दंगलीची मानसिकता धोक्याची…दंगे क्यों होते हैं?

0
180

दंगलीची मानसिकता धोक्याची…

ये दंगे क्यों होते हैं?
सवाल बडा ही अजीब है,
फिर याद आया…
चुनाव भी तो करीब है।

   महाराष्ट्रात काही महिन्यातच निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी जातीय व धर्मीय तेढ निर्माण होऊन ठिकठिकाणी दंगली झाल्या असून महाराष्ट्र पेटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोला, अहमदनगर, कोल्हापूर, अमळनेर आदी ठिकाणी दंगली झाल्या असून राज्यात दंगली घडविल्या जात आहेत. यावर सत्तारुढ व सत्ताविरोधी राजकीय पक्षाचे एकमत झालेले आहे. मात्र दंगल घडविण्याचा आरोप ते एकमेकांवर करीत आहेत.
         वास्तविक दंगलीचा एक इतिहास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दंगलीचे प्रमाण वाढले याची वेगवेगळी कारणे आहेत. आताच्या काळात मात्र ‘गठ्ठा मतदान’ हे एक प्रमुख कारण बनले आहे. राजकीय फायद्यासाठी दंगली घडविल्या जातात, असा आरोप सार्वजनिकरित्या होत असतांना याचा फायदा कमी-जास्त प्रमाणात सत्तारुढ व विरोधी पक्ष असा दोघांनाही होतो.

दंगल ही जाती-जातीची सहसा होत नाही, अर्थात जातीयपेक्षा धर्मा-धर्मात होते. धर्मियांमध्ये होते. दंगलमुळे हिंदू एकत्र येतात त्याचा फायदा हिंदुवादी राजकीय पक्षांना होतो तर मुस्लीम अधिक संघठीत होतात, त्याचा फायदा हिंदुवादीच्या पक्षाच्या विरोधी पक्षांना जसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी या पक्षांना होतो. परंतु हा फायदा कोणत्या बाजूने किती होतो, याचे गणीत दंगल घडविणा-यांना माहित असते. म्हणूनच ‘दंगलीचे राजकारण’ असे म्हटले जाते. राजकीय फायद्यासाठी दंगल होते, की दंगल झाल्यावर राजकीय पोळी शेकण्यासाठी दंगलीचे राजकारण होते, हे प्रश्न गुंतागुंतीचे वाटत असले तरी दंगली हव्या असतात, ती पण एक गरज झाली आहे, या मताचे व मानसिकतेचे लोक आहेत, हे खूप दुर्देवी आहे.
दंगलीत कोणाचे काय बिघडते? हे पाहिले तर प्रामुख्याने सरकारी वाहनांची, बसेसची, इमारतींची तोडफोड व जाळपोळ होते. पोलीस बंदोबस्ताचा खर्च व हल्ले आणि ताण वाढतो, दोषी सोबत अनेक निर्दोषांवर लाठीचार्ज, गोळीबार, पोलीस केसेस होतात. संचारबंदी लागल्यास गरीब व दैनंदिन मजुरी करणा-यांचे बेरोजगारीने हाल होतात. विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होते. उद्योगधंद्याना शांत व योग्य वातावरण भेटत नाही म्हणून नविन उद्योग येत नाहीत, असे खूप सारे सामाजिक नुकसान व दुष्परिणाम दंगलीमुळे होतात आणि विशेष म्हणजे दंगलीत गोरगरिबांचीच मुले शस्त्र हल्ला, दगडफेक आणि गोळीबाराने मरतात.
दंगलमुळे कोणाचे भले होत नाही, हे सर्वांना कळते.समाजात शिक्षणाने सुशिक्षीतांचे प्रमाण वाढलेले आहे. राजकारण सर्वांना ब-यापैकी कळते. तरीही दंगलीत लोक का सहभागी होतात?, उलट दंगल रोखण्याचे, दंगल होवू न देण्याचे कार्य का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.याला ‘मॉब सॉयकॉलाजी’मुळे हे शक्य होत नाही आणि प्रवाहासोबत वाहून जावे लागते, असेच उत्तर दिले जाते.
वास्तविक कोणीही दंगल करण्याचे ठरविले तर दंगल होवू शकते, एवढे सोपे आहे, याचेच मुळात आश्चर्य वाटते. तसेच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली की दंगल, पुतळ्याची विटंबना झाली की दंगल, ही कारणे आपल्या भावनांना आव्हान देणारी आहे. एवढ्या कमकुवत भावना न ठेवता अशा निंदनीय प्रकारामुळे तुसभरही तोल न जाऊ देता संयमाने वागले पाहिजे. आणि अशा गैरप्रकारांना ‘दंगल’ हे योग्य उत्तर नाही, हे सर्वांना पटलेच पाहिजे. दंगलीच्या हेतूने केलेल्या निंदनिय प्रकाराने दंगली झाल्या नाहीतर हे प्रकारही थांबतील, ‘भडकते म्हणून भडकवितात’, हे सूत्र समजून घेणे यातच समाजहित आहे. एवढे मात्र खरे!
शेवटी दंगल व्हावी आणि त्यावरील फायदे लाटावे, ही चुकीची मानसिकता कठोर कायद्याने नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. जेथे दंगली झाल्या तेथे सुत्रधार शोधण्यासाठी व आरोपिंना सुतासारखे सरळ करण्यासाठी पोलिसांना ‘खुली छूट’ दिली तर पुढची अनेक वर्षे दंगली होत नाहीत, या पोलिसी अनुभवाचा उपयोग हा पण अनेकवेळा उपाय ठरतो. मात्र हा रामबाण उपाय नाही या उलट समजुतदारपणा, प्रेम, माणुसकी हवी, तर यासाठी संतांची शिकवण आठवणे, सर्वांनी गुण्यागोविंदाने मिसळून राहणे महत्त्वाचे ठरते.
शेवटी एक शेर आठवतो…
मोहब्बत की राह पर सबको चलना है,
जलती हुई दुनिया को दंगो से बचाना है…

      - - - राजेश राजोरे
          9822593903

खामगाव, जि. बुलडाणा.
rajeshrajore@gmail.com.
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here