देशात हजारो कोटीचे ‘हेरॉइन’…

0
राजकारणाचा तमाशा!उघड्या डोळ्याने का?पाहतो देशा!

देशात हजारो कोटीचे ‘हेरॉइन’…

घर में ठंडे चुल्हे है,
स्थिती निली-पिली है…
हर पल साँस छोडती दामन,
जवानी जिनकी नशीली है…

उद्योजक अदानीद्वारा संचालीत गुजरातमधील मुंद्रा बंदरावर १३ सप्टेंबरला २१ हजार कोटी रूपये किंमतीची सुमारे ३ हजार किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. प्रामुख्याने श्रीमंत वर्गात नशा करण्यासाठी वापरल्या जाणा-या हेरॉइन या अंमली पदार्थाची एवढी मोठी ‘खेप’ पकडल्या जाण्याची ही पहिलीच घटना. मात्र प्रसार माध्यमांनी याला फारशी प्रसिध्दी दिली नाही. डेक्कन क्रॉनीकाल वृत्तपत्राने ही बातमी देतांना यापूर्वी यापेक्षाही मोठी ‘खेप’ २४ हजार किलोची येऊन भारतात पसरली, असा दावाही केला.
गेल्या २-३ महिन्यात हेरॉइन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, यामध्ये जुलै महिन्यात महाराष्ट्रात ८९९ कोटीचे हेरॉइन तर दिल्लीमध्ये अडीच हजार कोटीचे आणि पंजाबमध्ये शंभर कोटीचे व मे महिन्यात २५० कोटीचे हेरॉइन पकडण्यात आले. तस्करीत चार अफगाणी व्यक्तिंनाही अटक झाली.

टेल्कम पावडरच्या नावाखाली हा पदार्थ बोलविण्यात आला. यापूर्वी जम्मू-काश्मिरच्या कथुआ जिल्ह्यात तस्कर ठार झाला तर त्याचेकडून १३५ कोटीचे हेरॉइन जप्त झाले. सुमारे ५ ते ७ कोटी रूपये किलोचे भाव असलेल्या हेरॉइनची भारतातील तस्करी खूप चिंतेचा विषय आहे. मागे नोव्हेंबर १९ मध्ये तर पोलिसांचा खब-या असणा-या मुंबईच्या खालीद वसीखान वय ५१ याचेकडून दीड कोटीचे हेरॉइन जप्त करण्यात आले होते. एकंदरीत उघडकीस असलेल्या घटनांपेक्षा उघडकीस न आलेल्या घटना जास्त आहे.

अंमली पदार्थाचे दोन वर्ग असून पहिल्या वर्गात वनस्पतीजन्य अंमली पदार्थात अफू, गांजा, चरस, कोकाची पाने, मारिजुआनाचा समावेश होतो, (हशीश ही अरबी संज्ञा अशा पदार्थांची निदर्शक आहे.) तर दुस-या वर्गात रासायनिक पध्दतीने बनविलेल्या हेरॉइन, कोडीन, कोकेन आदी पदार्थांचा समावेश होतो. एल.एस.डी. (लायसर्जिक डायएथिलामाईड) हे अमेरिकेत विशेष लोकप्रिय आहे. खाणे, पिणे, चघळणे, ओढणे आदी विविध प्रकारांनी अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. पुष्कळदा तंबाखूत मिसळून किंवा विडी, चिलीम, सिगारेट यातून घेतले जातात. नशेसाठी हे पदार्थ मिळविण्याच्या इच्छेने व्यक्ती बेचैन होते. नेहमीचा डोस धुंदी आणण्यास पुढे – पुढे कमी पडत जातो. तेव्हा तो वाढविला जातो, व्यक्तिचे मानसिक व पुष्कळवेळा शारीरिक स्वास्थ्यही या अंमली पदार्थांवरच अवलंबून राहते. अफू, भांग, गांजा, चरस यासारखी नैसर्गिक अंमली पदार्थ गरीब, मध्यमवर्गीय वर्गात जास्त वापरले जातात. तर हेरॉइन, कोडीन, कोकीन, एलएसडी यासारखी रासायनिक अंमली पदार्थ श्रीमंत, उच्चवर्गीय वर्गात वापरले जातात. जीवनातील यांत्रिकता, एकाकीपणा, नैराश्य, ताण-तणावामुळे अंमली पदार्थांचे सेवन अर्थात नशा करणा-यांचे प्रमाण वाढते आहे, असा काहीसा निष्कर्ष आहे.

तर असे ताण-तणाव दूर करण्याचे अनेक सकारात्मक मार्ग असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
दुसरीकडे नशाखोरीच्या प्रकारामुळे कुटुंबात, समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नशाखोर व्यक्तिचे नुकसान होते. ती व्यक्ती मनाने कमालीची दुर्बल होते. काम करण्यास असमर्थ होते. शरीरही पोखरून निघते, अंमली पदार्थ मिळविण्यासाठी कोणताही गुन्हा करण्यास प्रवृत्त होते. तसेच व्यसनाची वाढ होत राहिल्याने जमा पैसा, कमाई खर्च होते व कुटुंब उद्ध्वस्त होते. हे दुष्परिणाम पाहता अंमली पदार्थांवर बंदी व कडक कायदे आहेत. तरीही तस्करी थांबत नाही. प्रचंड मोठ्या ‘खेप’साठी अदानी संचालीत बंदरच का निवडले? विना पाठबळाने, आशीर्वादाने ही तस्करी शक्य आहे का? तर चेकिंग आमचेकडे नाही, फक्त विमानतळाचा रखरखाव आहे, असा खुलासा अदानी ग्रुपकडून केल्या गेला आहे.

तस्करी झालेले १ लाख ७५ हजार कोटीचे २५ हजार किलो ड्रग्स कोठे गेले? तस्करी रोखण्यासाठी डीआयडी, ईडी, आयबी, सीबीआय काय काम करीत आहे? हे देशाच्या तरूण वर्गाला नशाखोरीत लोटणे नव्हे का? या तस्करीला कुणा पांढरपेशा राजकारण्यांचा आशीर्वाद व संरक्षण आहे का? आदी प्रश्न काँगे्रसने पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केले आहे. जणू काँग्रेस काळात ड्रग्स मिळतच नव्हते? असो.
तस्करीच्या प्रकरणावर राजकारण सोडले तरी अंमली पदार्थांची देशात आवक, तरूण पीढीची वाढती नशाखोरी, देशाच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित करते, यात दुमत नाही. शेवटी ओळी आठवतात…
नशा चाहे जैसा हो, होता है यह बेकार,
शरीर तोडता बिमारी लाता, कर देता लाचार…
– – राजेश राजोरे
खामगाव, जि. बुलडाणा

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here