जागतिक वन दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
पुणे, दि. १७: हुतात्मा राजगुरु शहीद दिन व जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग खेड परिक्षेत्र, हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट फाऊंडेशन व मिडीया टॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च रोजी राजगुरूनगर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सामाजिक वनीकरणाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग यांच्याहस्ते राजगुरुनगर बस स्थानक येथे सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या रॅलीचे एकूण अंतर २५ किलोमीटर असून रॅलीच्या माध्यमातून वनाचे संरक्षण, संवर्धन, वन्यजीव व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.
सायकल रॅलीचा पहिला थांबा ७ कि.मी अंतरावर बुद्धेवाडी फाटा येथील क्रीडा मैदानात तर दुसरा थांबा हा १४ कि.मी. अंतरावर डायनॅमिक स्कुल मैदान, कडुस येथे होणार आहे. या रॅलीचा समारोप सामाजिक वनीकरण परीक्षेत्र खेड कार्यालय शालीमार ढाब्यासमोर, चांडोली येथे होणार असून यावेळी सहभागी सायकल स्वारांना प्रशस्तीपत्रक व पदकाचे वाटप करण्यात येणार आहे.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वनसंरक्षक हनुमंत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
000