मिनी दालमिल स्वयंरोजगाराचे साधन

0

मिनी दालमिल स्वयंरोजगाराचे साधन

डॉ. दादासाहेब खोगरे, संस्कृती पाटील, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, मोबाईल नंबर 96 89 62 49 27.

कृषी प्रक्रिया होण्यासाठी डाळवर्गीय धान्य फारच उत्तम साधन आहे. त्यासाठी ग्रामीण स्तरावर चालू शकेल असा छोटा यंत्र संच असणे खेड्यातील जनतेच्या हिताचे आहे. त्यामुळे खेड्यात निर्माण होणाऱ्या कडधान्यावर खेड्यातच प्रक्रिया केल्याने वाहतुकीचा तसेच हाताळणीमुळे होणारा खर्च वाचवून कमी किमतीत डाळ तयार करता येते. कमी भांडवल लागत असल्याने असे उद्योग खेड्यात स्थापन करणे शक्य आहे. ग्रामीण भागात उद्योग स्थापन केल्यामुळे रोजगार निर्मिती होईल व शेतकरी उद्योजक बनेल.
तुरीवर प्रक्रिया करून तुरदाळ बनविणे असे या उद्योगाचे स्वरूप आहे. या उद्योगास ग्रामीण भागात खूप वाव आहे. तूर डाळीची मागणी वाढत्या लोकसंख्या सोबत वाढणारच आहे. रात्रंदिवस कष्ट करून शेतकरी उत्पादन करतो त्यावर व्यापारी कारखानदार अल्पशा प्रक्रिया करून तीच वस्तू बाजारात भरमसाठ किमतीने विकतात.

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालावर अल्पशा प्रक्रिया करून जास्त दराने मालविक्री करण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची आवश्यक यंत्रसामग्री असणे किंवा ती खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नसते. त्याचाच फायदा शहरातील मोठे व्यापारी घेतात. ज्या ठिकाणी मालाचे उत्पादन होते तिथेच त्या मालावर आवश्यक ती प्रक्रिया करून बाजारात विकल्यास त्याचा फायदा मूळ उत्पादकास म्हणजे शेतकऱ्यास मिळेल व पर्यायाने तो ग्राहकास मिळेल. तुरीपासून डाळ तयार करताना तुरीवर प्रक्रिया करून प्रथम टरफले वेगळी करावी लागतात. भरडून ती टरफले वेगळी करतात जेव्हा जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची डाळ व कमीत कमी चुरी व पावडर मिळेल तेव्हा भरडण्याची क्रिया उत्तम आहे असे म्हणता येईल.

क्षमतेच्या दृष्टीने डाळ उद्योगाची दोन प्रकारात विभागणी करता येईल एक चक्कीवर डाळ तयार करणे व दुसरी मोठ्या डाळमिल मध्ये तयार करणे. ही दाळमिल तुरीच्या प्रति प्रमाणे 72 ते 75 टक्के उतारा देऊन वर्षभरातून 150 ते 250 दिवस अविरत चालू शकते. त्याची क्षमता दिवसाकाठी 10 क्‍विंटल तुरीवर प्रक्रिया करण्याची आहे. तसेच मोठ्या डाळ मिल मध्ये तयार झालेल्या डाळीची सहज सुलभ तुलना करू शकेल असे उत्पादन हे संयंत्र देऊ शकते.

डाळ तयार करण्याचे तंत्र:
बाजारातून आणलेल्या किंवा शेतात तयार केलेल्या तुरी एकसारख्या आकारमानाच्या नसतात. त्यात थोडा काडीकचरा, माती, अपरीपक्व दाने तसेच लहान खडे वगैरे असतात. त्या स्वच्छ करून एक सारख्या आकारमानाचे दाणे वेगळे करणे आवश्यक असते. कारण बारीक आणि अपरिपक्व दाण्यापासून मिळणारी डाळ हलक्या प्रतीची असते. अशी डाळ चांगल्या डाळीत मिसळल्याने सर्व डाळी ची प्रत बिघडते. म्हणून डाळ बनवण्यासाठी वापरात आणलेल्या तुरी एकसारख्या आकारमानाच्या असणे गरजेचे आहे. त्यालाच प्रतवारी असे म्हणतात. तुरीची प्रतवारी करून डाळ तयार केल्यास जास्त फायदा होईल. तुरीची प्रतवारी करण्यासाठी धान्याची प्रतवारी करणाऱ्या मशीन चा वापर करावा.

डाळ मिलचा प्रतिदिन खर्च खालील प्रमाणे आहे:
1.तुर: 8 क्विंटल
2.विज: 20 युनिट

  1. तेल: 3.5 किलो
  2. मजूर: 2
  3. इतर किरकोळ खर्च:150 रुपये डाळ मिलचे प्रतिदिन उत्पादन खालील प्रमाणे आहे
    1.तूर डाळ: 6 क्विंटल
    2.चुरी: 0.4 क्विंटल
    3.टरफले व भुसा:1.6 क्विंटल

मशीन साठी काही आवश्यक बाबी खालीलप्रमाणे आहेत.

*मशीन स्वच्छ ठेवा
*दर पन्नास तासांनी सर्व पट्ट्याचे तान तपासून घ्यावे
*दर पन्नास तासांनी सर्व नट बोल्ट आवळून घ्यावेत
*दर 100 तासांनी बेरिंगला ग्रीसिंग करावे
*दर एक हजार तासांनी मशीनच्या रोलर वर यमरीचा थर चढवावा
*मशीन सोबत जास्तीचा एक रोलर घ्यावा जेणेकरून आधीचा रोलर उतरल्यास ताबडतोब बदलता येतो.
*तेल वेळोवेळी द्यावे
*मशीनचे नटबोल्ट वेळोवेळी कसून घ्यावे
*मशीनच्या सर्व पटयामधील तान नेहमी तपासून घ्यावा
*चांगल्या उताऱ्या करिता प्रतवारी केलेल्या कडधान्यांचा वापर करावा
*मशीन हवेशीर खोलीत ठेवावी
*मशीनच्या आकारानुसार चाळणीची निवड करावी
*तेलाच्या टाकीमध्ये तेलाची पातळी नेहमी तपासून घ्यावी
*आवश्यकतेनुसार तेलाच्या नळाची तोटी उघडी करावी
*प्रक्रिये करीता कडधान्यातील ओलाव्याचे प्रमाण आठ ते दहा टक्के असावे
*मशीन बंद केल्यानंतर तेलाची टाकी रिकामी करावी व मशीन सुरू करण्याअगोदर ती भरून घ्यावी.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here