डॉक्टरांकडून लुटमार : एक चर्चा…

0
डॉक्टरांकडून लुटमार : एक चर्चा…

डॉक्टरांकडून लुटमार : एक चर्चा…

वो पेशंट उस डॉक्टर को खुदा मानता है,
उसको क्या पता की यही लुटता है…

नाशिकच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांनी  डॉक्टरांची लुटमार विरुध्द अर्धनग्न आंदोलन केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली. तर गावा-गावात तसेच शहरा-शहरात मोठ्या रुग्णालयात डॉक्टर व डॉक्टरांच्या टोळीकडून होणारी लुटमार पुन्हा चर्चेत आली. गेल्या अनेक वर्षांपासून चालणा-या या लुटमारीला रोखण्यासाठी सरकार, प्रशासन, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी फारसे काही केल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे डॉक्टर करीत असलेली लुटमार ही डॉक्टरांची गरज बनली आहे का? यामध्ये डॉक्टर बनविणा-या शिक्षण व्यवस्थेचा दोष आहे का? जास्त संख्येने डॉक्टर निर्माण न करण्याच्या पध्दतीचा दोष आहे का? हे सर्व तपासले पाहिजे.
             

लोकसंख्येच्या निकषानुसार डॉक्टरांची संख्या कमी आहे, त्यात कोरोना सारखी महामारी आली तर पैसे कमविण्याची संधी समजून रुग्णांकडून अव्वाचे सव्वा बिले घेण्यात आली, नको त्या वस्तूंचे, आणि अनेक पटीने रक्कम आकारल्या गेली. बिलासाठी रुग्णांचे दागिने ठेवून घेण्याचेही प्रकार  उघडकीस आले. रुग्णांना भीती दाखवून प्रचंड खर्चीक तपासण्या, सिटीस्कॅन, महागडी इंजेक्शन व औषधोपचार केल्याचा प्रकार झाला, डॉक्टर व रुग्णाचे नातेवाईकांमध्ये बिलावरुन वाद झालेत. एकूणच कोविड काळात डॉक्टरांबद्दलची आपुलकी, मान सन्मान नष्ट होवून डॉक्टर हे दरोडेखोर झालेत, असा समज रुग्ण व नातेवाईकांमध्ये निर्माण झाला. मात्र जीव वाचविण्यासाठी सर्व काही सहन करावे लागते, असे सांगून हॉस्पिटल खर्चाने बेजार, त्रस्त व आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले लोक डॉक्टरांना शिव्यांची लाखोली वाहत आहे. याला काही डॉक्टर अपवाद आहेत.
        शासकीय किंवा खासगी मेडिकल कॉलेजमध्ये

शासकीय किंवा खासगी मेडिकल कॉलेजमध्ये गोर- गरीब रुग्णांची सेवा म्हणून त्यांचेवर प्रयोग करुन शिकून डॉक्टर झालेल्या या डॉक्टरांनी पदवी घेतल्यानंतर श्रीमंतांची, मध्यमवर्गीयांची अर्थात फी देवू शकणा-या, वर्गाची कथित सेवा करण्याला प्राधान्य दिले. स्वत:चे भव्य रुग्णालय बांधले, आधुनिक मशिनीरी, उपकरणे घेतलीत व गब्बर झालेत. तर असे होण्यात वैद्यकीय शिक्षण व्यवस्था जी खूप महाग, खर्चिक व तोकडी आहे, ती पण कारणीभूत म्हणता येईल. एक पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर होण्यासाठी ११ वी १२ वी पासून खर्चिक नीट परीक्षा, कमी गुण मिळाल्याने मेडिकल कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी ४५ लाख ते कोटी पर्यंतचे डोनेशन, परत लाखोची वार्षिक फी तर एम.डी.साठी जागा कमी असल्याने शाखानुसार जास्त डोनेशन व फी, असा कोटीच्यावर खर्च तसेच डॉक्टर होण्यासाठी लागणारे ८ ते ९ वर्षाचा कालावधी अर्थात अर्धे वय शिक्षणात जाते,  तद्नंतर हॉस्पिटल उभारणी खर्च, नवीन महागड्या मशिन्सचा खर्च आणि त्यानंतर या सर्वाची  रुग्णांकडून घाईघाईने वसुली, असे हे दृष्टचक्र आहे.
         

राज्यात नवीन पुरेशे मेडिकल कॉलेज नाहीत, आहे त्यात पी.जी. अर्थात उच्च शिक्षणाच्या जागा कमी, त्यामुळे व  उपरोक्त दृष्टचक्रामुळे डॉक्टर कमी तयार होतात आणि ज्या गोष्टीची मुबलकता नाही, तेथे मनमानी, अडवणूक, नाडवणूक व पिळवणूक होणारच. तेव्हा शिक्षण सम्राटांच्या कॉलेजमध्ये व शासकीय कॉलेजामध्ये जागा वाढविणे आणि योग्य व पारदर्शक व्यवस्थेव्दारे डॉक्टर होण्याचा खर्च कमी करणेही गरजेचे आहे.
       

एकूणच वैद्यकीय क्षेत्रात काय सुरु आहे, हे सर्व सर्वांना माहिती आहे, मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? असा प्रश्न आहे. डॉक्टरांच्या व्यवसायाबाबत दोन्ही मताचे रुग्ण व नातेवाईक आहेत. डॉक्टर कट प्रॅक्टीस करतात, लुटतात, त्यांच्याच मेडिकल मधील औषधे देतात, व्यसनाध

झाले आहेत, सेवा नव्हे तर मेवा पाहतात, असा मानणारा एक वर्ग आहे. या उलट खासगी डॉक्टर आहेत म्हणून तातडीने  वैद्यकीय सेवा मिळते, त्यांची मेहनत, बुध्दीमत्ता, त्यांची शिक्षण ते रुग्णालय पर्यंतची एकूण गुंतवणूक पाहता एव्हढी वसुली ते करणारच, त्यांच्यावर राजकारण्यांचा इतर खर्चाचा दबाव असतो, असे माननाराही वर्ग आहे.
         वास्तविक आरोग्य सेवा तत्पर, स्वस्त आणि त्वरित उपलब्ध व्हावी, ही सरकारची प्राथमिकता असावी. तेव्हा शासनानेच यातून मार्ग काढावा, अशी अपेक्षा रास्त ठरते.
शेवटी डॉक्टरांना ओळखणे कठीण झाले आहे मात्र त्यांचे देवदूतपणा नाकारता येणार नाही, या आशयाचा एक शेर आठवतो…
 इस दुनिया मे नही पता चलता है किसी का कॅरेक्टर,
आज भी लोगो के लिए दुसरा खुदा है डॉक्टर

डॉक्टरांकडून लुटमार : एक चर्चा…

            – – राजेश राजोरे
      खामगाव, जि. बुलडाणा.
         9822593903

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here