झाडांच्या जेवणाचा डबा
गावातील शारदा आजी खूपच धडपड्या. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या छोट्या मुलांसाठी जीवाचे रान करुन उन्हाळी शिबीराचं आयोजन करत.
या ही वर्षी शारदा आजींनी झाडांच्या जेवणाचा डबा असं आगळं वेगळं एक शिबिर घेतलं.
मुलं -मुलीखूप रमली.
शिबिराच्या समारोपप्रसंगी शारदा आजींनी सर्वांना मामाच्या गावाला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि प्रत्येकाला एक एक रोप अंगणात लावण्यासाठी दिले. म्हणाल्या,” आपण या शिबीरात काय -काय शिकलो? कोणी सांगेल का?
खुशी, देव,, पिंकी, वरद, कृष्णा, धन्वी, टिमू, काश्वी ,या सर्वांनी आजी मीss आजी मीsss म्हणत एकच गलका केला.
आजी म्हणाल्या,” अरे ,हो हो .शांत व्हा सगळेजण.एकेक करत शिबिरातील गोष्टी सांगा. आपण आढावा घेत आहोत. मनोगत मांडायची प्रत्येकाला संधी मिळणार आहे!
कृष्णा सगळ्यात लहान आहे. कृष्णा आधी आपलं मनोगत व्यक्त करेल .उठ बाळा सांग !
कृष्णा उठला. खूप धिटाईने सांगू लागला, -“शारदा आजीचे हे शिबिर खूप आवडले. अभ्यास करून आलेला कंटाळा, थकवा या शिबिराने घालवला. शिबिराचे नाव ‘झाडाच्या जेवणाचा डबा’ हे नाव पण खूप आवडले आणि झाडांबद्दल खूप माहिती मिळाली.”
एवढे बोलून तो खाली बसला सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
काश्वी खूप बडबडी मुलगी आहे. बघूया तिला या शिबिरात काय काय शिकायला मिळाले? आजीचे वाक्य संपते न संपते तोच ती झटकन उठली सर्वांच्या पुढ्यात आली आणि आपले अनुभव कथन करू लागली.
,”मी आणि माझी मैत्रीण धन्वीने या शिबिरात खूप धम्माल केली.
या शिबिरात नवे मित्र मैत्रिणी भेटल्या खूप मज्जा आली. झाडांची आई म्हणजे माती आणि बाबा म्हणजे पाणी सूर्यप्रकाश म्हणजे आजोबा या अशा गमतीशीर गोष्टी आजीने सांगितल्या झाड, माती, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचे खूप छान नाते आहे हे ही आजीने आम्हाला पटवून दिले. म्हणून मी झाडांना रोज पाणी घालणार त्यांना खूप छान वाढवणार. झाडांना त्यांच्या आई बाबा आजोबा सोबतच सदैव ठेवणार”!
सर्वांनी टाळ्या वाजवत मित्रमैत्रिणींचे कौतुक केले. आता नंबर आला तो वरदचा. वरद उठायला तयार नव्हता.”मी नाही सांगणार. मला नको” म्हणत तो खाली मान घालून बसला. आजी त्याच्याजवळ गेल्या म्हणाल्या,’ वरद सगळ्यात हुशार मुलगा आहे. तो मोजकच सांगेल पण छान सांगेल वरद सांगतोस ना रे बाळा तू?’
आढेवेढे घेत तोंडातल्या तोंडात तो पुटपुटू लागला. आजी म्हणाल्या ,”शाब्बास !आता फक्त थोडं मोठ्याने बोल . बघा किती हुशार आहे आमचा वरद’! वरदच्या गालावरची कळी खुलली तो मोठ्याने सांगू लागला,” आपण जसे भाजी -पोळी, गुळ, शेंगदाणे वरण-भात ,तूप ,कढी, सार खातो. तसेच झाडांच्या वाढीसाठी देखील कार्बन, प्राणवायू व हायड्रोजन ही अन्नद्रव्ये लागतात. ही अन्नद्रव्ये त्यांना पाण्यातून, सूर्यप्रकाशातून मिळतात.”
पुढे त्याला काही आठवेना तो म्हणाला, बास आजी. मला एवढंच येते.!
‘आजी मी सांगू’? धन्वी हात वर करत म्हणाली.
आजीने धन्वीला सांगायची परवानगी दिली. धन्वी सांगू लागली-“, झाडांच्या जेवणाचा डब्बा या शिबिरात नवे -नवे खेळ गमती-जमतीने खूप धमाल आली. आपल्या वाढीसाठी जसे आईच्या हाताचे बनवलेले रुचकर जेवण चांगले असते तसेच झाडांच्या वाढीसाठीही जेवण असते. झाडांची आई म्हणजे माती. तिच्यातून त्यांना नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम ही द्रव्ये मिळतात. फॉस्फरस झाडांची मुळे भक्कम करतो. झाड आणि पाने यांच्या वाढीसाठी नायट्रोजन सहकार्य करते आणि झाडांना फळे येण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाचे कार्य करते.लोह ,तांबे, जस्त ,मँगनीज ही अन्नद्रव्येही सूक्ष्म प्रमाणात त्यांना वाढीसाठी सहकार्य करतात. हे सर्व आम्हाला आजीने सा़गितले.कृती करून शिकवले. रोप कसे तयार करायचे? कसे त्याचे संगोपन करायचे? याचीही माहिती आजीने दिली त्याबद्दल आजी तुमचे आम्ही आभार मानतो.
आजीने धन्वी चे खूप मनापासून कौतुक केले.
खुशीने झाडा़चं महत्व सांगितलं.
झाड फळे,फुले,औषधे,सावली देतो.झाडामुळे पर्यावरण संतुलन राखले जाते.झाडांनाही जीव असतो.म्हणून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणखीही बरेच शिबिरार्थींना बोलायचे होते, पण वेळ कमी होता म्हणून आजीने टीमूला उठवले. टिमू च्या मनोगता ऩंतर शिबिराची सांगता होणार होती.
हाताची घडी घालत टीमूने सांगायला सुरुवात केली.” आई आपल्याला शाळेत जाताना रोज ताजा आणि रुचकर डबा देते. धन्वीने जसे सांगितले की पोटॅशियम ,नायट्रोजन ही द्रव्ये झाडांना झाडांची आई म्हणजे माती देते म्हणजे काय? तर ही द्रव्ये म्हणजे झाडांचा रुचकर स्वादिष्ट डबा होय. जोडीला सेंद्रिय खत ,जैविक खत, शेणखत, हिरवळीचे खत ही असतातच झाडांच्या डब्यामध्ये. आणि पिझ्झा ,बर्गर बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ, कॅडबरी बाहेरची थंडपेये,जशी आपल्याला व आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत तशीच रासायनिक खते ही झाडांना हानिकारक आहेत हेच या शिबिरातून आपण शिकलो आहोत. रासायनिक खतामुळे झाडे लवकर फोफावतात पण त्यांच्या माध्यमातून मिळणारी फळे किंवा भाज्या आपल्याला खाण्यायोग्य राहत नाहीत.आपल्या आरोग्यास ती घातक ठरतात. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद!”
कंपोस्ट खत, गांडूळ खताचा वापर करूनच आपण आपली झाडे वाढवू .त्यांचे संगोपन करू. आपली बाग फुलवू आणि झाडांच्या जेवणाचा डबा असाच दर्जेदार ठेवू अशी शपथ देवच्या पाठोपाठ सर्वांनी घेतली. आणि शिबीरार्थींनी आजीच्या पाया पडत निरोप घेतला.
आपापली रोपे घेऊन मुले हसत- खेळत घरी परतली.
साहित्यिका
🖋️©️®️अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2023/04/Screenshot_2023-04-13-11-10-53-45_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e72-694x1024.jpg)