कावळ्यांची
काव काव आहे
मित्रा,धोक्यात आपला गाव आहे.
मित्रा आपण आपला गाव बघू
आपण आपला देश बघू
लोकशाही वाचवू
संविधान टिकवू
महापुरुषांना जात कधीच नव्हती
एवढं कायम लक्षात ठेवू
आता सभा होतील
प्रचार होतील
रस्त्याच्या बाजूला बॅनर लागतील
त्या बॅनरवर एक एक बोका आहे
आपण जपून चालत राहू
कारण पुढे धोका आहे …
पुढे धोका आहे …
पुढे धोका आहे…
कवी. दंगलकार नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली.
070209 09521 (व्हाट्सअप्प वर प्रतिक्रिया देऊ शकता)
शेअर कराच.गरजेचं आहे.