महावीर जयंती
“धर्म ही सांगायची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे. मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे!” असा मोलाचा संदेश देणाऱ्या महावीरांचा जन्म, कुडलपूर राज्याचा राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलादेवी यांच्या पोटी, इसवी सन पूर्व ५९९ मध्ये, चैत्र शुद्ध त्रयोदशीला झाला. वर्धमानाची हुशारी, निर्भयता, नम्रता इ. गुण लहानपणापासूनच दिसून येत होते. ते जैन धर्माचे चोविसावे ‘तीर्थंकर’ होत.
एकदा चेंडूने खेळत असताना सापाच्या वेटोळ्यात पडलेला चेंडू त्यांनी निर्भयपणे जाऊन आणला. वैशाली नगरीतल्या राजरस्त्यावरून एका माजलेल्या हत्तीला आपल्या शांत दृष्टीने व प्रेमाने शांत केले. हातात कोणतेही शस्त्र न घेता घडविलेल्या वेगळ्याच शौर्याने लोक त्यांना ‘महावीर वर्धमान’ म्हणू लागले. यशोदादेवी हिच्याबरोबर विवाह होऊनसुद्धा वर्धमान वैराग्य, अनासक्त वृत्तीने राहत होते.
समाजातील माणसाला माणुसकीपासून दूर लोटणारा धर्म, भेदाभेद, व यज्ञयागातील बेसुमार पशुहत्या पाहून माणूस फक्त स्वत:च्या शरीरसुखाचा विचार का करतो, मानवधर्मापासून दूर का राहतो? इ. प्रश्नांनी वर्धमान अस्वस्थ होऊन गेले. लोकांनी आपापले वैरभाव विसरून, काम, क्रोध, द्वेष, मत्सर, तृष्णा यांचा त्याग करून; विवेक व स्वयंशिस्तीने वागावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी घरादराचा त्याग करून बारा वर्षे त्यांनी खडतर तपश्चर्या केली. संकटांना, लोकनिंदेला न घाबरता इंद्रियनिग्रह, अहिंसा, क्षमा, तितिक्षा याद्वारे ज्ञान मिळवले, लोकस्थितीचा अभ्यास व अनंत अनुभवांनी ते ज्ञानसंपन्न झाले.
यज्ञासाठीची प्राण्याची हिंसा, युद्धातील प्राणीमात्रांचा रक्तपात, यज्ञात वाया जाणारे तेल-तूप-धान्य यांचा निषेध करून संयम व शुद्धाचरणाचा मार्ग लोकांना त्यांनी सांगितला व जातिभेदविरहित समता प्रस्थापित केली. ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला तो ‘जिन’ त्यांचा तो जैनधर्म. वयाच्या ४२ व्या वर्षी पावापुरी येथे त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर ३० वर्षे त्यांनी जैन धर्माच्या प्रचाराचे संघटनेचे कार्य केले. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह ही पंचशीले महाव्रते लोकांना त्यांनी सांगितली.
जैन धर्मामध्ये श्रावण महिन्यातील ‘पर्युषण’ पर्व आठ दिवसांचे असते. संतसज्जनांचा सहवास, सद्विचारांचे चिंतन, आत्मसुधारणेची ही संधी असते. पर्युषणाच्या शेवटच्या दिवसाला ‘संवत्सरी’ म्हणतात. या दिवशी वैर, द्वेष विसरून लोक एकमेकांना भेटतात. महावीर जयंती निमित्त त्यांची देवळे सजवून लोक मिरवणूक काढतात. धर्मग्रंथांचे वाचन व चिंतन करतात. वैदिक धर्माच्या यज्ञयागांतील हिंसा थांबवणारे महावीर त्यागी पुरुष होते! अहिंसात्मक विचारसरणीचे लाखावरी अनुयायी, श्रावक भगवान महावीरांनी संघटित केले. स्त्रियांचा सन्मान व समानता यावरही त्यांनी भर देऊन बौद्ध भिक्षुक व भिक्षुकिणींचे संघ कार्यरत केले. इ.स. पूर्व ५२७ मधील दिवाळी सणावेळी जैन धर्म प्रसारक भगवान महावीरांना मोक्ष प्राप्त झाला.