विश्व हिंदू परिषदेची ‘राजकीय वारी’!

0
विश्व हिंदू परिषदेची ‘राजकीय वारी’!

विश्व हिंदू परिषदेची ‘राजकीय वारी’!

झूठ का बाजार सजा रखा है,
लोगो को खूब गुमराह कर रखा है,
हकीकत से है लोग बेखबर,
चेहरे पर चेहरा जो लगा रखा है।

संपूर्ण जगात एक मोठी हिंदूवादी संघटना म्हणून गणल्या जाणारी विश्व हिंदू परिषद आहे. सन १९६४ साली स्थापन झालेली नवी दिल्ली येथे मुख्य कार्यालय असलेल्या विश्व हिंदू परिषदेचे ध्येय वाक्य ‘धर्मो रक्षति रक्षित:’ अर्थात ‘जो धर्माची रक्षा करतो, धर्म त्याची रक्षा करतो’, असे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुषांगिक संगठन (स्वतंत्र मात्र विचारधारेने संघाशी जुळलेली ४० पैकी एक संघटना) असलेल्या या संघटनेची स्थापना केशवराम काशिराम शास्त्री, स्वामी चिन्मयानंद, जयचमराजा वोडेयार, बहादूर मास्टर तारासिंह, शिवराम शंकर आपटे, सत्गुरू जगजीतसिंह यांनी केली आहे. अनेक थोर विचारवंत या संघटनेत असून बजरंग दल (युवा शाखा) व दूर्गा वाहिनी (महिला शाखा) अशा उपसंस्था आहेत. एकूणच विश्व हिंदू परिषदेचे कार्य सर्वदूर सुपरिचत असे आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी केलेला संघर्षही लोक विसरलेले नाहीत.

विश्व हिंदू परिषदेचा वरवर थेट राजकारणाशी सक्रीय संबंध दिसत नसला तरी भारतीय जनता पक्षाला पूरक व निवडणुकीत मदत होईल, हिंदुत्ववादी वातावरण तयार होईल, हिंदुंना, हिंदुत्वाला जागृत करता येईल, असे असल्याचे स्पष्ट आहे.
भारतात हिंदुवादी भाजपाची सत्ता आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववाद्यांच्या मनासारख्या गोष्टी करीत आहेत. यामुळेच बहुसंख्य हिंदू एकवटले असून मोदींच्या समर्थनात आहेत. तर त्यांचा शब्द प्रमाण मानणारे ‘भक्त’ आहेत. मात्र महाराष्ट्रात विश्व हिंदू परिषदेला पंतप्रधानांचे कोविड बाबतचे म्हणणे, विनंती, आवाहन व इशारे पटत नाहीत, असे वाटते. कारण या आवाहनाविरुध्द अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी यांनी केली.

‘महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या आषाढी पायीवारीला महाराष्ट्र सरकारने परवानगी द्यावी, अशी ही मागणी आहे. तर महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार वारक-यांवर कसे अन्याय करीत आहेत, याचा पाढा पत्रकार परिषद घेऊन विहिंपचे नेते वाचत आहेत. भारताचे पंतप्रधान गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहेत. ‘कोविडची तिसरी लाट आपोआप येणार नाही, आपण आणली तरच येईल, तेव्हा तिस-या लाटेसाठी काय नियोजन, व्यवस्था केली हे न विचारता तिसरी लाट येवू देणारच नाही, असा संकल्प केला पाहिजे’, असे ओरडून सांगत असतांना विश्व हिंदू परिषदेने आषाढी पायीवारीसाठी मानाच्या प्रत्येक पालखीसोबत ५०० लोकांना परवानगी देण्याचा आग्रह केला व त्यासाठी शनिवारी (१७ जुलै) भजन आंदोलन केले, हे योग्य म्हणता येणार नाही.

उलट यात महाविकास आघाडीचे बदनामीसाठी व राजकारणासाठी ही मागणी व आंदोलन केल्या गेले, असाच संदेश गेला आहे.
दुसरीकडे आषाढीला फक्त पाच दिवस राहिले होते तेव्हा तीर्थक्षेत्र शेगाव असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातून या आंदोलनाचा इशारा दिला. वास्तविक जर राज्य शासनाने मागणीनुसार परवानगी दिली असती तरी पायीवारी करणारे आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहचू शकले नसते, हे पण तेवढेच खरे! तेव्हा वारक-यांची ५०० वर्षांची परंपरा आहे म्हणून ही भावनिक आणि श्रध्देची मागणी आहे, असे म्हणण्यापेक्षा विश्व हिंदू परिषदेची ही ‘राजकीय वारी’ आहे, असे म्हणणे जास्त उचित ठरेल.

कोविडच्या या काळात साथ पसरून मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या महाराष्ट्रात सव्वा लाखाच्या वर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात ११२ देशात कोविडची तिसरी लाट (डेल्टा व्हायरस) आल्याचे जाहीर केले आहे. दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेने मात्र आषाढी पायीवारीचा आग्रह धरला, हे माणसाला जगविण्यासाठी का? असा प्रश्न पडतो. माणूस जगला पाहिजे तरच तो धर्माची रक्षा करेल व धर्म त्याची रक्षा करेल. सद्यस्थितीत माणूस जगणे कठीण झाले असतांना पायीवारीचा आग्रह योग्य म्हणावे काय? तर वैचारिक विहिंपकडून या मागणीची अपेक्षाही नाही.
वास्तविक राजकारण करावे, याबद्दल दुमत नाही,

मात्र ते जनतेच्या जीवाशी खेळणारे नसावे, जनप्रबोधन करून जनतेला संयमी बनविणारे असावे, त्यांची माथी भडकविणारे नसावे, आदी रास्त अपेक्षा सूज्ञ नागरिकांना आहे. याचे भान राजकीय पक्ष व त्यांना पूरक संघटनांनी ठेवले पाहिजे, एवढेच.
शेवटी राजकारण करणे वाईट नाही. मात्र त्यातून जनतेचे भले काय केले? असा प्रश्न उपस्थित करणारा शेर आठवतो…
करो राजनीति बुरी चीज नहीं है,
फुर्सत मिले तो सोचना, भला तुमने कितना किया है।
– – – राजेश राजोरे
9822593903
खामगाव, जि. बुलडाणा

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here