मंदिरे खुली : जबाबदारी जनतेची !

0
मंदिरे खुली : जबाबदारी जनतेची !

मंदिरे खुली : जबाबदारी जनतेची !

पत्ते टूटकर पेडों से गिर जाते है,
और जब हम टूट जाते है, तो मंदिर जाते है।
हम वो है जो गिरते है, सँभलते है फिर चलते है,
जाने कैसे लोग राह के पत्थर से डर जाते है।
महाराष्ट्र राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे, मंदिरे पाडव्यापासून राज्य सरकारने खुली केली आहेत. भाविकांसाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी सरकारने भक्तांसाठी व देवस्थानसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी कोणतेही नियम पाळले जात नाहीत, असा आजवरचा एकूण अनुभव असल्याने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होणारच, असे चित्र अनेक मंदिरात पहिल्याच दिवशी दिसून आले. असे होणारच म्हणून काय मंदिरे खुली करु नयेत?

मंदिरे उघडावीत यासाठी राज्यात राजकीय पक्षांची आंदोलने झालीत. सध्याचे राज्य सरकार हे धर्मविरोधी असल्याचे आरोप झालेत, घंटानाद झाले. वास्तविक आठ महिन्यांपासून बंद मंदिरे उघडूच नये, असे काही सरकारचे धोरण नव्हते, मात्र ‘लॉकडाऊन ओपन’, झाल्यानंतर गर्दी होणे व कोरोना रुग्णांची संख्या वाढणे, हे क्रमप्राप्त असल्याने सरकार थांबून होते. परंतु भावनांचे राजकारण करण्याची परंपरा असलेल्यांनी ‘उध्दवा दार उघड’ अशी आरोळी दिली. दुसरीकडे देवधर्म न मानणा-या अनेकांनीही मंदिर उघडण्यासाठी संघर्ष केल्याचे दिसून आले. मंदिर संबंधी इतर व्यवसायाचे व्यवहार ठप्प झाले होते, ती पण एक अर्थव्यवस्था आहे, तेव्हा रोजगार वाढावा, पूर्ववत सुरळीत व्हावे, हे पण कारण त्यामागे होते. मात्र सरकारची कोंडी करण्यासाठी राजकारणच जास्त होते. त्यामुळेच मंदिरे उघडताच श्रेयाचे राजकारण झाले, तर कुणामुळे मंदिरे उघडलीत, याचे दावे- प्रतिदावे होऊ लागलीत.

दुसरीकडे विदेशात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. लंडन, इटली, स्पेन व इतर ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन झाले आहे. आपल्याकडेही जानेवारी पासून जास्त कोरोना रुग्ण निघतील, असे भाकित आरोग्य खात्याने केले आहे. तर कोरोनाच्या दुस-या फेरीची पूर्व तयारीही चालविली आहे. विशेष म्हणजे कोरोनावर ‘लस’ आलेली नसताना गर्दी होण्यासाठी कारणीभूत ठरणारे निर्णय घेणे धाडसाचे पाऊल म्हणावे लागेल. तसे भारताची १३० कोटीची लोकसंख्या त्यानुसार कोरोना रुग्णांची संख्या ८८ लाखांवर असणे, मृतकांची संख्या १ लाख ३० हजार असणे आणि ८२ लाख रुग्ण कोरोनामुक्त होणे, ही आकडेवारी पूर्वीच्या भाकीतानुसार खूप कमी आहे. मात्र ‘कोरोना नाही, निघून गेला, होणार नाही,’ हे सर्व खोटे ठरविणारी पण आहे. तेव्हा दक्षता बाळगणे गरजेचे असताना मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

मंदिरे व प्रार्थनास्थळे आस्थांची, श्रध्देची, विश्वासाची तसेच आत्मबळ वाढविण्याची केंद्रे आहेत, असे मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांना मंदिरे उघडली पाहिजेत असे वाटत होते. या उलट ही सर्व अंधश्रध्दा आहे, त्यामुळे संकट टळत नाही, व्यक्ती कमकुवत होतो, दुसरे कोणीतरी आपले भले करील, असे विचार करतो, तेव्हा अंधश्रध्देच्या या ठिकाणी जाणे नकोच, असे बोलणारेही अनेक आहेत. कोरोना काळात अंधश्रध्दा दूर व्हावी म्हणून मंदिरात गेल्यावरही कोरोना कसा झाला? असा प्रश्न उपस्थित केल्या जाईल.

तेव्हा देव, धर्म सोबत कर्म आणि फळ, पाहून उत्तर द्यावयास हवे. प्रत्यक्षात मंदिरे उघडी करा म्हणणारे भक्तांची काळजी घेणार नाहीत, तसे मंदिरे बंद ठेवणारे सरकारही फारशी काळजी घेऊ शकणार नाही. तेव्हा ‘जनतेच्या प्रकृतीची जबाबदारी जनतेची,’ हे सुत्र लक्षात घेतले पाहिजे. तसेही कोरोना रुग्णाचे बाबतीत जी दक्षता सुरुवातीला घेतल्या जायची, ती कमी झाली आहे. ‘रुग्णांना घरीच थांबा’ पर्यंतचा सल्ला देऊन कंटेनमेंट झोन कमी-कमी व नंतर नाहीच, असे झाले आहे. तर कोरोना विषयी माहिती सर्वांनाच झाली आहे, ते आता कसा बचाव करतात, हे त्यांच्या हाती आहे.

सद्यस्थितीत न्यायमंदिरे पूर्ववत खुली झालेली नाहीत. विद्यामंदिरेही खुली नाहीत, मंदिर व प्रार्थना स्थळांवर प्रवेशासाठी निर्बंध आहेत, गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच ८ महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने उत्पन्न ठप्प, रखरखावासाठी झालेला खर्च, आता नवीन निर्देशानुसार व्यवस्था करतांना वाढणारा खर्च, याची जुळवाजुळवही मंदिरांना कठीण होणार आहे. या सर्व पाश्र्वभूमिवर जनतेने आपले कर्तव्य पार पाडली पाहिजेत. तसेही कोरोनाचा प्रसार जनताच थांबवू शकते, ते पण दक्षता बाळगूणच. एव्हढे मात्र खरे!
शेवटी प्रत्येकाचे हृदयात राम आहे, त्याची जाणीव ठेवावी या आशयाचा शेर आठवतो…..
उसका बसर तुम्हारे हृदयस्थल में है,
जाग गए तो सँवेरा वरना घना अंधेरा!

मंदिरे खुली : जबाबदारी जनतेची ! राजेश राजोरे
      - - - राजेश राजोरे
    खामगाव, जि. बुलडाणा.
           9822593903

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here