निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करा- विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा

0
27

निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करा- विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा

पुणे, दि.१२: मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, निवडणूक निरीक्षक मानवेश सिंह सिद्धू, ललीत कुमार, भीम सिंह, पीगे लिगू, संजीव कुमार, के हिमावती, अरुंधती सरकार, गार्गी जैन, एम गौतमी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्षाच्या समन्वयक ज्योती कदम, जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे प्रत्यक्ष उपस्थित होते.

श्री. मिश्रा म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाई करताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. मतदान केंद्रांमधील नियोजन, पोलीस प्रशासनाची तयारी, वाहतूक नियोजन, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन आदी बाबींचा आढावा घेतला. पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करतानाच निवडणुकीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विभागातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला आहे. सी-व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यात येते. निवडणुकीत पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदी बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), आदर्श आचारसंहिता कक्ष (एमसीसी) पथकांद्वारे चांगले काम करण्यात येत आहे.

श्री. फुलारी म्हणाले, आंतरराज्य सीमेवर असणारे कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. यामध्ये पैसा, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदी बाबींच्या अनुषंगाने तपासणी केली जात आहे, यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहील, असेही श्री. फुलारी म्हणाले.

डॉ. दिवसे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांनी मतदारांना कोणताही त्रास न होता मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

बैठकीनंतर श्री. मिश्रा यांनी माध्यम कक्षाला भेट देऊन विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे यांनी कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here