प्रिय कोंदण

0
प्रिय कोंदण

प्रिय कोंदण “

आज मी तुझ्याबद्दल लिहायला बसले अर्थात तुझ्याबद्दल लिहिताना तुझी जन्मदात्री विद्या रमेश जाधव यांना मी मनःपूर्वक धन्यवाद देणार आहे कोंदण” नावाचं सुंदर लेकरू त्यांच्यामुळेच पाहायला, वाचायला आणि अनुभवायला मिळाले कवयित्री सौ विद्या जाधव (विरजा) यांच्या मनोगतातील ह्या चार ओळी ..
“सख्या तुझ्याच नावाचं
भाळी रेखीयल गोंदण
आंदण दिलय मला
उभ्या जन्माचं कोंदणं”

या चार ओळींची मांडणी शब्दरचना प्रगल्भता यांनीच मन जिंकून घेतलं ‘ण’ चा तीन वेळा तीन शब्दातील वापर हा त्या शब्दांना वाचताना, अनुभवताना वजनदार बनवतो “कोंदण” हे काव्यसंग्रहाला नाव देताना कवयित्रीच्या तनामनात भिणलेली शिक्षिका या शब्दाचा सोदाहरण अर्थ सांगायला विसरत नाही.
तिच्या कवितांमधून कधी कौटुंबिक खंत व्यक्त होते तर कधी आईचे वात्सल्य दिसून येते.
“साथ” कविता वाचताना एक पत्नी पतीकडे किती छान मागणी मागते आहे.
“नको काही बोलू तू
सख्या छेड ह्रदयगाणे..
मिळू दे! साथ जन्माची
तुझी सावली झाल्यावर…”

‘ गीत प्रकाशाचे’ कवितेमध्ये कवयित्रीला असे वाटते की कवितेचा आणि माझ्या मैत्रीचा कुणाला कधीही मत्सर वाटू नये म्हणून कवयित्री लिहिते …
‘तुझ्याच साठी घेतला मी जन्म नवा तुझ्या, माझ्या सोबतीचा ही पुनव करते का हेवा?’
” हे देणे ईश्वराचे’ या काव्य रचनेमध्ये जरासा या शब्दाचा वावर अगदी सहज आणि वाचनीय आहे.या शब्दांमुळे ओळींना नादमाधुर्य निर्माण होते.

   आपण कविता लिहितो म्हणजे काय  करतो हे सांगताना... 

‘मी लिहिते’ या कवितेत मी लिहिते म्हणजे शब्द, शब्द पेरते आहे. या जगण्याला श्वास देत आहे. या ओळीतून कवयित्री चा स्व लिखाणाबद्दल चा सार्थ अभिमान दिसून येतो. प्रत्येक कविताही नवीन विचार देऊन जाते. आयुष्याचे अनेक आयाम कवितेने आपल्या शब्दांमधून उलगडून दाखवले आहेत. नवनवीन शब्द वेचून आपल्या काव्यात कवयित्रीने चपखलपणे त्यांना रुजविले आहे.
कवयित्री या आदर्श वाचक आणि रसिक मनाची हळवी संवेदनशील आणि प्रसंगी तितकीच खंबीर स्त्री असावी असे अनेक कविता वाचून मला जाणवले. एकूणच काय तर …..
“कोंदण” हा प्रत्येक स्त्रीने वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवून पुन्हा, पुन्हा वाचावा असाच सुंदर काव्यसंग्रह आहे.
डॉक्टर प्राची जोशी यांच्या ‘एक पाऊस… एक ऊन’ या कवितासंग्रहातील एक ओळ या काव्यसंग्रहाचे निमित्ताने मला लिहावी वाटते.
‘सारं काही आपल्याला सोसता यावं म्हणून देव नशिबी लिहितो… ‘एक पाऊस ..,,एक ऊन’.

शेवटी
कोंदणा…. तुला आणि तुझ्या जन्मदात्री विरजा यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा देते आणि तुझा निरोप घेते.

तुझीच
वाचक मैत्रीण….
सौ. शिंदे मॅडम.🙏🏻

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here