मानवतावादाच सत्य ! दावी आण्णाचे साहित्य !

0
मानवतावादाच सत्य!दावी आण्णाचे साहित्य !

मानवतावादाच सत्य ! दावी आण्णाचे साहित्य !

ज्यांच्या जिवनात जन्मा पासुन कष्ट ! तयाचा जन्म दिन एक ऑगष्ट ! कष्टाचे ते दिस! साल एकोणीशे वीस !

अठराविश्व दारिद्र्य जगणे कष्टाचे लई ! त्यातुन सुटले तो दिन अठरा जुलई !अवघ्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर गेले नाही याचे उत्तर ! साल मात्र आठवते एकोणीशे एकोणसत्तर!

आण्णा भाऊच साहित्य हे केवळ
माझ साहित्य म्हणून नव्हत.तर माझी माणस म्हणुन माणसाच जगण हे स्वतःसाठी नसत तर ते माणसान माणसासाठी जगण असत.याची दिशा उकल करून दावणारे बहुआयामी साहित्य.

आज आम्ही आमच जगण जगत आहे मी ,माझा समाज,माझा धर्म म्हणुन जगतो.धर्माच्या,जातीच्या, राजकिय पक्षाच्या नावावर अनेक झेंडे घेऊन मिरवित असतो.एवढे नव्हे तर महान विभुतीना केवळ त्या जातीत जन्माला आले.म्हणुन अरे कोंडला कोंडला देव रावळी कोंडला असे त्या महापुरूषाच्या विचाराना बंदिस्त ठेवुन जातीच्या लक्ष्मण रेषेत ठेवतो “अप्रतिम व्यक्तीमत्वाना आम्ही विशिष्ट प्रतिमेच्या चौकटीत बंदिस्त करून ठेवतो.”

या महान पुरूषानी माणुस म्हणुन जन्माला आलेला प्रत्येकजण माझा माणुस म्हणून माणसासाठी झिजले.रंजल्या गांजल्याचे झाले. तेच आण्णा भाऊनी आपल्या अमाप साहित्यातुन सांगितले. आण्णा भाऊचे साहित्य ना गुढ कथा,ना भय कथा,ना दलित,ना ललित तर ते मानवी जिवनाचे एकदुसऱ्याशी निगडीत असे पैलु उलगडून जगण्याचे मानवतावादी साहित्य मानवी जिवनाच्या कोंदण्यातील शब्दाचे रत्न जडीत असे असल्यामुळे आण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने जगातील श्रेष्ठ असे साहित्यरत्न आहेत.फकिरा जेव्हा वालु आईला लुटीची गुटी देतो त्यावेळचे वर्णन त्यांच्या प्रत्येक कथानकात मायेचा गोडवा असल्यामुळे आई हि जग प्रसिध्द कादंबरी लिहणारे मॅक्झिम गौर्की हि उपाधी आण्णाभाऊना रशियाने दिली.

आण्णा भाऊच्या साहित्यातील नायक रांगडी होती परंतु बेगडी वृतीची नव्हती.अस्सल जिवंत काडतुस त्यामुळे अस्सल शब्दाना कस लावणारे असे आण्णा भाऊचे साहित्य चारभिंतीच्या आत टेबल खुर्चीवर लिहले नव्हते तर चार भिंतीच्या हि पलिकडे जाऊन क्षितिजा पलिकडचे मानवी जिवनाचा शोध घेऊन बोध सांगणारे आहे त्यामुळे ते अजरामर राहणारे असेच आहे.

मानवता,जात,धर्म, पंथ या पलिकडे जाऊन माणसाने माणसाकडे पाहणे.हेच बरबाद्या कंजाऱ्याच जगण आण्णा भाऊनी लिहल खर तर समाज व्यवस्थे मधील अत्यंत तळात जगणारा माणुस तो ज्या वस्तीत राहत होता.ती वस्ती त्याच्या जातीच्या धर्माची नव्हती तर ती होती माणसाच्या जातीची तेथे नुसते कंजारी नव्हते तर फासे पारधी,डवरी भिकारी डोंबारी वडारी बेलदार,घिसाडी गारूडी हि माणस कधी भांडत होती तंडत होती पण शेवटी माणुस म्हणून एकमेका बरोबर राहुन जगत होती जगण म्हणजे तरी कागद जुने पत्रे कुजक्या फळ्या सडलेली बारदान देह जगवण्यासाठी दिवसभर उभ्या असणार्‍या देहाला केवळ हि सृष्टी अंधारात विश्रांती घेते म्हणुन देहाला आडवा होणारा तो निर्णय निवारा.माकडीच्या माळाच कथानक देखील एकतेच

निळू मांग या कथेतील नायक स्वतःसाठी जगत नसतो.तर आपल्या शब्दातील विश्वासाला बरोबर घेऊन माणुसकीसाठी जगत असतो .त्याला तोफेच्या तोंडी देताना इंग्रज अधिकार्‍यां मधील मानवता देखील जागी झाली होती.कारण निळू मांगाच जगण हे धन्याला दिलेल्या शब्दापायी जगणार होत.तोफेच्या तोंडी जाणार्‍या निळू मांगाकड पाहुन वरिष्ठ अधिकाऱ्यांला काळजी वाटु लागते ते दुःखी स्वरात प्रभुकडे निळू मांगासाठी प्रार्थना करतात.निळू मांगाशी झालेल्या संवादातुन त्यांना निळू मांगाचा जगण्याचा अर्थ समजतो. व ते त्याला निर्दोष म्हणून सोडुन देतात.सुटलेला निळू कोयना नदीचे ऋण मानतो.तो मानवाशी सृष्टीशी किती एकनिष्ठ असतो हे वास्तव.

फकिरा कादंबरीतले नायक हे फकिरा असले तरी फकिरा उर्जा स्रोत त्याच्या धमन्यातील रक्त हे राणोजीच होत.राणोजी हे गावसाठी लढले. वाटेगावच्या शेजारच्या शिगावात जोगणी निघणार होत्या.अन वाटेगाव मात्र अंधारात निपचित पडला होता.या वेदना उराशी घेऊन शंकर पाटील असताना राणुजीच्या घोड्याच्या टापाच्या आवाजाची फुंकर त्यावर घातली जाते.राणुजीच्या प्रतिसादाने जेव्हा शंकर पाटील मनातल्या भावनाना वाट मोकळी करतात त्यावेळी गावासाठी प्रत्यक्षात मृत्युच्या वाटेने जाण्याला राणोजी केवळ तयारच होत नाही तर दिलेल्या वचनाला स्वतःसाठी न जगता गावासाठी जगायला तयार होतो जेव्हा राणोजीच्या डोळ्यापुढे आई आबा फकीरा साधु राधा याच काय हा प्रश्न उभा राहतो तोच तो त्या प्रश्नाच उत्तर शोधतो.काय होत.जगतील ती आपण नव्हतो तेव्हाही माणस जगत होती.पुढ हि जगणार गावावर उपकार करणारा माणुस इथ जन्माला आला याची खात्री विष्णुपंताला वाटल्यावर आनंद होईल

मरणात खरोखरच जग जगते. गावाच्या जत्रेसाठी राणुजीने स्वतःचा प्राण दिला होता. शतकानुशतकाच अंतर संपुष्टात आल होत.घरातल्या माणसासाठी चिकाटीन झटाव तस वाटेगाव झटु लागल.प्रत्येक माणुस हळहळत होता बापु खोताच्या दगाबाजीवर चिडला होता.
तसा राणोजी बळी जातो तो हि बापु खोत्याच्या कपटनितीने हि कपटनिती कळल्यावर मात्र बाबाजी खोत आपल्या मुलाला दोषी ठरवतो.एक अनितीने वागला तरी गाव नितीने वागतो हिच माणसान माणसासाठी जगण्याची निती आहे.

फकिराची आई राधा हि चौघुल्याच्या शेतात मोडणी चालली हे कळताच शंकर पाटील अपराधिक भावनेन गावाच्या वतीने दौलतीला म्हणतो, ज्यांन गावासाठी बलिदान दिल त्यांच्या राधाने मोडणीच्या कामाला जाव.हे पटत नाय, दाण्याचे चार पाच पोती घे पुन्हा कधी राधाला कष्ट पडतात हे गाव सहन करणार नाय.ज्यान गावासाठी प्राण दिला त्याची अब्रु हि जगाच्या मोलाची आहे.माझ इमान राधाच्या पासंगाला हि पुरणार नाही.

वारणेचा वाघ कथानकातील नायक सत्तु भोसले सत्तु हे पांदिन घराकड निघाला होते.एकाएकी पांदीत एका बाईन बोंब ठोकली सारा वारणाकाठ थरथरला होता. वातावरण अधिकच तंग झाल सत्तुने तिकडे धाव घेतली एका तरूण गरोदर महारणीने मथाची चौघुल्याचा अपराध केला होता. भर उन्हात त्याच्या कुंपनाची नांगी उपटली होती.चौघुल्या तिला जुमानुन लाथा घालीत होता.ती ओरडत होती.काट्यात तिला लोळवल जात होत आपल्या पोटावर लाथा लागु नये म्हणुन ती पोट दडवित होती.चौघुल्या तिला इतका मारत होता की,ती मरत कशी नाही.याचीच त्याला चीड आली होती.

हे पाहुन सत्तुला असह्य झाल त्यांन चौघुल्याला कुपापायी माणुस मारण बर नव्ह.ती गरोदर आहे. हे सांगुन पाहील तरी चौघुला ऐकत नव्हता.सत्तुने आता फरशी हवेत उडवुन एका दणक्यात चौघुल्याची खांडोळी केली.निरापराध निष्पाप सत्तु मानवतेसाठी अपराधी झाला होता. सत्तु आता रंजल्या गांजल्याचा कैवारी झाला होता. कैक बहिनीचा धर्माचा भाऊ झाला.

मथाजी चौघुल्याचा मुलगा उमा चौघुला सरकारला भिडला होता. सरकार आता सत्तुच्या पाळतीवर होत.बहाद्दुरवाडीतल्या भेदीने घात केला.सत्तु वेढले गेला.सत्तु आता कुमक हवी होती.त्यांनी फकिराला सांगावा धाडला.त्याच सरशी फकिरा आला.फकिरा सत्तु एकत्र आल्यावर सत्तुन फकिराला मिठी मारली सत्तु फकिराला म्हणाला (पुर्वी मांग रामोशी यांना नाईक म्हणायचे)नाईक तुम्ही आला म्हणून हा सत्तु वाचला. आता तुम्हाला भाझ्या कैक आया बहिनी हा सारा वारणाकाठ दुवा देईल तसा फकिरा म्हणाला ह्यो दुवा देण्याचा सवाल काय दगडाला दगडाची गरज लागते आम्ही तर माणस हाय

तसा सत्तु म्हणाला अशी माणस थोडी असतात तुम्ही माझ्यावर उपकाराचा डोंगरच रचला.
अशी हि मानवता जपणारे आण्णा भाऊच्या कथेतील नायक
आण्णा भाऊचे साहित्य हे आता केवळ कागदावरचे साहित्य न राहता ते परिवर्तनाच्या वाटेने जगण्याचे साहित्या झाले पाहिजे.
आज जे आम्ही जाती पातीच्या कोंढाळ्यात अडकलो त्यातुन बाहेर पडुन परिवर्तनाची वाटचाल करायला निश्चितच एक आदर्श वादी ठरणारे आहे.

गावोगावी वाटेगावच्या शंकर पाटला सारखे शंकर पाटील , विष्णुपंत व्हा.गावगाड्याच्या इभ्रतीसाठी मांगाचे राणोजी फकिरा पुढे येतील.अन्यायाची चिड निर्माण होणारे कुंभोजचे सत्तु भोसले व्हा.मथाजी चौघुला उमा चौघुला होऊ नका.सत्तु भोसले संकटात असताना तरणाबांड फकिरा आपली कुमक घेऊन मदतीला येईल अशा वेळी ब्रिटीश सत्ते सारखी सत्ता देखील हतबल झाली होती तर आजची सत्ता देखील हतबल होईल

एवढेच नाही तर बापु खोताने विश्वासघाताने राणोजीला मारले हे कळताच बाबाजी खोत बापु खोताच्या स्वतःच्या मुलाच्या कानशीळात मारतो व वाटेगावाला शरण जातो.असे न्यायाची कड घेणारे बाबाजी खोत व्हा. मानवतेचे पुजारी व्हा!साहित्यरत्न डाॅ.आण्णा भाऊच्या विचाराचे पाईक व्हा.सामाजिक परिवर्तनाचे नाईक व्हा! साहित्यरत्न आण्णा भाऊच्या पोवाडा,लावणी, नाटक, लोकनाट्य,प्रवास वर्णन कथा कादंबरी या साहित्याचे करा वाचन!वाचन!!वाचन!!!
हेच आण्णा भाऊना अभिवादन !अभिवादन !!! अभिवादन!!!
आण्णा धगाटे जेष्ट साहित्यिक / सामाजिक कार्यकर्ता

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here