छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे बारामती उपविभागात आयोजन
महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक,जलदगतीने पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर
बारामती उपविभागातील अधिकाधिक नागरिकांनी शिबीरात सहभागी व्हावे-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
बारामती, दि. ५: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन जलदगतीने सेवा देण्यावर प्रशासनाचा भर आहे; महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलदगतीने पोहोचविण्याकरिता प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
श्री. नावडकर म्हणाले, महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासोबतच जमीन महसूल कायद्यात नव्याने झालेले बदलाविषयी माहिती देण्याकरिता बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

‘महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून विभागात ७ आणि १४ मार्च, १० आणि १७ एप्रिल तसेच ८ आणि १५ मे या कालावधीत विभागात शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या अभियानाच्या टप्पा क्रमांक एक राबविण्याबाबत २७ फेब्रुवारी रोजी कविवर्य मोरोपंत नाटयगृह बारामती येथे सभा घेवून कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे. बारामती उपविभागातील अधिकाधिक नागरिकांनी प्रशासनामध्ये आयोजित शिबीरात सहभागी व्हावे, महसूल विषयक सेवांचा लाभ घ्यावा, असे आावाहन श्री. नावडकर यांनी केले आहे.
बारामती तालुक्यात काटेवाडी येथून प्रारंभ
काटेवाडी येथून ७ मार्च रोजी प्रांरभ होणार असून शिर्सुफळ येथे १४ मार्च, करंजेपुल २० मार्च, पणदरे २७, वडगाव निंबाळकर ३ एप्रिल, मोरगाव १० एप्रिल, लोणीभापकर १७ एप्रिल, सुपा २४ एप्रिल, बारामती ८ मे, माळेगाव बु. १५ मे आणि उंडवडी क.प. २२ मे रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
इंदापूर तालुक्यात इंदापूर व काटी येथून प्रारंभ
इंदापूर व काटी येथून ७ मार्च रोजी प्रांरभ होणार असून माळवाडी व लाखेवाडी येथे १४ मार्च, लोणी देवकर व भिगवण येथे १० एप्रिल, पळसदेव व सणसर येथे १७ एप्रिल , अंथुर्णे व निमगाव केतकी येथे ८ मे आणि लासुर्णे व बावडा येथे १५ मे रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.




