पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला

0
109

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला

पुणे, दि. १२: पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ग्रामीण भागातील गरीब कारागिरांसाठी महत्वाची असून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी आहे; या योजनेचा लाभ समाजातील गरीब, होतकरु कारागिरांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि पुणे जिल्हा ग्रामोद्योग सहकारी फेडरेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह वानवडी येथे रविवारी (१० मार्च) आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची कार्यशाळा व जनजागृती मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा ग्रामोद्योग सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव आदमाने, बलुतेदार ग्रामोद्योग फेडरेशनचे पदाधिकारी, संस्थाध्यक्ष, संचालक तसेच ग्रामीण कारागीर उपस्थित होते.

श्रीमती विमला म्हणाल्या, अवजारे, साधनांचा वापर करुन हाताने काम करणाऱ्या पारंपरिक बलुतेदार व हस्तकलेच्या कारागिरांना स्वत:ची ओळख प्राप्त करुन देण्याबरोबरच त्यांना आधार देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेला ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून लाभार्थी सामान्य सुविधा केंद्रावर आपल्या नावाची नोंदणी करीत आहेत.

नावनोंदणी न केलेल्या कारागिरांनी लवकर नाव नोंदणी करावी. याकरीता आधार कार्ड, शिधापत्रिका, बँक पासबुक व आधारकार्डशी संलग्न भ्रमणध्वनीची आवश्यकता आहे. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना योजनेचे ओळखपत्र, कौशल्य वृद्धीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, ५०० रुपये प्रतिदिन विद्यावेतनासह १५ हजार रुपयांचे टुलकिट मिळणार आहे. लाभार्थ्यांना १ लाख रुपयाचा पहिला हप्ता त्यांनतर २ लाख रुपयांचा दुसरा हप्ता असा ५ टक्के व्याजदराने वित्तीय संस्थेमार्फत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे,

असेही त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here