सार्वजनिक उत्सव कोणाच्या फायद्यासाठी ?

0
सार्वजनिक उत्सव कोणाच्या फायद्यासाठी ?

सार्वजनिक उत्सव कोणाच्या फायद्यासाठी ?

रौनके कहाँ अब पहले जैसी,
इश्तिहार बताता है,
कोई उत्सव आया है।

भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. नेहमी कोठे ना कोठे, कोणता न कोणता उत्सव देशात साजरा होत असतो. सार्वजनिक उत्सव म्हटले की एकत्र येणे, गर्दी करणे, मोठ्या आवाजात ढोल, ताशे, डीजे वाजविणे, गुलाल, नीळ उधळणे, त्यासाठी धार्मिक तेढ किंवा धर्माभिमानी गाणे वाजविणे, त्यावर थिरकने, नारेबाजी, घोषणाबाजी करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही आदर्श न घेता, आणि नवीन आदर्श प्रस्थापित न करता घरी परतणे, असे उत्सवाचे स्वरूप झाले आहे.

कोरोना काळात याही वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव व इतर उत्सवांना परवानगी नाही. अर्थात दोन वर्षांपासून सार्वजनिक उत्सव बंद आहेत. तेव्हा समाजाचे, धर्माचे काय बिघडले? हा प्रश्न उपस्थित होतो. तर दुसरीकडे सार्वजनिक उत्सव मग ते कोणत्याही धर्माचे असो, हे उत्सव कोणाच्या फायद्याचे आहेत? असाही प्रश्न उपस्थित होतो. पूर्वीच्या काळात मनोरंजनाची साधने नव्हती तसेच विविध खेळांचे प्रदर्शन करण्याचे मंच नव्हते, इंग्रजांच्या काळात तर सर्वांना एकत्र येण्याची पण मनाई होती, त्यामुळे उत्सवाचे माध्यमातून एकत्र होता येत होते.

विशेष म्हणजे सार्वजनिक उत्सवाचा वापर व्याख्यानमाला आयोजित करून उत्सवाचे महत्त्व पटवून देणे, प्रबोधन करणे, भारतीय संस्कृती व संस्कारांच्या गोष्टी रुजविणे, आदी अनेक समाजहिताच्या कार्यासाठी व्हायचा. तर सार्वजनिक उत्सव पार पडला की सामाजिक जबाबदारी, कर्तव्य, नैतिकता, नीतिमूल्ये यांची जाणीव होऊन सामाजिक ऊर्जा निर्माण व्हायची. आता मात्र काळ बदलला आहे. राहणीमान व मनोरंजनाची साधने बदलली आहेत. तसेच सर्वच खेळांच्या प्रदर्शनासाठी राज्य ते आंतरराष्ट्रीयस्तरावर मंच उपलब्ध झालीत, त्यामुळेच सार्वजनिक उत्सवाचे स्वरूपही पूर्णपणे बदलले आहे.

आताचे सार्वजनिक उत्सव हे जात, धर्म, गट, राजकीय पक्ष व संघटना निहाय होतात. यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो. या उत्सवांसाठी व्यापा-यांना कर्मचा-यांना वर्गणी देणे भाग असते. योग्य वर्गणी न दिल्यास संताप व्यक्त होतो. व्यापा-यांच्या दुकानाचे कुलपात रात्रीच्यावेळी एमसील भरले जाते. त्यांच्या दुकानात नाहक गुलाल, नीळ उधळून त्यांचे विक्री साहित्य खराब केले जाते. अशा घटना घडलेल्या आहेत. वर्गणी देत नाही म्हणून अधिकारी व कर्मचा-यांच्या तक्रारी केल्या जातात. असेही प्रकार घडतात. अनेक सार्वजनिक उत्सव मंडळाचे सर्वेसर्वा हे विविध राजकीय पक्षाचे नेते असतात, तेव्हा ते पण वर्गणीसाठी दबाव आणत असतात. दुसरीकडे वर्गणी देणा-यांचे समाधान होत नाही. आपल्या वर्गणीच्या पैशाने तरुण वर्ग दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे चित्र समोर दिसत असते. (अपवाद खूप कमी मंडळ या वर्गणीतून लोकोपयोगी उपक्रम राबवितात) तेव्हा पुन्हा प्रश्न उपस्थित होतो, हे सर्व कशासाठी?

गेल्या दोन वर्षापासून वर्गणी ते सार्वजनिक उत्सव या गोष्टींना आळा बसला आहे. सार्वजनिक उत्सव झाले नाहीत, कोट्यवधीचा खर्च वाचला, सजावट, नवीन ड्रेस, टी शर्ट, नवरात्रीच्या उत्सवाच्या नऊ रंगाच्या साड्या खरेदी खर्च वाचला. खूप सारे नाहकचे परिश्रम वाचले आणि खूप वेळेची बचतही झाली. तर या बचतीमुळेही फारसे काही साध्य झाले, असे म्हणता येणार नाही. मात्र बिघडले काही नाही, हे नक्की. शासनाचा पोलीस बंदोबस्ताचा प्रचंड खर्च वाचला,

मूर्तीची विटंबना नाही, दंगली नाहीत, संचारबंदी लागली नाही, तरुणांवर पोलीस केस नाहीत, तर राजकीय वातावरण तापले नाही एकूणच सामाजिक वातावरण शांत व सौर्हाद्राचे राहण्यास मदत झाली, असे म्हणता येईल. तेव्हा विविध धर्माचे काही सार्वजनिक उत्सव घरापुरते, कुटुंबापुरते किंवा नातेवाईकांपुरते मर्यादित केले जाणे गरजेचे वाटते. नाहीतर सार्वजनिक उत्सव साजरे करताना उत्सव दरम्यान समाज प्रबोधनाचे, समाजात वैद्यकीय सेवेचे व इतरही समाजहिताचे उपक्रम राबविणे मंडळांना बंधनकारक केले पाहिजे. नुसते नाच-गाणे, पैसा उधळणे नको तर उत्सव साजरे करताना नैतिकता पाळायला हवी.

शेवटी राजकीय हेतू साध्य करण्यासाठीच सार्वजनिक उत्सवाचा उपयोग होत असेल, आणि या माध्यमातून जातीय, धार्मिक द्वेष वाढत असेल, रस्त्यावर नमाज आणि महाआरत्या होणार असतील, तर या उत्सवप्रियतेला लगाम लावला पाहिजे, आणि हा लगाम सूज्ञ जनतेने, सरकारने घालायला हवा. एवढे मात्र खरे! शेवटी एक शेर आठवतो….

त्योहारो में भी अब मेरा – तेरा हो गया है,
क्योंकि इन्सानियत के ऊपर धर्म जो हो गया है।

   - - - राजेश राजोरे
 खामगाव जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here