छोट्या व्यवसायिकांना मदत ?

0
डॉक्टरांकडून लुटमार : एक चर्चा…

छोट्या व्यवसायिकांना मदत ?

अपनापन तो हर कोई दिखाता है,
पर अपना कौन है, ये वक्त बताता है…
कोरोना काळात वेळोवेळी वेळ व दिवस बदलत लागणा-या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यवसायिकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांचे खूप नुकसानही होत आहे. व्यापारी एक घटक मानले तरी शेकडो प्रकारचे व्यवसाय व त्यानुसार त्यांच्या समस्या आहेत. तर व्यवस्थीत संघटन नसणे, राजकारणात व्यापारी मतदारसंघ वा प्रतिनिधीत्व नसणे, सोबतच समाजात व्यापा-यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आदर, मान, सन्मानाचा नसणे, यामुळे त्यांच्या समस्या सुटत नाहीत.

या उलट व्यापारी म्हणजे चोर, काळाबाजार करणारा, शासकीय कर्मचा-यांना पैसे देऊन काम करवून घेणारा, भेसळ करणारा, व्यापारासाठी काहीही करणारा, नियम न पाळणारा, नेहमी घाईत असणारा, वेळ नसणारा, शिव्या खाणारा, असा माणूस म्हणजे व्यवसायीक, असे झाले आहे. व्यापारी सर्व प्रकारचे टॅक्स देणार, अनेकांना रोजगार देणार, मात्र त्याला पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालयात आदराची वागणूक मिळणार नाही. उलट आजपर्यंत व्यापारी म्हणजे ‘अंडा देनेवाली मुर्गी’ म्हणूनच सर्वांनी त्यांचा वापर केला आहे, हे स्पष्ट आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक मा.शरद पवार यांनी छोट्या व्यापा-यांना कोरोनाच्या काळात मदत देण्याचा सल्ला देणारे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठविले आहे. या पत्राची आर्थिक मदतीसाठी फारशी काही दखल घेतल्या जाईल, असे वाटत नाही. मात्र व्यापा-यांच्या समस्यांकडे लक्ष वेधल्या गेले, असे म्हणता येईल. मुंबई व उपनगरात सुमारे दीड लाख व्यापारी तर राज्यात ही संख्या सुमारे २० ते २२ लाख आहे. यातील फक्त १० टक्के व्यापारी हे अत्यावश्यक सेवेतील असून ९० टक्के व्यापा-यांचा व्यवसाय ठप्प आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वांच्या समस्या वाढतात, वाहतूक पर्यायाने वस्तू महाग होते, काळाबाजार वाढतो, गरीबांचे हाल होतात तर दुकान व गोडाऊनमधील माल उंदीर खातात, खराब होतो, नुकसान होते तसेच आर्थिक चक्र बिघडते. विशेष म्हणजे सरकारी कार्यालये सुरु, बँका सुरु, दवाखान्यात प्रचंड गर्दी, आदीमुळे कोरोना पसरत नाही काय? फक्त व्यापा-याच्या दुकानात शिस्तबध्द पध्दतीने व्यापार केला तर कोरोना पसरतो, हे न समजणारे असल्याने दुकाने बंद ठेवण्यासाठी अनेकांचा विरोध आहे, शेतकरी नेते व ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी तर अकोल्यात अनेक दुकानांचे शटर उघडून व्यापार सुरु ठेवण्याचे आवाहन केले. दुसरीकडे दुकाने बंद ठेऊन होणारे नुकसान कायद्याने शासनाने दिले पाहिजे तर व्यापा-यांनी ते मागीतलेच पाहिजे, असे सांगत कायदा स्पष्ट करणारे लिखाण व आवाहन कायदेतज्ञ अ‍ॅड.विनोद तिवारी, नागपूर यांनी जाहीरपणे केले आहे.

व्यवसायिकांना विविध प्रकारच्या करांचा भरणा करणे तसेच वीज देयके, कर्मचारी पगार आदी खर्च सुरु आहेत. लॉकडाऊनला व्यापा-यांनी विरोध केला तर त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल होतात, हे पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ५० व्यापा-यांवर गुन्हे नोंदवून दाखवून देण्यात आले आहे.
वास्तविक व्यापा-यांचा कुणी वाली नाही? व्यापारी फक्त राजकीय पक्षांना वर्गणीसाठी, झेंडे लावण्यासाठी लागतो, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व उत्सव मंडळांना पावतीसाठी लागतो, शॉप अ‍ॅक्ट, फुड अ‍ॅन्ड ड्रग व इतर कर्मचा-यांना माहेवारी हप्त्यासाठी लागतो, माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणा-यांना पैसे उकळण्यासाठी लागतो.

अशी स्थिती आहे. एकूणच व्यापारी सर्वांना आर्थिक भुर्दंडासाठी ‘हवा’ आहे, मात्र व्यापा-यांना काय ‘हवे’ याचा विचार होत नाही. एकवेळ सरकारकडून मदत नाही झाली तरी चालेल मात्र त्रास तर नको. ‘भिक नको पण कुत्रा आवर’ ही म्हणण्याची वेळ आली आहे.
शेवटी व्यापारी हा समाज व अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे, त्याचे बाबतीत निर्णय घेतांना त्याला समस्या विचारणे, समजून घेणे, राजकारणात प्रतिनिधीत्व देणे गरजेचे ठरते. मात्र या राजकीय व्यवस्थेत व्यापा-यांसाठी फार काही हिताचे होईल, असे व्यापा-यांनी समजू नये. तेव्हा परिस्थिती कोणतीही असो सत्ता व राजकारणच श्रेष्ठ ठरते, या

आशयाचा शेर आठवतो…..
चलो चलें सियासत में…
यहां व्यापार अच्छा है…
मंदी किसी और बाजार में होगी,
ये बाजार अच्छा है…

         - - - राजेश राजोरे
     खामगाव, जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here