भाषिक प्रतिभा लाभलेला सॉफ्टवेअर क्षेत्रातील नवसर्जक चेहरा: श्री.संदीप सुभाषराव देसले

0
भाषिक प्रतिभा लाभलेला सॉफ्टवेअर क्षेत्रातील नवसर्जक चेहरा: श्री.संदीप सुभाषराव देसले
श्री संदीप सुभाषराव देसले,सॉफ्टवेअर इंजिनिअर

भाषिक प्रतिभा लाभलेला सॉफ्टवेअर क्षेत्रातील नवसर्जक चेहरा:
श्री.संदीप सुभाषराव देसले
लेखक:सुभाष पवार

इन्फोसिस ह्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील जागतिक क्रमवारीत अग्रगण्य असलेल्या कंपनीत 15 वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून बंगलोर, पुणे सह अमेरिका, इंग्लंड ह्या देशात महत्वपूर्ण जबाबदारी निभावणारे व सध्या काँग्निझंट सोल्युशन्स इंडिया लिमिटेड, पुणे येथे सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत असलेले श्री. संदीप सुभाषराव देसले हे सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक कल्पक,गुणवत्तापूर्ण व नवसर्जक चेहरा असून काव्य क्षेत्रातील एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व आहे, असे एकंदरीत त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरुन जाणवते.अतिशय समंजस,सिन्सिअर, शांत,मृदुभाषी, हसतमुख, मनमिळाऊ व नेहमी अगोदर दुसऱ्याचा विचार मनी बाळगणारे, संयमी, मेहनती श्री. देसले हे मूळचे झोडगे, ता.मालेगाव येथील आहेत.

वडीलांच्या देखरेखीखाली शिक्षणाचा प्रारंभ

श्री. संदीप देसले यांचा जन्म पाडळदे,ता. मालेगाव येथे झाला व त्यांचे बालपण त्याच गावात व्यतीत झाले.इयत्ता पाचवी पर्यंत चे शिक्षण पाडळदे येथेच झाले. बालपणापासूनच गणित विषयात तल्लख बुद्धी,प्रारंभापासून वर्गात प्रथम क्रमांक,वडीलांचा गणित व विज्ञान हा विषय असल्याने ह्या विषयात अधिक रुची.रोज सायंकाळी वडिलांसोबत ओट्यावर बसून बे-एके-बे गिरवत उजळणी चालायची,त्यामुळे इयत्ता ५वी पर्यंतच ३० पर्यंतचे पाढे पाठ होते.वडीलांकडून गणित,विज्ञानाचे धडे घेत असतांनाच जीवनाच्या मूलभूत तत्वांचेही शिक्षण मिळत गेल्याने भावी आयुष्यात यश-अपयश ह्या दोन्ही गोष्टींकडे एकाच नजरेने पाहण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण होत गेले.
वडील कै. एस.पी. देसले हे न्यु इंग्लिश स्कूल पाडळडे येथे प्रारंभी शिक्षक व शेवटचे काही वर्षे मुख्याध्यापक होते.ते त्यांच्या सर्व भावांमध्ये लहान व तेच शिकलेले, इतर काका शेती करत. वडिलांनी सगळ्यांना आर्थिक मदत करत ,कष्ट व काटकसरीने जीवन व्यतीत करून शिक्षणाच्या पवित्र व्यवसायाशी प्रामाणिक राहून श्री. संदीप व इतर भावंडाना संस्काराचे धडे दिले.

Team in UK

विशेष प्रविण्यासह शैक्षणिक कारकीर्द

इयत्ता ५वी नंतर माळमाथा परिसरातून नवोदय विद्यालय खेडगाव येथे निवड होणारे ते पहिले विद्यार्थी होते.नवोदयमध्ये स्कॉलर विद्यार्थी असण्याबरोबरच
विल्सन सरांच्या मार्गदर्शनाखाली संगणकाचे विशेष प्रशिक्षण घेतले.तसा कॉम्प्युटर हा त्या काळी नवीनच विषय व त्यात आवड निर्माण झाली. विशेषतः फ्लोचार्ट्स व लॉजिक मध्ये खूप आवड जोपासली. प्रारंभापासूनच पहिल्या एक दोन नंबर ने परीक्षा उत्तीर्ण, इयत्ता १०वीत देखील दुसरा क्रमांक. ११ वी,१२ वी धुळे जयहिंद हायस्कूल येथे प्रवेश.नवोदयची पार्श्वभूमी असल्याने ११वीत भरघोस मार्क्स परंतु दुर्दैवाने १२वीत कमी मार्क्स,फैजपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेऊन विशेष प्राविण्याची उणीव पुन्हा भरून काढली.प्रत्येक वर्षी प्रथम श्रेणी व अव्वल,विशेष प्रविण्यासह बी ई.व कॉलेजात दुसरा क्रमांक. इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन मध्ये बी ई तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली . MISEM पुणे(महिंद्र इन्स्टिट्यूट)मधून
सॉफ्टवेअरमध्ये post graduate diploma केला.महिंद्रा ग्रुपच्या MBT व कार्निगो मेलोन विद्यापीठाशी संलग्न असा सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये लागणाऱ्या सर्व कौशल्यांवर आधारित हा अभ्यासक्रम,तोही विशेष प्रविण्याने उत्तीर्ण.

शैक्षणिक जडणघडण

नवोदयने जगायचे कसे हे शिकवले तर MISEM ने कॉर्पोरेट जीवनाचे विविध पैलू दाखवले.आयुष्याच्या जडणघडणीत कुटुंब, नवोदय व MISEM ह्या तिन्हींचा सारखाच वाटा आहे.जीवनाच्या कोणत्याही पाडावावर निराश न होता ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यात समाधान मानत प्रयत्न करत रहावे व पुढे जावे, ही वडिलांची शिकवण असल्याने १२वीला दुर्दैवाने अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले असतानाही ते हिम्मत न हारता पुढे जात राहिले व ही उणीव पुढील सर्व शिक्षणक्रमात त्यांनी भरून काढली.

Infosys Chennai Team

सुखवस्तू आयुष्याच्या अभावातही जीवनाचा मनमुराद आनंद

वडील गरीब परिस्थितीतून शिक्षक झालेले होते व एकत्र कुटुंबाच्या जबाबदाऱ्या होत्या,चुलत भावंडांच्याही शिक्षणाची जबाबदारी वडिलांकडे होती. कुटुंब मध्यमवर्गीय, सुखवस्तूंचा अभाव,सणासुदीलाच गोड धोड व्हायचे,आठवड्याला खाऊ म्हणून वाट्याला आलेले चुरमुरे व गोडीशेवच्या काही काड्या यात वेगळीच मजा होती.वडीलांना परिस्थिती अभावी इंजिनिअर होता आले नाही, मुलाने इंजिनिअर व्हावे हे त्यांचे स्वप्न होते.म्हणून श्री. संदीप म्हणतात की माझे आजचे हे यश म्हणजे वडिलांच्या कष्टाचे चीज आहे

पाडळदे गावचा अध्यात्मिक वारसा

पाडळदे गाव हे खूप धार्मिक गाव होते. भजन,कीर्तन,भारुड,प्रवचने,प्रभातफेरी,हरिपाठ, सर्व संतांच्या पुण्यतिथ्या या गावात मोठया भक्तिभावाने व ऊस्साहात होत. नित्यनेमाने दरवर्षी इंद्रपूजा व्हायची व यानिमित्ताने गावाचे वनभोजन.या वातावरणामुळे आध्यत्मिक संगत लागून अध्यात्मिक व धार्मिक बैठक जीवनास लाभली.

व्यावसायिक कारकीर्द

२००२ मध्ये प्रारंभी पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज ला प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. परंतु सॉफ्टवेअर मध्ये गोडी असल्याने एक स्टार्टअप जॉईन केली,त्यानंतर पुण्याच्या STPI मध्ये नोकरी,नाशिकच्या नव्याने सुरू झालेल्या STPI च्या अंबड शाखेत ऑफिसर-इनचार्ज म्हणून काम बघितले.त्यादरम्यान इन्फोसिसच्या लेखी परीक्षेचा कॉल आला.इन्फोसिस साठी वेगळ्या व असामान्य दर्जाचे कौशल्य लागते.यासाठी त्यांनी १०दिवस १६-१६ तास तयारी केली व शेवटी ज्या गोष्टीकडे प्रामुख्याने ओढा होता त्यासाठी ते क्वालिफाय झाले.इन्फोसिस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.

pune team

इन्फोसिस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नियुक्ती

१९ मे २००३ ला इन्फोसिस बेंगलोरला ते रुजू झाले. एका लहानशा गावातून सुरू झालेला हा प्रवास नवोदयमार्गे इन्फोसिस बेंगलोर,पुणे,अमेरिका, इंग्लंड पर्यंत कामानिमित्त वास्तव्यासह आजतागायत झालाय.१५ वर्षे इन्फोसिस मध्ये काम केल्यानंतर आता काँग्निझंट सोल्युशन्स मध्ये ‘सिनिअर मॅनेजर’ पदावर आहेत. साॅफ्टवेअर सर्विसेस मध्ये काम असल्याने नेदरलँडच्या दोन मोठ्या दूरसंचार कंपन्यांना वेगवेगळ्या देशांत देत असलेल्या सुविधांसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर सर्विसेस त्यांची कंपनी उपलब्ध करून देते.श्री. संदीप यांचे काम क्लायंट,लोक व संपूर्ण कामाचे व्यवस्थापनाशी संबंधित आहे.सध्या त्यांच्याकडे पाच ते सहा टीम असून एकूण ११० लोक आहेत जे पुणे,बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली, कलकत्ता,नेदरलँड, लॅटविया येथून काम करतात.

पुरस्कार, निवड,नियुक्ती, सन्मान

१) इयत्ता सातवी आठवीत असतानाच पर्यावरण विषयक निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार २)शालेय व कॉलेज जीवनात विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमात बक्षिस
३)झोडगे ह्या मूळ गावचा पहिला बी.ई. होण्याचा मान
४)२००३ मध्ये इन्फोसिस मध्ये निवड.
५)४ वर्षे अमेरिकेत AT&T साठी काम करण्याची संधी – २ वर्षे सॅन-रेमाँन(कॅलिफोर्निया) येथे व २ वर्षे अटलांटा(जॉर्जिया) येथे काम
६)इंग्लंडला मँचेस्टर येथे २ वर्षे नावाजलेल्या बँकेसाठी काम करण्याची संधी
७)कल्पकता व गुणवत्तेसाठी ऑफिसमध्ये ‘Brainwave award’ व ‘star of the unit award’ ह्या पुरस्काराने सन्मानित.

प्रत्येक यशामागे बुद्धिमतेसोबत परिश्रम आवश्यक

व्यावसायिक व शैक्षणिक उज्वल करकीर्दीमागे मेहनत आवश्यक आहे.कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बुद्धिमतेसोबत परिश्रमाची जोड आवश्यक आहे असे श्री संदीप सांगतात. ‘दम बडी चीज है’ ह्या वडिलांच्या वाक्याने जीवनात संयम शिकविला.जॉन हेनरी न्यूमन च्या कवितेतील एक वाक्य -” Lead kindly light, keep thou my feet. I do not ask to see the distance scene, one step enough for me” नेहमी सकारात्मक प्रेरणा देत असते, असे त्यांचे म्हणणे आहे.
सामाजिक उपक्रमात सहभाग

श्री. संदीप आपल्या कार्यक्षेत्रात उज्वल कामगिरी करत असतानाच कंपनीच्या माध्यमातून वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ह्या उपक्रमात सहभागी होतात.इतर मराठी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन त्यांना संगणकाचे,इंग्रजी विषयाचे धडे देतात.
शिक्षण क्षेत्रातील संधी व विद्यार्थ्यांचे कर्त्यव्य
श्री. संदीप सांगतात की आपल्या काळात केवळ डॉक्टर-इंजिनिअर बनणे हेच प्रतिष्ठचे लक्षण समजले जाई. परंतु आज शिक्षण क्षेत्रात अमाप संध्या उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रात उज्वल करिअर बनवता येऊ शकते.कला,संगीत,सेवा उद्योग,industry consulting, counselling यातील संधी ओळखायला हव्यात.मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करायला हवा.योग्य ती परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी प्रयत्नरत राहणे हे आपले कर्त्यव्य आहे.आपल्या मानसिक स्थितीला आत्मबळ देण्यासाठी अनेक सकारात्मक पुस्तकांचे सतत वाचन करायला हवे.शिव खेरा,जोसेफ मर्फी, राॅबीन शर्मा, जेम्स ॲलन, डेव्हीड शाॅल्ट,डेल कार्नेगी यसारख्या लेखकांचे motivational विचार आपली सकारात्मक मनोभूमिका तयार करण्यास सहाय्यक ठरतात.

श्री संदीप यांची काव्यप्रतिभा:कला,संगीत
सांस्कृतिक अंग

लहानपणापासून ते कविता लिहत आले आहे.इयत्ता ६ वी ला असतानाच सुट्ट्यांमध्ये कविता लिहण्याचा प्रयत्न सुरू झाला.सध्या नव्या मराठी गझल प्रकारात लिखाण सुरू केले आहे.जळगाव आकाशवाणी केंद्रावर त्यांना गायनाची संधी मिळाली आहे.शालेय जीवनापासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विशेषतः गायन व नाटकात सहभाग घेऊन पारितोषिके पटकावली आहेत.कवी संदीप यांची कविता भावनेच्या तरल व तलम डोहात खोल डुबकी घेऊन जीवनाच्या प्रेममय आयामात उतरत जाते व भावभावनांचे प्रतिभासंपन्नतेने विश्लेषण करते.खरे तर त्यांचा व्यवसाय हा तंत्रज्ञानाशी निगडित आहे.गणित व संगणक हा त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे पण तरीही तितक्याच ताकदीने भाषेच्या अंतरंगात मुशाफिरी करून भाषिक समृद्धी वाढवत आहेत.

प्रारब्ध,संधी,प्रयत्न यांचा मिलाफ घडवणारी कविता

“कधी कधी कर्तृत्वच थकते
कधी रथाचे चाक फसते
प्रारब्धच शेवटी बाजी जिंकते
पैज त्यावर लावू नकोस”

कधी कधी गोष्टी आपल्या हातात नसतात पण कर्तृत्व आपल्या हातात नक्कीच असते. आपण आपले कार्य करत जावे व त्याचे फळ प्रारब्धावर सोडून द्यावे असा निष्काम मतितार्थ ते यानिमित्ताने मांडतात.

तर
“भुलवत तव सुवास होता
श्वास चांदण्याचा घेत होतो
स्वप्न तुझी निशेत पेरण्या
आभाळ मी नांगरत होतो.”
वरील वाक्यातून त्यांच्या जीवनाच्या प्रेममय आयामाचे दर्शन घडते.

आपला एकमेकांशी असलेल्या संबंधाबद्दल गणिती भाषा वापरत ते म्हणतात –
“कोण लघु अन विशाल कोण
माप असेल जे लाव ते नंतर,
शब्दा-शब्दांच्या रेषेवरती
सदैव होते आपुले स्थलांतर।

किती वर्तुळे अन किती चौकटी
त्रिजेची वा कर्णाची बाजू,
तुझ्या मनाच्या भूमितीत सांग
मोजत बसतो कोण हे अंतर|”

सॉफ्टवेअर, काव्य व इतर प्रकारातील लेखण यांनी त्यांचे जगणे समृद्ध केले आहे.
जीवनाच्या समृद्ध मार्गावरून त्यांची वाटचाल अशीच सदोदित उंचावत जाऊन इतरांसाठी प्रेरक बनत जाईल याची खात्री वाटते.

लेखक सुभाष पवार पिंपळगाव बसवंत ता निफाड जि नाशिक
9767045327
[email protected] com

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here