अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गावांची तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडून पाहणी
तात्काळ पंचनामे करुन १ लाख ७५ हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर
बारामती, दि.१७: तालुक्यात ११ ते १३ मे या कालावधीत अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गावांना तहसीलदार गणेश शिंदे यांनी मंगळवारी (दि. १४) भेटी देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. झालेल्या पंचनाम्यांच्या अनुषंगाने १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने तहसीलदार श्री. शिंदे यांनी माहिती दिली, बाबुर्डी येथे ५ घरे आणि ७ गोठे, तरडोली ४ घरे, मोढवे व जळोची येथे प्रत्येकी १ घर, लोणीभापकर ५ घरे, १ गोठा आणि १ लॉन्स, तसेच मासाळवाडी येथे २ घरे व १ गोठ्याचे नुकसान झाले आहे. बाबुर्डी व माळेगाव कॉलनी मोरे वस्ती येथे प्रत्येकी १ गाय मृत्यूमुखी पडली आहे.
घरांच्या नुकसान भरपाईकरीता १ लाख २३ हजार ५००, गोठ्यांकरीता २७ हजार आणि संसार उपयोगी साहित्यांच्या नुकसान भरपाईकरीता २५ हजार असे एकूण १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा प्रस्ताव तात्काळ पंचनामे करुन संबंधितांना नुकसान भरपाईकरीता शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान मृत्यमुखी पडलेल्या दोन जनावरांच्या पशुपालकांच्या खात्यात प्रत्येकी ३४ हजार ५०० रुपये याप्रमाणे ७५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. दोन घरांचे पत्रे उडाल्याने झालेल्या नुकसानीची प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित नुकसान भरपाईकरीता संबंधितांनाकडून कागदपत्रे जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे, असेही तहसीलदार म्हणाले.
शासनाकडून घरांची अशंत: पडझड झाल्यास ६ हजार ५०० रुपये व संसार उपयोगी साहित्यासाठी ५ हजार असे एकूण ११ हजार ५०० रुपये, गुरांच्या गोठ्यांकरीता ३ हजार याप्रमाणे नुकसान भरपाई मिळते. नुकसान झालेल्यांना मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली आहे.
नुकसान पाहणीवेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.