दिल से काग़ज़ तक… कशाला उद्याची बातः शांता हुबळीकर (1990)

0
दिल से काग़ज़ तक... कशाला उद्याची बातः शांता हुबळीकर (1990)

दिल से काग़ज़ तक… कशाला उद्याची बातः शांता हुबळीकर (1990)

शांता हुबळीकर यांच्या या आत्मकथनाचे शब्दांकन शशिकला उपाध्ये यांनी या केले आहे.
कर्नाटकातल्या अदरगुंजी खेड्यात 14 एप्रिल 1914 या दिवशी शांताबाईचा जन्म झाला. त्या तीन वर्षाच्या असतांना आईवडीलांचा मृत्यू झाला. आजीने म्हणजे आईच्या आईनं त्यांचा आणि बहिणीचा सांभाळ केला. आजीच्या घरात दारिद्य्र. मुली रडक्या. शांताबाई या काळाबद्दल लिहितात, ‘‘माझ्या पोटात जंत झाले होते. पोटाचा डेरा. हातापायाच्या काड्या. कपाळावर झिपर्‍या. असं माझं ध्यान कुठेही बसलेलं असायचं दिवसभर. मी सारखी रडायची.’’

1920च्या आसपासची पुस्तके वाचली की जाणवते भारतात खेडोपाडी सर्वत्र दारिद्य्रचा होते. घरातली लहान मुलं कामासाठी घरीदारी सगळीकडे राबवली जात. कुटुंब कसेबसे हातातोंडाची मिळवणी करी. तरी कुटुंबातली माणसं एकमेकांना घट्ट धरून असत. परंतु दारिद्याच्या अनेक परी होत्या. शांताबाईंच्या वस्तीतले दारिद्य्र कसे होते? भोवतालची माणसं आजीला म्हणायची या पोरींना कुणाला तरी देऊन टाका. मग दुष्काळात आजीनंही तिच्या ओळखीतल्या हुबळीच्या श्रीमंत सावित्रीअक्कांना शांताला आणि तिच्या बहिणीला देऊन टाकलं. हे भयंकर होतं. मग तीच बाई या बहिणींची आजी झाली.

हुबळीत शांता अब्दुल करीमखॉं यांच्याकडे गाणं शिकली. पण या आजीच्या लेकीनं शांताचं म्हातार्‍याशी लग्न लावून पैसे उकळण्याचा घाट घातला. अंबू नावाच्या मैत्रीण आणि तिच्या नवर्‍याच्या सहाय्यानं शांताबाई हुबळीहून पळून गदगला नाटक कंपनीत गेल्या. ते 1930साल होतं. स्त्री-शिक्षणाची पहाट झालेली होती. पुणे मुंबई शहरात मुली कॉलेजातही शिकू लागल्या होत्या. पण शांताबाईंच्या भोवतालची संस्कृती वेगळी होती. त्या ठिकाणी कुटुंबातली घट्ट नाती नव्हती. कोणालाही लबाड्या, फसवणूक करताना दिक्कत वाटत नव्हती. अशा ठिकाणी एखादी सज्जन मैत्रीण आणि तिचा सज्जन नवरा भेटला, हे शांताबाईंचे भाग्यच होतं, असं म्हटले पाहिजे.

शांताबाईंचं कलाकार म्हणून नशीब चांगलं दिसतं. नाटक कंपनीनंतर त्यांना कोल्हापूरात भालजी पेंढारकर यांच्यासारख्या नावांजलेल्या कलाकारांच्या चित्रपटात प्रवेश झाला. तेथून पुढे त्या पुण्यात ‘प्रभात’ कंपनीत आल्या. तेथे ‘माझा मुलगा’ आणि ‘माणूस’ या ‘प्रभात’च्या चित्रपटातल्या शांताबाईंच्या नायिकाच्या भूमिका खूप गाजल्या. ‘माणूस’ या चित्रपटातील त्यांनी गायलेले आणि अभिनित केलेले ‘कशाला उद्याची बात’ हे गाणे तर पराकोटीचे लोकप्रिय झाले होते. त्या दृश्यासह आजही अनेकदा दूरचित्रवाणीवर दाखवले जाते. तेच नाव या आत्मचित्राला दिले गेले आहे.

या चित्रपटांनी शांताबाईंना आर्थिक स्थैर्य आले. घर सजवले. नोकरचाकर ठेवले. आता साहजिकच कोणाच्या तरी संगतसोबतीची गरज भासायला लागली. शिवाय एकटीला सगळा वाढता व्याप आवरणंही अवघड जात होतं. मदतही हवी होती. यातूनच डेक्कन एम्पोरियम दुकानाचे मालक गिते यांच्याशी परिचय झाला. त्यांनी गिते यांच्याशी विवाह केला. गिते यांना आधीची पत्नी आणि मुले होती. त्या काळात पुरुषाचे दोन विवाह ही फार आक्षेपार्ह बाब नव्हती. शांताबाईंचे आयुष्य म्हणजे तर आगापीछा नसलेली वा-यावरची वरातच होती. त्यात त्यांना हे मुळीच खटकलं नसावं. पण गिते अत्यंत बेजबाबदार निघाले. ते शांताबाईंच्या जिवावर वाटेल तसा खर्च करू लागले. धंदा नीट सांभाळेनात. त्यांच्या दुकानाला टाळे लागले.

1939मध्ये शांताबाईना प्रभातमधून बाहेर पडावे लागले. तेव्हा त्या अभिनेत्री म्हणून चांगल्या प्रस्थापित झाल्या होत्या. त्या इतर चित्रपटकंपन्यांमध्ये गेल्या. यानंतर गिते शांताबाईंच्या जिवावर जगले. त्यांनी खूप कर्ज केले. घटस्फोट देईनात. त्यांच्यापासून झालेला मुलगा प्रदीपनेही आईला सुख दिले नाही. वयाप्रमाणे शांताबाई चरित्र अभिनेत्री झाल्या. पैशासाठी नाटकातही कामे करू लागल्या. 1955 मध्ये त्यांना नाटकाचे नाइटचे तीनशे ते चारशे रुपये मिळत होते. म्हणजे लोकप्रियता मानमान्यता चांगलीच होती. पण लगेच सावकार येऊन उभे रहात. पैसा मिळवायला त्यांनी संगीताचे जलसेही सुरू केले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत शांताबाईंनी अभिनेत्री आणि गायिका म्हणून लोकप्रिय राहिल्या. या उपजत आंतरिक प्रतिभेमुळेच परिस्थितीवर मात करण्याची त्यांची शारीरिक आणि मानसिक जबरदस्त क्षमता त्यांच्यात निर्माण झाली असावी.

या काळात प्रीतीचा अनुभव त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेला दिसतो. यातील एक गुलाबी थरथरता क्षण त्यांनी कथन केला आहे. त्या म्हणतात…..’दुपारी शामराव मला भेटायला स्टुडियोत आले. दोन्ही हातांनी माझा उजवा हात घट्ट धरून त्यांनी आपल्या भावना न बोलताच व्यक्त केल्या. तो स्पर्श मला नवा होता. तसे ‘लव्हसिन्स’ प्रत्येक सिनेमात मी करत होते- पण मी कुठंच मनानं कधी गुंतले नव्हते! म्हणूनच हा स्पर्श प्रथमच कुठंतरी मनात जाऊन भिडला. मग आम्ही स्टुडिओ बाहेरच्या बागेत थोडा वेळ बोलत बसलो. त्यांची बायको गेलेली होती. पण माझा नवरा हयात होता- मी काहीच करू शकत नव्हते. माझा नकार ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यासाठी कुणी एवढं दुःखी होऊ शकतं हेच मला नवीन होतं…..’ शांताबाईंचे पोरकेपण आणि नव-याने केलेली ससेहोलपट, ही गर्द लाल रंगाची पार्श्र्वभूमी, या गुलाबी क्षणाला अधिकच करुण करते.

कौटुंबिक बाजूने दैवाने शांताबाईंच्या आयुष्यात सतत उलटे फासे टाकले. नवरा, मुलगा, सून सगळ्यांच्या जाचाला कंटाळून शांताबाई कोणालाच न सांगता वसईला श्रद्धानंद वृद्धाश्रमात निघून गेल्या. आपली हुबळीकर ही ओळख पुसून टाकून गिते म्हणून तेथेच राहिल्या. या आश्रमातले जीवन आगीतून येऊन फुफाट्यात पडले म्हणावे असेच होते. पण त्या तेथे राहिल्या.

त्यांच्या आत्मकथनातल्या एका नोंदीची विशेष दखल घ्यावीशी वाटते. गिते यांच्या मृत्यूची बातमी शांताबाईंना 9वर्षांनी कळली. तेव्हाही त्यांच्या मनातला संताप गेलेला नव्हता. ‘बायकोच्या कष्टावर, कलेवर , पैशावर जगणारे पुरुष पुष्कळ असतात…पण तिला पूर्णपणे लुटून कफल्लक करणारे कोणी नसतील बहुधा….माझ्या तळतळाटानं त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत तडफडायला लावलं.’ असं बोलून त्या पुढे म्हणतात, ‘दुःखाची भावना मनाला स्पर्शूनही गेली नसली तरी जगाचे उपचार सुटत नसतात. नवर्‍याच्या नावानं बांधलेलं मंगळसूत्र आणि कुंकू यांचा मी त्याग केला. एका पर्वावर कायमचा पडदा टाकला, पण तो टाकतांना आयुष्यभर मनात बाळगलेला एक विचार पुन्हा उफाळून आला,माझ्या हाती कायदा असता तर घरातच दरोडा घालून बायकोला दरिद्री करणार्‍या रस्त्यावर आणणार्‍या या दरोडेखोराला मी हत्तीच्या पायी दिला असता!’ स्त्री मनावर सामाजिक रूढींचा प्रभाव किती जबरदस्त असतो ! नवर्‍याबद्दल अत्यंत कडवट भावना मनात असतांनाही त्यांनी गळ्यात मंगळसूत्र ठेवलं होतं. जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हाच ते काढून टाकलं.

जुन्या कलाकारांच्या मानधन मिळण्याची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा ते मिळवण्यासाठी त्यांनी आपली शांता हुबळीकर ही ओळख दिली. मग सुप्रसिद्ध पत्रकार संपादक माधव गडकरी यांनी 12 डिसेबर 1988च्या लोकसत्तामध्ये लेख लिहून शांताबाईंना पुन्हा प्रकाशात आणले. पुन्हा अनेक सत्कार झाले. मुलगा-सून-नात यांची भेट झाली. पण कौटुंबिक सुख नशिबात नव्हते. अखेरच्या पर्वात सत्संगाच्या समवयस्क मैत्रिणीं आणि माधवराव गडकरीकडून त्यांना विनामूल्य प्रामाणिक मदत झाली. पुणे येथील वृद्धाश्रमातले शेवटचे दिवस सुखात गेले.

अगदी बालपणापासून शांताबाई पोरक्या होत्या. बहिणीचा उल्लेख पुढे येत नाही. त्या पळून नाटक कंपनीत गेल्या तेव्हाच हा संबंध तुटून गेला असावा. एके काळी प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीचा पोरकेपणाने शेवटपर्यंत पाठलाग केला. त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या कालखंडात अंबू ही जिवलग मैत्रीण आणि तिचा नवरा यांचे प्रेम, जिव्हाळा, आस्था त्यांना मिळाली. त्यांची आठवण या आत्मकथनात सतत अधूनमधून डोकावते.

एकाकी अभिनेत्रीची जगण्याची धडपड चित्रित करणारे हे आत्मचरित्र आहे.

कशाला उद्याची बातः शांता हुबळीकर (1990)
श्री विद्या प्रकाशन पुणे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here