मरण्याची कला शिकावी…

0
मरण्याची कला शिकावी...

मरण्याची कला शिकावी…

डरती है रूह यारो,
और जी भी कांपता है,
मरने का नाम मत लो,
मरना बुरी बला है।

जगण्याच्या व आयुष्याच्या बाबतीत अनेकांनी खूप काही म्हटले आहे. जगण्याची कला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हा श्रीश्रींचा अभ्यास वर्ग तर देश-विदेशात परिचित आहे. ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, असे कवी मंगेश पाडगावकर यांनी म्हटले आहे. मनुष्याने कसे जगावे? हे अनेक संत महात्मे प्रवचनातून विषद करतात. भगवान रजनीश व इतर अनेक ‘फिलॉसफर’ने आयुष्य जगण्याच्या पध्दतीवर खूप सारे भाष्य केलेले आहे.
वास्तविक आयुष्य जगणे हे खरेच सोपे आहे का? हा प्रश्न आताच्या काळात खूप गंभीर होत आहे. जगण्यासाठी काय लागत नाही? जगतांना किती जबाबदा-या सांभाळाव्या लागतात, किती त्रास होतो, ताण-तणाव येतो, विविध आजार बळावतात, एवढे सहन करून काही केले तरी त्याची किंमत होत नाही, परिश्रमाने रात्रंदिवस एक करून काही मिळविले तर नंबर दोनने, भ्रष्टाचाराने, अनितीने मिळविले असणार असे टोमणे बसतात, बाहेरचे तर सोडा घरच्यांनाही कौतूक नाही, आभार नाही, दोन चांगले शब्द नाहीत, तेव्हा ‘देवाने आयुष्य दिले म्हणून जगावे’ असे म्हणत कुंठतपणे जगणा-यांची संख्या जास्त आहे.

म्हणूनच कवी सुरेश भट म्हणतात,
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका,जगण्याने मात्र छळले होते
या असत्य जगात एकमेव सत्य शब्द मृत्यू आहे. वास्तविक मरणे ही पण एक कला आहे, ती कला शिकली पाहिजे, म्हणजे जगणे सोपे होते, असा विचार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी (२ सप्टेंबर रोजी) अवघ्या ४० वर्षाचा अभिनेता सिध्दार्थ शुक्लाचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे पार्थिवावर ब्रह्माकुमारीजच्या पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू अटळ व अंतीम सत्य आहे, तेव्हा मृत शरीराजवळ ध्यानस्थ बसणे, निघून गेलेल्या आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देणे, आत्मा ही अजर, अमर व अविनाशी आहे, हा गीतेचा उपदेश मानून रड-पड करू नये, ‘योग’ व्दारे शांतीचे दान देवून मृत शरिराचे दहन करणे, अशी ही पध्दत आहे.

अभिनेता सिध्दार्थचे कुटुंबिय ब्रह्माकुमारीजशी जुळलेले असल्याने त्यांनी ही पध्दत पार पाडली. यावेळी सुपरिचित आंतरराष्ट्रीय ट्रेनर असलेल्या ब्रह्मकुमारी शिवानी दिदीने काही गोष्टींकडे लक्ष वेधले. ‘आपण सर्व जगण्याची कला शिकू इच्छितो तर मरण्याची कला कोणी शिवूâ इच्छीत नाही, हे शिकणे तर दूर याबाबत माहिती पण नाही, वास्तविक मरण्याची कला हीच आपणाला जगण्याची पध्दत कशी असावी, हे शिकविते’, असे त्यांचे वक्तव्य होते. मरण्याची कला (आर्ट ऑफ डाईंग) बाबत बी. के. शिवानीदिदी प्रार्थना सभेत म्हणाल्या की, आपण केव्हा जग सोडणार आहोत, हे कुणाला माहीत नाही, परंतु निघून जातांना पापकर्म, दु:ख आणि पश्चाताप यांचे ओझे नको. दैनंदिन लोकांच्या संपर्कात राहिल्याने आपल्याकडून अनेक चुका करणे, क्रोध करणे, खोटे बोलणे, नाराजी असणे, असे अनेक लहान-मोठे विकर्म होत असतात.

तेव्हा यापासून वाचण्यासाठी आपणास ‘आर्ट ऑफ डाईंग’ शिकायला हवे, ज्यामुळे आपण निष्पाप जगू शकू, शेवटी आत्म्यावर ओझं होईल, असे कर्म करू नये. कोणाला माफ करायचे असेल तर आजच माफ करा व कुणाची माफी मागायची असल्यास आजच मागून घ्या, ‘आज’ चांगले केले तर ‘उद्या’ सुधारेल, ‘आज’ हाच उद्याचा आशय, वर्तमान आणि भविष्यातील आयुष्य आहे. समजा आपल्याला माहिती झाले की, दोन तासानंतर आपला मृत्यू होणार आहे. तर आपण कोणाशी भांडणार का? खोटे बोलू का? चुकीचे काम करू का? नाही ना! तेव्हा हे क्षण शेवटचे क्षण आहेत, असे समजून कार्य व कर्म करावेत, यामुळे दुसरे सर्व लोक आपल्यामुळे आनंदी व समाधानी राहतील. हे ‘आर्ट ऑफ डार्इंग’ शिकण्यासाठी जवळच्या ब्रह्मकुमारीजच्या आश्रममध्ये जाण्याचे आवाहनही बी. के. शिवानी दिदीने केले. ‘हरे कृष्णा’ इस्कॉनवालेही ‘आर्ट ऑफ डेथस्’ची चर्चा करतात.

शेवटी माणूस किती जगला? यापेक्षा कसा जगला? हेच महत्वाचे असून यासाठी समाजात सकारात्मक बदलाची गरज आहे. आणि याची सुरूवात आपल्यापासूनच करावी लागेल. मृत्युला सकारात्मकतेने सामोरे जातांना एक कवी म्हणतो…
मरना मरना सब कहे, पर मरना जाने न कोय,
अरे मरना हो तो ऐसे मरो, फिर मरना न होय…

            - - - राजेश राजोरे 
        खामगाव, जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here