कोरोना संकट, सरकार आणि समाज

0

मानवी उत्क्रांती पासून समाज सतत बदलत आहे. आदिमानव, संशोधन, परीवर्तन आणि अत्याधुनिक युगाचे निरीक्षण केले तर केव्हाही निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध होत आहे. मनुष्य प्राणी बुद्धिमान असल्याने गरजपूर्तीसाठी अनेक शोध लागले, बदल झाले मात्र भूकंप, पूर, वादळे आणि दुष्काळ यावर अद्यापही माणसाला पूर्ण विजय मिळविता आला नाही. नाविन्यपूर्ण शोधण्याचा व जगण्याचा हव्यास मनुष्य करीत असताना निसर्गाच्या परिसंस्थेला छेडण्याचा प्रयत्न मनुष्य करीत आहे. जगातील सर्व प्राणिमात्रांची भूक भागविण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे मात्र एक हव्यासी माणसाची इच्छापूर्ती निसर्गाकडून होईलच असे नाही. जंगलाची बेसुमार वृक्षतोड, समुद्रावरील अतिक्रमण, अत्यंत विषारी कीटकनाशकांचा वापर, टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरचा प्रमाणापेक्षा जास्त वापर आणि खाण्यापिण्याच्या निसर्ग नियमांविरुद्धच्या सवयी मानव जातीला अडचणीत आणीत आहेत. बेसुमार वाढती लोकसंख्या, मर्यादित स्वरूपातील साधनसामग्री आणि वापरातील असमतोल यामुळेही लाखो व्यक्ती उपाशी राहत असताना लाखो टन धान्य गोदामांमध्ये सोडून जाते.

हा विरोधाभास शब्दांकित करण्याचे कारण म्हणजे माणसाने स्वार्थासाठी निसर्ग यंत्रणेचा, शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू केला की अनेक संकटे तयार होतात. काही संकटांवर मात करता येते हे मात्र काही संकटे हे संपूर्ण जगाला वेठीस धरतात. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव हे असेच जागतिक संकट सर्वत्र घोंगावत आहे. शरीराच्या पुष्टीसाठी व मनाचे शक्तीसाठी प्राण्यांनी, माणसाने काय खावे, काय खाऊ नये याचे नैसर्गिक संकेत पूर्वीपासूनच आहेत. कोणते प्राणी मांसासाठी योग्य व अयोग्य आहेत याचे संकेत मानवाला आहेत. मात्र चीनमधील वुहान प्रांतातील लोकांनी जंगली गुहांमधील वटवाघळे, अजगर, साप हे प्राणी अर्धेकच्चे खाल्ल्याने कोरोनाचा विषाणू मानवी शरीरात घुसला आणि पुढील सर्व हाहाकार आपणास माहीतच आहे. चीनमध्ये पसरलेला कोरोना नंतर इटली, फ्रान्स, स्पेन, इराण, अमेरिका, पाकिस्तान, भारत या देशांमध्ये पसरला आणि सर्व जगाची झोप उडाली.

कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने नागरिकांचे विलगीकरण व उपचार एवढाच पर्याय शिल्लक राहिला. संपूर्ण जनजीवन ठप्प होत असताना प्रत्येक देशाच्या समोर प्रचंड तणाव निर्माण झाला. प्रशासन, यंत्रणेचे प्रयत्न तोकडे पडू लागल्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण झाले. विलगीकरणासाठी जनतेला सक्तीने घरात बसविणे हे सर्वात कठीण काम सरकारला हाती घ्यावे लागले. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा निर्माण करावी लागली. कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव थांबवणे या एकाच कामासाठी सर्व देश व प्रशासन यंत्रणा आज कार्यरत आहे. समाजचिंतन करताना असे दिसते की मानवी हव्यास हा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. यापूर्वी अनेक आपत्ती आल्या, महायुद्धे झाली मात्र जनतेला सक्तीने घरात बसविण्याचे प्रसंग फार कमी होते. कोरोना संकट टळेलही मात्र यातून मानव काही शिकणार आहे की नाही, हाच खरा चिंतनाचा मुद्दा आहे

किसन भाऊ हासे
संपादक, दैनिक युवावार्ता, संगमनेर

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here