मला काही होणार नाही म्हणून मरणाला सामोरे जावू नका, मरणाची भेट घेऊ नका

0

मानवता, सेवा हाच परमोधर्म, सुरक्षितता, शिस्त हेच पुण्य कर्म
संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट आले असता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वीही अनेक साथीचे रोग आले. त्यामध्ये हजारो माणसे दगावलीही. तत्कालीन शासन यंत्रणेने या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले. आजच्या आणीबाणीच्या परिस्थितीत शासन यंत्रणा नियोजनबध्द प्रयत्नांना या महाभयानक संकटाचा सामना करीत आहे. निसर्गाची परिसंस्था साखळी बाधीत झाली की संकटे कोसळतात. मानवाच्या अतिहव्यासाने हवा, पाणी, जमीन, अन्न प्रदूषित झाल्याने तसेच विकासाच्या नावाखाली जंगलाची प्रचंड तोड केली, अतिक्रमण केले. त्यामुळे प्रदुषण वाढले. औद्योगिकीकरणामुळे विषारी वायूंनी वातावरण खराब झाल्याने निसर्ग परिसंस्था बाधीत झाली. मानवास अनेक आजारांना, अडचणींना तोंड द्यावे लागत असताना त्याच्या प्रतिकार क्षमता कमी झाल्या.

विषाणूंचे आजार प्रामुख्याने श्‍वसन संस्थेवर हल्ला करीत असल्याने त्याचा संसर्ग आणि दुष्परिणाम प्रचंड वेगाने पसरतो. कोरोना हे असेच संकट मानवजातीवर हल्ला करत असताना आपण कसे वागावे, काय करावे. या संकटातून स्वयंशिस्तीने बाहेर पडत असताना इतरांनाही कसे सहाय्यभूत व्हावे यासाठी आजच्या लेखाचा उद्देश आहे.
चीन देशात वुहान प्रांतात कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा संसर्गजन्य आजार इतर देशातही पसरला. या आजाराने चीन देशाचे प्रचंड नुकसान झाले परंतू चीनने हा महामारी रोग आटोक्यात आणला. मात्र इटली, स्पेन, अमेरिका या देशात आज लाखो लोक या आजाराने बाधीत होत असताना हजारो लोक रोज मरत आहेत.

ही भीषणता भारतीयांनी समजून घ्यावी. आपल्याबरोबर इतरांना व देशालाही सुरक्षीत करावे यासाठी सक्तीचे विलगीकरण अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक खेड्यातील, शहरातील कुटूंबियांनी स्वतःच्या घरात काही दिवस सुरक्षित रहावे. कुणीही, कोणत्याही कारणाने अहंकाराने किंवा वेडेपणाने बाहेर पडू नये. कोरोणाचा संसर्ग कोठे होईल, कसा होईल हे काहीच सांगणे शक्य नसल्याने विनाकारण बाहेर पडलेल्या एखाद्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली की नाही हे लवकर समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा त्याच्या घरातील शेजारी, तसेच कोरोनाबाधीत व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आल्या त्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते.

संपूर्ण मानवजातीला या भयानक संकटाने वेढा दिला असताना काही जाती पंथाचे, धर्माचे लोक त्यांचा वेडेपणा दाखवून या संकटाची शिकार होत आहे. काही प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी गर्दी दिसत आहे. प्राणापेक्षाही धर्माला महत्व देणार्‍या धर्ममार्तंडांना आम्ही सांगू इच्छीतो की देव, धर्म, जाती मानवाने त्याच्या सोयीने, सोईसाठी केलेल्या व्यवस्था आहेत. संकल्पना आहेत.

कोणत्याही व्यक्तीने आपला धर्म, कर्मकांड, जात, पंथ हा घरातच उंबर्‍याच्या आत ठेवला पाहीजे. जागतीक संकटाच्या काळात सर्वांनी स्वतःच्या उपासना, प्रार्थना, धार्मिक सोहळे बंद करावेत. शक्य नसेल तर घरातच करावेत. आपण भारतीय आहोत हीच आपली जात, धर्म व ओळख असली पाहिजे. अत्यंत कठीण आणीबाणीचे प्रसंगी आपण काय केले पाहीजे हे काही धर्मवेड्यांना समजत नसेल तर कायदेशीर कारवाईने स्थानबध्द करणे हेच सर्वांच्या हिताचे ठरेल. कोणताच धर्म मानवता नाकारीत नाही. सेवा नाकारीत नाही. करुणा, प्रेम आणि सेवा ही शिकवण देणारा मानवता सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणीबाणीच्या काळात सर्वात सेवाभावी कार्य करतात ते शासन यंत्रणेतील पोलीस, आरोग्य विभाग, महसूल विभाग कायदा व सुव्यवस्था शिस्तीत ठेवण्यासाठी शासन यंत्रणा कार्यरत असताना त्यांच्या रुपातील देवच सर्वांची काळजी घेत असतो.

स्वतःच्या जीवाचा धोका पत्करुन, कुटूंबाला बाजूला ठेवून रात्रंदिवस बाधीत रुग्णांची काळजी घेणारे वैद्यकीय यंत्रणा परमेश्‍वर आहेत. बारा तास उन्हात बंदोबस्त करणारे पोलीस आणि संसर्गाचा धोका पत्करुन स्वच्छता करणारे आरोग्य कर्मचारी हे सुध्दा परमेश्‍वराचीच रुपे आहेत. या सेवाभावी यंत्रणांना त्रास देणारे, कायद्याचे उल्लंघन करणारे, टोळक्याने त्यांना मारहाण करणारे राक्षस हे दंडीत झालेच पाहीजेत. अनेक अंधश्रध्दांनी बाधीत असलेले वैद्यकीय सेवा नाकारुन स्वतःच्या मृत्यूबरोबर इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असतील तर अशा राक्षसांना त्वरीत दंडीत केले पाहीजे.

सामाजिक सुरक्षितता व शिस्त हा चांगल्या नागरीकरणाचा वस्तूपाठ असतो. सर्वांच्या हितासाठी, आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी शासन वारंवार घरात थांबण्याचे आवाहन करीत असेल तर सुज्ञ नागरिकांनी शिस्त व सुरक्षितता म्हणून कुटूंबियांसहीत घरात थांबलेच पाहीजे. अत्यावश्यक सुविधांव्दारे घरात बसलेल्या नागरिकांना शासन, सेवाभावी संस्था, कार्यकर्ते मदत करतच असतात. मोबाईल व्दारे संपर्क यंत्रणा अतिशय सजग आहेत. असे असले तरी काही गैराट व सैराट व्यक्ती, व्यक्तीसमूह शिस्तीचा व सुरक्षिततेचा भंग करतात तेव्हा सभोवतालच्या सुज्ञ व्यक्तींनी, समाजाने त्यांना अटकाव केला पाहिजे.

शासन यंत्रणेस कळविले पाहीजे. सुज्ञ व्यक्तींचा एकविचारीपणा विकृत व वेड्या विचारांना रोखू शकतो. हा विश्‍वास ठेवला पाहीजे. सर्व शासन यंत्रणा नागरिकांना घरातच थांबून राहण्याचे सतत आवाहन करीत असताना आपल्या मृत्यूचा, संकटाचा मुकाबला करण्यासाठी निर्धाराने घरातच राहीलो तर ती सुध्दा एक प्रकारची देशसेवाच आहे. आपली राष्ट्रसेवा व्यक्त करण्याची फार मोठी संधी या संकटामुळे आपल्याला मिळाली आहे. आजच्या संकटकाळात झोपडपट्टीत रहाणारे गरीब नागरीक, अपंग, निराश्रीत व्यक्ती, भिकारी, रोजंदारीचे कामगार या सर्वांना सहकार्य करणे हीच खरी इश्‍वरसेवा आहे. मानवता आहे.

अनेक सेवाभावी संस्था व व्यक्ती स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता सेवा करीत आहे. त्यांचे ऋण समाजाने मानलेच पाहीजे. संतांनी, धर्मगुरुंनी आणि समूपदेशकांनी निष्काम सेवेला अतिशय महत्व दिले आहे. संपूर्ण मानवजात एक समजून सेवा करणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम, राष्ट्रसंत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद या सर्व महान व्यक्तींनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी समर्पन केले.

संत ज्ञानेश्‍वरांनी विश्‍वात्मक देवाला आवाहन केले आहे. मानवजातीला सुखाची मागणी करीत असताना ‘येणे वरे ज्ञानदेवो सखीया जाहला’ असे म्हटले आहे. आपले व्यक्तीगत विचार, धर्म, जात, पंथ घरातच ठेवले पाहीजे. आपली व्यक्तीगत उपासणा घरातच ठेवली पाहीजे. संकटकाळी सर्व मानवजात हेच दैवत समजून सेवा केली, सुरक्षितता बाळगली तर हेच कार्य पुण्यदायक आहे. याची जाण व भान ठेवून भारतीय नागरीकांनी शिस्तीने व सुरक्षित रहावे. कोरोना संकटावर मात करीत असताना सेवाभावी यंत्रणेस, शासन यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करणे हीच खरी मानवता व पुण्यकर्म आहे.

  • किसन भाऊ हासे
    संस्थापक, दैनिक युवावार्ता, संगमनेर
    मोबा. 9822039460*
    ई-मेल – [email protected]*

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here