नैराश्य येऊ देऊ नका…

0
नैराश्य येऊ देऊ नका…

नैराश्य येऊ देऊ नका…

हाथ थामे रखना किसीका
दुनिया की भीड है भारी,
वो इन्सान अकेले अकेले खो न जाएँ
ये आपकी है जिम्मेदारी…।
सद्यस्थितीत भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोविड ही वैश्विक महामारी सुरू आहे. वैश्विक महामारी पाहणारी ही आपली पहिली पिढी आहे.
लॉकडाऊनच्या वेळामुळे सर्वत्र संचारबंदी सदृश्य शुकशुकाट किंवा स्मशान शांतता पसरलेली असते. सर्व जग जणू काही थांबले आहे. घरा-घरात कट-कट व चिड-चिड, नैराश्य आणि हिंसा वाढली आहे. पुढे कसे होणार? या प्रश्नामुळे चिंता, ताण-तणाव वाढले आहेत.

दुसरीकडे परिस्थिती पाहिली तर कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट उशीरा मिळतो, रूग्णालयात बेड नाही, जागा नाही, जागा मिळालीच तर औषधे व इंजेक्शने उपलब्ध नाहीत. आणि तेही मिळालेच, तर ऑक्सिजन उपलब्ध नाही, असे विदारक चित्र आहे. दिलासा म्हणून लसीकरण करून घ्यायचे म्हटले, तर कोविडची लसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.
तिसरीकडे गावा-गावात व वार्डा-वार्डात कोविडमुळे मृत्युचे प्रमाण वाढतांना दिसते. लॉकडाऊनमुळे मंगल वाद्य कानावर पडत नाही तसेच आनंद, उत्साह वाढीच्या घटना घडत नाहीत. याउलट सर्वत्र रूग्णवाहिकेचे सायरन, ऑक्सिजन सिलिंडरचा खडखडाट आणि नातेवाईकांच्या ओक्सा-बोक्सी रडण्याचा आवाज, लॉकडाऊनच्या शांत वातावरणात हृदय भेदून जात आहे. रूग्णाच्या नातेवाईकांच्या रडण्याने रूग्णालय परिसरातील नागरिकांची मन:स्थिती खराब होत आहे.

वास्तविक, नागरिकांची मनस्थिती खराब करण्यामध्ये वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया चित्र-विचित्र बातम्या देऊन भर घालीत आहेत. वृत्तपत्रात ‘टाहो फोडणारे मृतकांच्या नातेवाईकांचे फोटो, ऑक्सिजन भेटत नसल्याने पतिला तोंडाद्वारे श्वास देण्याचा प्रयत्न करणारी पत्नी, त्यात पतिचा मृत्यू असा फोटो, स्मशानभूमित प्रेतांचा पडलेला खच, ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू, या बातम्या नैराश्य पसरवित आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
जेव्हा वैश्विक महामारी आहे तर एवढे किंबहुना यापेक्षाही जास्त होणार, आणखी मृत्यू वाढतील, शासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल, जो तो आपल्या परीने कुटुंबियांना व स्वत:ला जगविण्याचा प्रयत्न करेल, शेवटी जे व्हायचे ते होईल. कारण आपण निसर्गावर, पंचमहाभुतांवर मात करू शकत नाही.

प्रयत्न मात्र करू शकतो ते शेवटपर्यंत केले पाहिजे, तसेही रडत, कुंठत बसणे, हा काही पर्याय नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे.
या महामारीत श्रीमंत, अमूक धर्म व जातीचे लोक वाचत आहेत, गरिबांना सोयी-सुविधा नाहीत, अशा बातम्या व अफवा संभ्रम निर्माण करणा-या आहेत. प्रत्येक व्यक्तिीची प्रकृती वेगळी असते, त्याची क्षमता वेगळी असते, रोगप्रतिकार शक्ती कमी जास्त असते आणि कोरोना विषाणुला धर्म, जात, गरीब, श्रीमंत हे समजत नाही.
कोविड समस्येवर मात करण्यासाठी वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत, बाजारात नव-नवीन औषधी येत आहेत, घरगुती व आयुर्वेदिक उपचार पध्दती, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, योगाभ्यास इतरही प्रकारे रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. शेवटी आपण सर्वच काही यामुळे मृत्युमुखी पडणार नाहीत, कोविडमध्ये मृत्युचा दर हा इतर आजार व अपघातापेक्षा खूप कमी आहे, काही खबरदारी मात्र घेतली पाहिजे.

सर्वप्रथम मास्क, सुरक्षीत अंतर, वेळोवेळी साबणाने हात धुण्याचे नियम पाळा, गर्दीत जाऊच नका, उपवास टाळा, सकस भरपूर जेवण घ्या, फळे व ज्यूस घ्या, एकटे राहू नका, विचार करत बसू नका, नकारात्मक बातम्या पाहू, वाचू नका, त्यावर चर्चा करू नका, तर याउलट स्वत:ला चांगल्या कार्यात गुंतवून ठेवा, दैनंदिन वेळापत्रक बनवून त्यानुसार कार्य करा, विशेष, म्हणजे ‘व्यक्त व्हा – तणाव मुक्त व्हा’, आवश्यकता वाटत असल्यास डॉक्टर व तज्ञांकडून समुपदेशन मिळवा, आवडत्या व्यक्तिशी बोला, शब्द चमत्कार करतात, ते मनावर परिणाम करतात. शेवटी शरीर हे मनाचेच ऐकतो. तेव्हा सकारात्मक जादुई शब्द वापरा, स्वत:ला विश्वास द्या, हिंमत द्या, हे एकप्रकारे औषधीचे काम करेल.

शेवटी सकारात्मक रहावे, या आशयाचा एक शेर आठवतो…..
हौसले की तरकश में
कोशिश का वो तीर जिंदा रखो,
हार जाओ चाहे जिन्दगी में सब कुछ,
मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो।

      - - - राजेश राजोरे

खामगाव, जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here