उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती
कारभाराला गती देण्याचा निर्धार, प्रभावी अंमलबजावणीवर भर
मुंबई, दि. २० फेब्रुवारी २०२५ – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज पदभार स्वीकारला. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह आता सचिवपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कार्यभार स्वीकारताना त्यांनी कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यावर भर देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

“धाडसी निर्णय, प्रभावी अंमलबजावणी आणि लोकहिताची तातडीने सोडवणूक” या तत्त्वांवर काम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वास साजेसं योगदान देण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सचिवपद स्वीकारताच त्यांनी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रशासनाला वेग देणारे अनुभवी अधिकारी
डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे कोकण विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, साखर आयुक्त, हाफकीन इन्स्टिट्यूटचे संचालक अशी महत्त्वाची पदे भूषवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रशासन अधिक गतीमान आणि सकारात्मक पद्धतीने कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सहकाऱ्यांकडून स्वागत
सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी प्रशासकीय सल्लागार सतीश मोघे, उपसचिव विनायक चव्हाण, डॉ. नवनाथ जरे, उपसचिव विकास ढाकणे, खाजगी सचिव डॉ. अमर भडांगे, अविनाश सोलवट, विशेष कार्य अधिकारी नरेश भैरी, विलास धाईजे, अवर सचिव सचिन बाभळगावकर, कक्ष अधिकारी विजय लिटे आदी उपस्थित होते.
डॉ. राजेश देशमुख यांच्या नियुक्तीमुळे उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार अधिक प्रभावी आणि पारदर्शी होईल, असा विश्वास प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
