चंद्र आणखी भारत यांचे,गुण जुळले छत्तीस!देव काढतो मुहूर्त त्याचा,आज दोन पस्तीस!

0
319

चंद्र आणखी भारत यांचे,
गुण जुळले छत्तीस!
देव काढतो मुहूर्त त्याचा,
आज दोन पस्तीस!

अग्नीपिसारा फुलवित घेईल,
झेप अंतराळात!
आणिक त्याचा धूर खुशीचा,
भरे अंतरंगात!

त्रिदेव आता आतुरलेले,
करावया रक्षा!
भेदतील ते सहजपणाने,
पृथ्वीची कक्षा!

भारतभूच्या शास्त्रज्ञांची,
मनिषा दुर्दम्य!
दोन वाजूनी पस्तीस होता,
दृश्य दिसे रम्य!

रामही म्हणती,”पुष्पकाहुनी,
यान मला हे हवे!
प्राणच होती जिथे शुभेच्छा,
शब्द कशाला नवे!

अभिमान वा गर्व वगैरे,
मिळमिळीत वाटे!
आणि उरातून राष्ट्र प्रितीचा,
माज फार दाटे!

प्रेयसीचीही वाट मुळी ना,
अशी पाहिली कधी!
उसळी घेतो उरात माझ्या,
फेसाळुन जलधी!

काऊंटडाऊन सहन होईना,
जीव होई कापूर!
उत्सुकता तर स्वतःच झाली,
मरणाची आतूर!

चंद्र पहातो वाट कधीची,
वेशीवर येऊन!
आणि चांदणे मऊ मखमली,
ओंजळीत घेऊन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here