भारंभार सिनेमे अपरंपार यश

0
भारंभार सिनेमे अपरंपार यश

भारंभार सिनेमे अपरंपार यश

हल्लीच्या काळी मोठे सिनेमे वेळ साधून रिलीज केले जातात. दोन मोठ्या सिनेमांची टक्कर होऊन प्रेक्षक विभागला जाईल आणि त्याचा दोन्ही सिनेमांना तोटा होईल अशी भीती निर्माते आणि वितरक यांना वाटत असते. काही अंशी ते खरे असेलही. आजच्या ओटीटीच्या काळात थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणारे शौकिन उरले नाहीत हे ही तितकेच खरे. त्यामुळेच ही सगळी काळजी घ्यावी लागते.

पण एक काळ असा होता की तेव्हा भारंभार सिनेमे प्रदर्शित होत आणि प्रेक्षक प्रत्येक सिनेमाला त्या सिनेमाच्या वकूबाप्रमाणे गर्दी करत. तो सिनेमावर प्रेम करणाऱ्या दर्दी प्रेक्षकांचा काळ होता. फार मागे नको जाऊया. अगदी चाळीस वर्षांपूर्वीच्या सिनेमांकडे नजर टाकली तरी हे लक्षात येईल की चांगल्या सिनेमांना नेहमीच लोकाश्रय मिळत आलाय. चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ हा काही हिंदी सिनेमाचा सर्वोत्तम कालखंड होता असे म्हणता येणार नाही. पण तरीही सिनेमावर प्रेम करणारे, त्यासाठी थिएटरमध्ये जाऊन गर्दी करणारे आणि निर्मात्याने सिनेमात गुंतवलेले पैसे त्याला अनेकपटीने परत मिळवून देणारे रसिक मायबाप प्रेक्षक भरपूर होते. शिवाय एकपडदा थिएटर्सची मुबलक उपलब्धता आणि त्यावेळेस तिकीटांचे असलेले माफक दर यामुळेही सिनेमाची सिल्व्हर आणि गोल्डन ज्युबिली सहज होत असे. तसेच व्हिडिओ पायरसीचा तो ‘काळ’ तेव्हा यायचा होता.

असाच एक महिना. मे १९८१. ह्या एकाच महिन्यात तब्बल अकरा सिनेमे एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले आणि त्यातले एकदोन फारच वाईट सिनेमे वगळता सगळे धो धो चालले. काहींना तुफान यश लाभले तर काहींनी आपल्या निर्मात्याचा पैसा परत मिळवून दिला. त्या काळी बऱ्याच वेळा असे होत असे. हा ‘मे १९८१’ चा महिना केवळ वानगीदाखल घेतलाय बरं. ह्या सिनेमांची पोस्टर्स पाहूनच तुम्हाला त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल आणि सिनेमाच्या यशाचा उलगडा होईल. त्यामुळे जास्त खोलात जाऊन विवेचन करत नाही. आज पन्नास आणि साठीच्या घरात असलेल्या फिल्लमबाजांना तो काळ लख्ख आठवेल आणि त्या त्या सिनेमांसोबत जोडल्या गेलेल्या त्यांच्या आठवणी चाळवतील. स्मरणरंजनाचा तो मन:पूत आनंद देणे केवळ हाच या लेखाचा हेतू आहे. बाकी ‘बिटविन द लाईन्स’ असलेलं सगळं, तुम्ही ती पोस्टर्स पाहिल्यावर वाचू शकणार आहातच.

या सिनेमांवर एक दृष्टीक्षेप टाकू आणि त्यातले आपण किती पाहिले होते आणि किती आवडले होते याचं मनाशीच गणित मांडू. आज त्या सिनेमांच्या दर्जाविषयी बोलणं योग्य होणार नाही. पण त्याकाळी ॲडव्हान्स बुकिंगच्या रांगेत उभं राहून नंतर प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या थिएटरमध्ये जाऊन ज्यांनी हे सिनेमे पाहिले असतील तर त्यांना मनातल्या मनात एक कडक सॅल्यूट ठोकूया. असाच एक सलाम करुया या सिनेमांच्या संपूर्ण टीमला … आपलं तेव्हाचं छोटंसं असलेलं भावविश्व समृद्ध केल्याबद्दल. एकाच महिन्यात भारंभार सिनेमे आले तरी ते अपरंपार यश मिळवू शकतात हे मे १९८१ ह्या महिन्यात हिंदी सिनेसृष्टीने सिद्ध करुन दाखवलंय. तूर्तास इतकंच लक्षात ठेवू.

©️पराग खोत
१९ सप्टेंबर २०२१

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here