कृषी महाविद्यालय, बारामती येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

0
30

कृषी महाविद्यालय, बारामती येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, बारामती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत “शाश्वत विकासासाठी युवक, जलसंधारण व पडीक जमीन व्यवस्थापन” या संकल्पनेवर दि. ९ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत पानसरेवाडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता व जलसंवर्धन, पशु आरोग्य व रोगनिदान शिबिर, वृक्षसंगोपन, आरोग्य शिबिर व रक्त तपासणी असे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचबरोबर माझ्या पर्यावरणाचे परीक्षण, फळबाग लागवड तंत्रज्ञान व कांदा निर्यात, कांदा व ज्वारी लागवड तंत्रज्ञान, जैविक खते व कीटकनाशकांचे शेतीतील महत्त्व, एकविसाव्या शतकातील युवकांची दशा व दिशा, दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन व दुग्ध व्यवसाय या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत विविध पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापनावरील चित्रफिती दाखविण्यात आल्या. संगीत विद्यालय, शारदानगर यांचे कला व संगीत सादरीकरण, भजनी मंडळ, पानसरेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रम, शेकोटी कार्यक्रम तसेच स्वयंसेवकांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

या शिबिरांतर्गत स्वयंसेवकांनी पानसरेवाडी गावात संपूर्ण स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला. यामध्ये संपूर्ण गाव, तरटे वस्ती तसेच गावठाण परिसराची स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले. कृषी व सामाजिक जागृतीसाठी सायंकाळी विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. या सर्व उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जीवनसाधना फाऊंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाचे संस्थापक श्री. जयराम सुपेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. संदीप गायकवाड, उपप्राचार्य डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती हे लाभले. तसेच कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए. बी. रासकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. वैभव नावडकर, प्रांताधिकारी, बारामती हे उपस्थित होते. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. नोंदवही (डायरी) लिहिण्याची सवय बाळगावी तसेच आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. संदीप गायकवाड, प्रा. आशिष रासकर उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी पानसरेवाडी गावच्या सरपंच निलिमा अभिजीत पानसरे, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पानसरे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे व समन्वयक श्री. प्रशांत तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. समीर बुरुंगले, प्रा. देवानंद घुले व प्रा. गणेश शिंदे यांनी काम पाहिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच पानसरेवाडी येथील समस्त ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण-जाण, ग्रामविकासाची समज तसेच व्यक्तिमत्त्व विकासाची मूल्ये अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here