लग्नकार्याचे बदलते स्वरूप…

0
लग्नकार्याचे बदलते स्वरूप…

लग्नकार्याचे बदलते स्वरूप…

शादी एक ऐसी इमारत है,
जिसकी नींव हर दिन मजबूत करनी पडती है।

लग्न हे हिंदू धर्मियात एक संस्कार आहे. सध्या लग्नकार्याचे, विवाह सोहळ्याचे, लग्न समारंभाचे दिवस आहेत. २१ नोव्हेंबर ही सर्वाधिक ‘दाट तिथी’ होती. या दिनी मंगल कार्यालये रिकामे नव्हते. भारतात या एका महिन्यात २५ लाख लग्नकार्याच्या माध्यमातून ३ लाख कोटी रुपये बाजारात येणार असल्याचे वृत्त एका राष्ट्रीय हिंदी दैनिकाने आठवडाभर आधी दिले होते. लग्न कार्य म्हटले की, कपडे, मंगल कार्यालय, मंडप, बँडबाजा, साऊंड, घोडी, फटाके, पंचपक्वानांचे जेवण, अशा ब-याच कामांना चालना मिळते.
वास्तविक सध्याच्या काळात लग्नकार्याचे स्वरूप फार बदलून गेले आहे. पूर्वीसारखे ८ ते १० दिवस लग्नकार्य, त्याचे विधी पार पाडणे, अनेक समाजात ४ ते ७ दिवस वरात थांबविणे, त्यांचे आदरातिथ्य करणे, कपड्यांचे आहेर देणे-घेणे आदि लांबलचक विधी व कार्यक्रम आता छोट्या स्वरूपात व्हायला लागले आहेत.

आताच्या काळात लग्न कार्यासाठी वेळ कमी दिला जातो, परिश्रमही कमी पडतात, वंâत्राटे देऊन व्यवस्था केली जाते. स्टँडर्डपणा दाखविल्या जातो, कुटुंबातील व्यक्तिंसाठी ड्रेस कोड असतो, नवरदेवासाठी चारचाकी गाडीचा वापर केल्या जातो, असे अनेक बदल झाले आहेत. काळानुरूप लग्नाच्या पत्रिकांचे (लखोटा) स्वरूप बदलले. अनेक मोठ्या घराच्या लग्नपत्रिकेसोबत ड्रायफ्रुट वाटणे सुरू झाले. मध्यमवर्गियांच्या पत्रिकेत कपड्यांचा आहेर स्वीकारल्या जाणार नाही किंवा कपड्यांचा ‘आहेर बंद’ची छापील सूचना दिसू लागली. तर काही पत्रिकांवर ‘लग्नात दारू पिऊन येवू नये’ अशीही सूचना आढळून येते. काहींनी वृक्षारोपणाचा, पर्यावरणाचा, बेटी बचाओ, असे सामाजिक संदेश छापून लग्न पत्रिकेतून जनजागृती केली आहे. कोविड काळात तर लग्नकार्याच्या प्रत्यक्ष पत्रिका न देता, व्हाट्सअ‍ॅपवर वधु-वरांना आपण आहात तेथूनच आशीर्वाद द्यावेत, असेही नमूद केल्याचे दिसून आले. थोडक्यात लग्न होत आहे, एवढाच संदेश पोहचवायचा उद्देश यशस्वी झाला. ऑनलाईनचा परिणाम संपूर्ण लग्न कार्यात जाणवू लागला. अनेकवेळा तर मुला-मुलींनी आपसात अगोदरच पसंती करून प्रेम केले असल्याने आई-वडिलांनी त्यांचे होणारे ‘लव्ह’ मॅरेजचे ‘अरेंज’ मॅरेज करून देण्याचे प्रकार घडले आहेत. तर नोंदणी विवाह पध्दतही वाढत आहे.

मोठ्या घरचे किंवा प्रामुख्याने राजकीय नेत्यांकडील लग्नकार्यात मान्यवरांचे सत्कारांची पध्दती रूढ झाली आहे. तसेच खास लग्नकार्याचे निवेदन, संचालन करणारे साहित्यिक, पत्रकार यांची सेवा घेण्याचे प्रकारही होत आहेत. वास्तविक सत्काराच्या प्रकाराने लग्नकार्य उशीरा व रटाळ होते, पाहुण्यांचा नाहक वेळ जातो, वगैरे कुजबूज होत राहते. मात्र या तक्रारीकडे आयोजक कुटूंब लक्ष देत नाहीत. तेव्हा अशा ठिकाणी लग्नाची वेळ न पाळणे, उपस्थितांचा अधिकचा वेळ खर्ची घालणे, अक्षदा म्हणून वापरलेल्या धान्यांची नासाडी होणे, खूप फटाके वाजवून, डीजेमुळे आवाज प्रदूषण होणे, अशा काही प्रकारांकडे दुर्लक्ष करणेच सोयीचे ठरते. कारण ‘लग्न एकच वेळ मोठ्या गाजा-वाज्याने होते’. तसेच आजकालची मुले ऐकत नाही’, अशा सबबी यासाठी सांगितल्या जातात. तसे लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खासगी बाब असली तरी चारचौघात उघडपणे, उत्साहाने करावयाचा कार्यक्रम आहे. ऐपतीपेक्षा जास्त खर्च करणे, बडेजावपणा मिरविणे, वेळप्रसंगी लग्नासाठी कर्ज काढणे, आदी गोष्टी पूर्वीपासून केल्या जातात.

लग्नाात खूप जास्त खाद्य पदार्थ ठेवणे, त्यात अन्न वाया जाणे वगैरे प्रकार कमी व्हावेत म्हणून काही शहरातील समाज-जाती निहाय मंडळांनी लग्नात एवढ्याच संख्येने गोड पदार्थ ठेवावे, असे ठरविले. समाजातील गरिबाला मोठ्या श्रीमंतांचे लग्न पाहून लज्जास्पद वाटू नये, म्हणून असे केल्याचे कारण सांगितल्या गेले. तर यामुळे उधळपट्टी, अन्नाची नासाडी, थांबविण्याचा एक छोटासा प्रयत्न झाला, असे म्हणता येईल.एकूणच लग्नकार्यात अनेक सकारात्मक बदल काळानुरूप झालेत तर नोंदणी विवाह, कमी खर्चात लग्न, साध्या पध्दतीने लग्न, अक्षदा म्हणून पुâल पाकळ्यांचा वापर, वगैरे अनेक प्रकार वाढले आहेत, जे समाजहिताचे आहे. आता सामुहीक विवाह सोहळे वाढले पाहिजेत, तसेच ‘एक गाव एक गणपती’ प्रमाणेच ‘एक गाव एक लग्न तिथी’ अशी नवी संकल्पना रुढ व्हावयास हवी. तसेही लग्नकार्यात अनेक खर्च नाहक केल्याचे वाटत असते. शेवटी याबाबत एक शेर आठवतो…

फिजूल लगने लगे है सारे शौक मेरे,
जब से जिंदगीने अपनी कीमत बताई है।
– – – राजेश राजोरे
खामगाव, जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here