रात्र काळी घागर काळी

0
रात्र काळी घागर काळी

रात्र काळी घागर काळी
 
प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, हेही आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती.

मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले, “मी काळी”. वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली. “मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !”

आपण घरांतल्या लग्‍नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या ‘कृष्णा’ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंद नाही. तो साफ सांगतो “माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे.
या गाण्याबद्दल एक कथा अशीही –  हे गाणे संत  नामदेवांनी नव्हे तर विष्णुदास नामा यांनी लिहिले आहे असेही मानले जाते 
 
विष्णुदासनामा हे एकनाथांच्या काळचे ! संत नामदेव महाराज वेगळे !! विष्णुदास म्हणजे विठ्ठलाचे दास. कृष्णाचे काळे रुप संतांना प्रिय होते. काळा रंग म्हणजे सर्व रंगांचे एकत्रीकरण. डांबर काळे असते त्यापासून सर्व रंग निर्माण करतात. सर्व मूळ रंग एकत्र केले की पुन: काळा रंग तयार होतो. यमुनेचे जळ काळे, घागर काळी.

जे आणायचे ते काळे ज्यातून आणायचे ते काळे, जो आणतो आहे तोही आता काळाच. आता एवढे झाल्यावर वरपांगी रुप तरी वेगळे कशाला? त्यामुळे वस्त्रे ,अलंकार हे ही सर्व काळेच भासत आहेत. असे असताना परत ‘एकले न जाता मुर्ती दुजी’ बरोबर कशाला?

त्याचे कारण जरी सर्वत्र एक रंग झाला तरी भक्तिचा आनंद हवा असेल तर पुन: द्वैत हवेच. या साजणीने कृष्णाला नव्यानेच समर्पित केले आहे. त्याच्या बरोबर एकरुपता असली तरी त्याला सतत बरोबर तर ठेवायचे आहे.. मुंगी स्वत: साखर झाली तर तिला साखरेची गोडी कशी कळणार म्हणून साखरेपासून भिन्न अशी मुंगी होऊन साखर खाण्याचा आनंद ही हवा आहे.

काळ्या फळ्यावर काळ्या खडूची रेषा कधी दिसेल का? म्हणून काळ्या रंगावर पांढरा खडू उत्तम. मनात अद्वैताची भावना राखायची पण बाह्यत: मात्र द्वैत ठेवायचे. मुर्ती बरोबर घ्यायची. अद्वैतातून विष्णुदासनामा विशिष्टाद्वैताकडे वळतात पुन:!
.
या विठ्ठलाचे दुसरे नाव पांडुरंग ! म्हणजे पंढुर रंगाचा किंवा श्वेत वर्णी. पांढऱ्या वर्णातही सर्व रंग असतातच. काळा व श्वेत असे दोन विरुद्ध रंग दिसले तरी गुणात्मकरित्या दोन्ही एकसारखेच.
.
ईश्वराशी एकरुप झाल्याची अनुभूती असलेले बरेच संतकाव्य आहे. ‘अवघा रंग एक झाला’ किंवा ‘पाया पडु गेले तव पाऊलचि ना दिसे…समोर की पाठीमोरा न कळे’ हि काही मोजकी उदाहरणे. हे सर्व संत प्रत्यक्षानुभूतीने जगले आपण केवळ शब्दालंकारांचे धनी !
 
 
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही ?
 
रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥

बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥

मी काळी काचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥

एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
रचना-संत नामदेव/ विष्णुदास नामा
संगीत-दत्ताराम गाडेकर
स्वर – गोविंद पोवळे ,  प्रभाकर नागवेकर

संदर्भ – इंटरनेट
राहुल लाळे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here