खाकीच्या कडक वर्दीतली संवेदनशीलता _पोलीस अधीक्षक मा.तेजस्वी सातपुते.

0
खाकीच्या कडक वर्दीतली संवेदनशीलता _पोलीस अधीक्षक मा.तेजस्वी सातपुते.

खाकीच्या कडक वर्दीतली संवेदनशीलता _पोलीस अधीक्षक मा.तेजस्वी सातपुते.
सह्याद्री दूरदर्शन वाहिनी. वेळ रात्री 11 ची दिनांक ३१/८/२१ रोजी तेजस्वी सातपुते यांची मुलाखत पाहण्याचा योग आला. अक्षरशा:मी वहीची पानं मिटली. कवितेचा विचार बाजूला सारला. आणि पहात राहिले त्या समोर बसलेल्या खाकी वर्दीतल्या संवेदनशील महिला पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते यांना. किती ओघवती भाषा ती!काळजात तुडुंब काठोकाठ भरलेला कुटुंबासाठीचा तो आदर! पुणे ,सातारा, सोलापूर येथे केलेल्या कार्याचा आढावा मांडताना किती सहजतेने त्या बोलत होत्या. खरं तर अशी काम सांगायला अनुभव, मत मांडायला ती किती सहजतेने मांडली जातात. पण त्यामागची भूमिका, त्याचं शौर्य ,त्यांची ड्युटी या गोष्टी खरच जीवघेण्या असतात.

त्यात महिला पोलीस अधीक्षक म्हटल्यावर तर या गोष्टीचं खरंच कौतुक व्हायला हवं. नक्कीच!! अजरामर कणखर खंबीर नेतृत्व म्हणजे मांसाहेब जिजाऊंचंआहे आणि असेल. त्यांच्याच विचारांचा वारसा चालवत आज अशा अनेक महिला पाऊल पुढे टाकत आहेत ही गौरवास्पद गोष्ट नाकारता येत नाही. खाकी वर्दीतला पुरुष म्हणजे पोलीस अधिकारीअसतो हे एवढेच आधी खूप पूर्वी आपल्या पचनी पडलेलं, पण आज कितीतरी महिला खाकी वर्दीत दिसू लागल्यात. खरंच हा प्रवास खडतर आहेच म्हणूनच पुन्हा पुन्हा अशा धाडशी महिलांना काळजातून वंदन. आयुष्याची सगळी कडवाहट पिऊनही बाई जगत असते. घराला सावली देत असते.

अशा आणि खचलेल्या कित्येक बायकांसाठी नव्या पिढीतल्या तरुणींसाठी तेजस्वी सातपुते या त्यांच्या कार्यामुळे महिला जगतांत खरंच एक आदर्श ठरत आहेत. किती वेगळ्या पद्धतीनं त्यांनी काल एक जीवनाचं गणित मांडलं. वाहतुकीचे नियम मोडत आज कित्येक जण दिसतात. किती घाई असते आज प्रत्येकाला. अशा घाईतच मृत्यूची सुद्धा घाई होते. हे किती छान त्यांनी पटवून दिले.वाहतुकीचे नियम मोडत पुढे जाणारी व्यक्ती फक्त चार मिनिट आधी पोहोचते नियम पाळणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत .पण ही चार मिनिटे किती जीवघेणी ठरतात हे नव्याने सांगायला नको. कशाला एवढी घाई ? ही त्यांची तळमळ काल त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. एवढं मोठ्ठं उत्तुंग हिमालयीन व्यक्तिमत्व समोर यायला घराचं पाठबळ, संस्कार निश्चितच मागे असतात.

भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात? त्यांच्या बाबांच्या या वाक्यावर त्यांना उत्तर देता आले नाही. बाबांनी सरळ त्यांना शेतात नेलं भुईमुगाचं रोपटं मातीतून मुळासकट उपटून दाखवलं. हे असं कृतिशील ज्ञान द्यायला आजच्या धावपळीच्या युगातल्या बाबांना वेळ कुठे आहे मुलांसाठी? अभ्यासाची पुस्तकं आणून दिली आणि क्लासची फी भरली की आपल्या “बाबा” पणाचं कर्तव्य संपलं म्हणणार्‍या बाबांना या गोष्टी खरच मार्गदर्शक ठरत आहेत. विशाल असा वड ही पारंब्यातून मातीकडे झेपावतो. मातीला तो कदापि विसरत नाही. असंच काहीसं व्यक्तिमत्व काल दूरदर्शनच्या चौकटीत बसत नव्हतं. कसं बसेल? कार्यानं झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं ते.आणि अशा मोठ्या व्यक्तिमत्वाला मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मनाला आवर घालता आला नाही.

वारकरी संप्रदायातलं त्यांचं घराणं पंढरीच्या वारीला नियमानं जाणारे त्यांचे आई-बाबा खरंच हे माऊली चे संस्कार कधीच वाया जाणारे नसतात हे आज पुन्हा एकदा सांगायला आवडेल. आजच्या तरुण पिढीने त्यांचा जीवनपट खरंच उलगडून पाहायला हवा.त्यांच्या आयुष्याचे प्रत्येक पान हे वाचनीय आहे. प्रशंसनीय आहे. त्यांची साताऱ्याची खाकी वर्दीतील कारकीर्द खरंच परिपूर्ण आहे. एक स्त्री एवढं मोठं भव्यदिव्य असं काहीतरी आपल्या कार्यातून करते यावर विश्वासच बसत नाही. कुठून येतं एवढं साहस? मांसाहेब जिजाऊंचं चरित्र मग धाडधाड समोर येऊन जातं.

असं काही कुठं पाहिलं की.
खाकी वर्दीतली संवेदनशीलता मा. तेजस्वी यांनी जपली. मनाच्या कोपऱ्यात दडलेली आशा वर्कर्स वर स्वतःलिहिलेली कविता काल त्यानी मांडली.कोरोना काळात एका बाईच्या कामाचं कौतुक दुसऱ्या बाईंना करावं याला म्हणतात काळजातून दाद. याला म्हणतात खरं कौतुक. आणि एवढं सगळं मांडताना…माहेरपण जपतांना… सासरला विसरता येत नाही बाईला कधीच.खाकी वर्दीमागची बाई कशी हळूच डोकावून गेली.

कितीही अफाट यश मिळो. सोबत साथ नवऱ्याची आहे. हे सांगायला काल पोलीस अधीक्षक मा. तेजस्वी विसरल्या नाहीत. एकीकडे खाकीवर्दी तली कडक शिस्त ,कर्तव्य ,जोखीम तर दुसरीकडे बाईपणाची संवेदनशीलता आणि कवि मन हे रेशीम धागे गु़ंफणा-या आणि छोटुकलीची आई म्हणून जबाबदारीने वागणाऱ्या सोलापूरच्या अधीक्षक मा. तेजस्वी सातपुते यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खरंच मनापासून शुभेच्छा.

अंधार सारुन
आता उजाडलय लख्खं!!
बाईंचं जगणं ही!
ती बोलते आता
मौन उघडून..मनातलं.
इतक्या दिवस
दाबलेलं दबलेलं
मनावरचं ओझं..
आता कुठं
हळूहळू…
उतरु लागलय…
©️®️ 🖋️अंजली श्रीवास्तव.७७०९४६४६५३

( राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटना.महिला दक्षता समिती करमाळा.लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आणि वक्ता आहेत.)

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here