जनतेला नागवं करणारा मतलबाचा अविवेकी खेळ..!

0
40

जनतेला नागवं करणारा मतलबाचा अविवेकी खेळ..!

संजय एम.देशमुख,( निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार,अकोला

मोबा.क्र.९८८१३०४५४६

मतदारांनो आता तरी सावध व्हा….सावध रहा… राजकीय नेते आणि त्यांच्या भाडोत्री संमोहित दलालांपासून..! नाही तर वर्षोगणिक असेच पिचत रहाला अन्यायामध्ये…. होरपळत रहाल महागाईच्या वणव्यामध्ये….धर्मांध आणि जात्यंध आघातांनी दुभंगलेली मने घेऊन…! घराणेशाही आणि सत्तेच्या मक्तेदारांची लोकशाहीला संपविणारी हिटलरशाही सहन करून !

  मित्रांनो.....कुटूंबप्रमुख  बाप आपल्या मालमत्तेचा आणि आर्थिक वारसा आपल्या सुपूत्राकडे देतांना तो बिनडोक आणि अव्यवहारी वाटचालीचा कूपूत्र तर ठरणार नाही हा विचार प्रथम करत असतो. एक रूपया मुलाच्या हातात देतांना त्याचा हिशोब विचारणारा हिशोबी बाप पात्रता नसलेल्या उथळमानक्या कारट्यांच्या हातात आपल्या तिजोरीच्या चाब्या देतांना आपली छाती कितीही मोठी असली तरीही छप्पनवेळा विचार करेल.कारण त्याने कमावलेली पै पै ही त्याच्या घमाची कष्टाची भाकरी असते.म्हणून बापाच्या भरवशावर घरातले लूटून  मनमानी पैसा उथळणारा  अव्यवहारी पूत्र त्याला नको असतो. फुकटची मिजाईस करणारे बडेजावाच्या तोऱ्यात राहणारे दिवटेराज अख्ख्या घराला कंगाल करून भिकेला लावणारे विध्वंसक ठरत असतात...! असं काही होऊ नये म्हणून विचार करणारे सुज्ञ किती असतात? जास्त भरलेत तर आपलं नशीब समजावं...! मग मनुष्याचा जीवनाचा उत्सव हा महोत्सवच ठरेल..! 

  *बेकारी ना ठेवावी ग्रामाप्रती | उधळपट्टी न करावी कोणे रीती | उतृसवाने उत्तम गती लागे, तैसेची करावे |* असा संदेश विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला आहे.परंतू या वास्तविक सत्त्याची जाणीव  राज्यातील नेत्यांना तर नाहीच,परंतू विदर्भातील नेते सुध्दा राष्टसंतांच्या या आवाहनाची प्रतारणा करणारे सिध्द झालेले आहेत.राज्य कंगाल झाले तरी चालेल ,समाजनिष्ठा आणि कर्तव्याशी बेईमानी करून आपल्या चोचल्यांसाठी महागाईतून खिसे कापल्याने राज्यातील जनता नागवी झाली तरी चालेल.....पण आम्हाला विधासभेची दिवाळी विजयोत्सवाच्या आनंदी उच्चांकात लाडकेपणाच्या प्रेमात साजरी करायची आहे.असा चंग कुणी बांधलेला आहे? असे प्रश्न निर्माण होत असतील तर, त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही गणितात कच्चे नसलोत तर ममिळणार आहे.ते म्हणजे  महायुती सरकारातील अनेक नेते हेच असणार आहे.असेच मतलबपिसाट ईतर पक्षातही सक्रिय आहेतच.कारण ईकडचे तिकडे आणि तिकडचे ईकडे फिरत या सरमिसळीने या महाराष्ट्राची राजकीय गंगा मैली,घाणेरडी,आणि प्रदुषित झालेली आहे.त्यात नागवे होऊन डुबक्या मारत वर येणाऱ्यांच्या कपाळावर प्रामाणिकतेचे लेबल दिसणे हे सत्त्य आता  ईतिहासजमा झालेले आहे.हे अनुभवसिद्ध सत्त्य आहे.

अशांनाच आता आणखी  एकदा नाही, दोनदा नाही तर पून्हा पून्हा यायचे आहे.सत्तेचा मक्ता वडीलाईच्या मालमत्तेप्रमाणे ईतरांवर अन्याय करीत  आनंदाच्या जल्लोषात आजन्म उपभोगायचा आहे.पुढे आपलेच वारसदार त्यासाठी तयार करून ठेवायचे आहेत.गुन्हेगार,तडीपार आणि देश विकणारांचे हात अधिक बळकट करून‌ ठेवायचे आहेत.पून्हा पून्हा यायचे,अनेकदा यायचे आणि जनतेचा जीव जाईपर्यंत त्यांच्या छाताडावर पून्हा पून्हा नाचायचे. डोंगार,झाडी,हटेलांची पर्यटने आणि खोक्यांचे हिशोब करून प्रफुल्लित व्हायचे आहे. शेजारी गेला तरी चालेल आपण व्हायोलिन वाजवत नाचायचं. ईतका बेधुंद मेळ हाच चचेऱ्या राजकीय भावंडांचा सुरू असलेला क्लेशदायी अमानविय  मतलबी खेळ या राज्यात सध्या सुरू आहे...! हा असाच महायुती सरकारचा पुढे आलेला कुप्रसिध्द  खलनायकी चेहरा आहे...!तेच परत आपला डाव मांडण्यास सिध्द झालेले आहेत.सरकारी तिजोरी म्हणजे स्वत:ची वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखी वाटचाल करणाऱ्या  राजकीय नेत्यांना समाजाचे तारणहार कधीच म्हणता येणार नाही. 

जनतेवर महागाई लादून त्यांच्या घामाच्या पैशांवर स्वत:चे ऐशोरामी जीवन जगणाऱ्या परावलंबी लोकांकडून निरपराध जनतेच्या आयुष्याची होत असलेली ही राखरांगोळी आहे.यासाठीच अनेक योजनांसाठी वाढवलेली महागाई, करसंकलन, १०० ऐवजी गरज नसतांना रू.५०० च्या स्टॅंम्पपेपरसारखे फंडे  आणि विविध शुल्कांमधून,भरमसाट करसंकलनातून सक्तीची होत असलेली लूटालूट म्हणावे  का? अनेक क्षेत्रातील प्रचंड देणी बाकी,नोकरदारांच्या पगारांपासून तर ठीकठीकाणची हक्कांची देणी थकवून राज्याला प्रचंड प्रमाणात कर्जबाजारी करत आता बेशरमीच्या रोषणाईत विधानसभेची दिवाळी साजरी करण्यास निघालेली ही मतलबी  खेळी आहे...!  ही विनाशकाले विपरीत बुध्दीची चाल  आता कुणाला तारणार आणि कुणाला  मारणार हे अग्निपरीक्षेचे निकाल निवडणुकांच्या रनधुमाळीनंतरच्या २३ नोव्हेंबरलाच समोर येणार आहेत.यावेळी मतदार हा खरोखरच सुज्ञ आहे या परीक्षेची  सुध्दा हिच वेळ असणार आहे. मतलबाच्या महायुतीमध्ये भाऊ भाऊ या नात्याने  दाखल  झालेली ही अनेक अव्यवहारी अविवेकी आणि असंवेदनशील नेत्यांची फौज आता मतदारांच्या दारात "भिक्षाम् देई" करत दाखल होणार आहे का? वारेमाप योजनांमधील प्रसिध्दीतून विधासभा निवडणुकांची ही सुरू झालेली रणधुमाळी आहे..!

    या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात काहीही करून विजय मिळवणे हाच युती सरकारचा संकल्प आहे. महाराष्ट्राची सत्ता परत हस्तगत करण्यासाठी सरकारी तिजोरीच्या मनमानी उधळपट्टीनंतर नाना लटपटी खटपटी त्यासाठी सुरू आहेत.अनेक महामंडळांच्या आणि विधानपरिषदेच्या ७ नियुक्त्या असंविधानिक पध्दतीने  घाई गडबडीत करून बंडोबांना थंडोबा म्हणून बसवून ठेवत कामाला लावलं जाणार आहे. अनेक योजनांमधून फुकटेगीरीच्या सवयींनी मतदारांना गुलाम बनवण्याच्या चाणाक्य तंत्र मंत्राचं षड्यंत्रही केव्हाचंच  सुरू झालेलं आहे.विकासकामांना फाटा देऊन करोडो रूपयांच्या कर्जावर कुठे बहिणींना सांभाळले जात आहे.गरज आहे ते विद्यार्थी आणि युवाशक्तीचं भविष्य अंध:कारमय करून, ज्यांना फिरण्याची गरज नाही अशांना फुकट प्रवासाचे उपहार दिले जात आहेत.कर्म सोडून देव देव करीत तिर्थयात्रांना उत्तेजन देणाऱ्या या सरकारचे हे अविवेकी निर्णय म्हणजे निव्वळ मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीची वारेमाप उधळपट्टी आहे.ही वाटचाल संविधानिक संकेतांना धरून आहे का? लोकांना फुकटची चॉकलेटं वाटण्यापेक्षा महागाई कमी करून आणि ईतर खिसेकापू  भुर्दंड बंद करण्याची, थोड्या तरी सामाजिक शहाणपणाची उपरती युती सरकारला का झाली नाही? हे प्रश्न मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत मतं मागायला येणाऱ्या  महायुतीच्या नेत्यांना विचारले पाहिजेत. तसेच आपण काय करणार हेच प्रश्न महाआघाडीच्या उमेदवारांनाही विचारले पाहिजे.ते पूर्ण करण्याची लेखी हमी पण घेतली पाहिजे‌.या साऱ्या  प्रश्नाची उत्तरं मिळाल्याशिवाय कोणतीही फालतू भाषणबाजी चालणार नाही अशी तंबी देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदारांनी आता पुढे आलं पाहिजे.हे राजकीय नेते आज जनतेला फुकटच्या योजनाचं आमिष दाखवून खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, आणि हिच कोट्यवधींची रक्कम चौपट प्रमाणात त्यांच्याच खिशातून वसूल करतात.उरलेल्या संपत्तीची भ्रष्ट मार्गाने विल्हेवाट लाऊन जनेतेच्याच पैशावर सर्व नीतिमत्ता गुंडाळून डोंगर झाडी आणि हटेलातून ऐशोराम करत फिरतात.या खोकेविरांना सरकारी तिजोऱ्यांना कुठे कुठे कशी भोकं पाडायची यातील सराईतपणा वर्षानुवर्षांच्या सत्तासु़ंदरीने चांगलाच शिकवून दिलेला आहे.

  विधानसभा निवडणूकांचे पडघम जसे वाजले तसे सारे जागावाटपासाठी धावले.सत्तेच्या भाकरीच्या या हिस्सावाटीचे गणित अजून कोणाचे सुटले नाही. आम्हाला जास्त वाटा का मिळत नाही,यासाठीचे प्रश्न,प्रतिप्रश्न सध्या सुरू आहेत.ते सुटून उमेदवार जाहिर होताच या पंचवार्षिक महोत्सवातील हे कुशल कलाकार मैदानात येणार आहेत.ज्यांची कधी तोंडं  पाहण्याची त्यांना गरज वाटली नाही ते जनतेसमोर घसे बसेपर्यंत ओरडणार आहेत.पोळा फुटल्याप्रमाणे हे  उमेदवार आता मतदारांच्या दरवाज्यांवर दागल होणार आहेत! गयावया करणार,माझी जनता,माझे मायबाप,माझ्या लाडक्या बहिणी त्यांना सांभाळणारे सारे आमचेच  दाजी...!  हे सारंचं सारं अनेक लबाडांचं आता गणगोत असणार आहे.यातील काही असली नकली चेहऱ्यांना आता आपल्याला ओळखायचं आहे. यातील बंडलबाजांना मैदानातून धक्के देऊन कायम बाहेर हाकालायचे आहे. जनतेला  दिवाळीचा उत्सव आणि सोबतच लोकशाहीचा महोत्सव सुध्दा साजरा करायचा आहे.दिवाळीत मश्गूल राहून अविकाने,अविचाराने मतदान करून संविधान आणि लोकशाहीला संकटात टाकायचे नाही.तर विचारपूर्वक मतदान करून आपल्या जनेच्या आयुष्याचा विचार करणाऱ्या समाजनिष्ठ नेत्यांनाच फक्त संधी द्यायच्या आहेत.अन्यथा याही वेळेला टाकलेले पाणी हे पालथ्या घड्यावर जाऊ नये.याचा विचार जर केला नाही तर पुढील परिस्थिती अत्यंत कठीण राहणार आहे. मतदारांच्या चुकांची प्रायश्चित्तं त्यांनाच भोगावी लागणार आहेत.मग पुढील ५ वर्ष त्यांना वाचवायला प्रत्यक्ष परमेश्वर सुध्दा येऊ शकणार नाही.तो एकच म्हणेल की मी तुम्हाला एकच मंत्र दिला होता...."ज्याचे त्याच्याजवळ" मग आता मला काय सांगताय?
     ‌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here