कवियत्री सौ. विद्या जाधव हिचा कोंदण काव्यसंग्रह वाचला नि आपसूकच हे भाव मनातून व्यक्त झाले.

0
कवियत्री सौ. विद्या जाधव हिचा कोंदण काव्यसंग्रह वाचला नि आपसूकच हे भाव मनातून व्यक्त झाले.

कवियत्री सौ. विद्या जाधव हिचा कोंदण काव्यसंग्रह
वाचला नि आपसूकच हे भाव मनातून व्यक्त झाले.

वाढदिवसाची भेट म्हणुन कोंदण” हा काव्यसंग्रह हाती आला नि मला एक निखळ आनंद झाला. निखळ आनंद अशासाठी म्हणाले की, एकेक कविता वाचताना जणू काही माझीच ओळख मला नव्याने होत गेली. कोंदण म्हणजे चाकोरीबद्ध जगण्याचा प्रवास. पण हे कोंदण जणू आपल्या मनाला अलवारपणे कुरवाळते, समज देते बाई ग!..हे असंच आहे बरं!..यातूनच तुला तुझे अस्तित्व निर्माण करून व्यक्तिमत्व खुलवायचे आहे. विद्या ही माझी अगदी जवळची मैत्रीण. विद्या नाव आलं की, नकळतपणे चेहऱ्यावर हसू फुलतं. विशेष म्हणजे आम्ही अजून भेटलो ही नाही पण, का कुणास ठावूक मैत्रीचं हे नातं माझं हक्काचं असं आहे.

“स्त्री” च्या मनाच्या पायघड्या किती संवेदनशील असतात. जाणिवेच्या एका एका पावलात तिला किती अंतर पार करायचे असते. हा प्रवास नक्कीच सोपा नसतो पण, स्त्री ही परमेश्वराने निर्माण केलेली अमूल्य कलाकृती आहे हे विद्याचं वाक्य
मनाला उभारी देऊन जाते.”कोंदण” या काव्य शृंखलेत
“आपलेपणाची ओल” ही कविता थेट वाचकाला त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी अशीच आहे. कौलारू छप्पर, शेणामातीची घरे, तुळस, चूल, आजी, गाय तिचे निरसे दूध, एकच साबणाची वडी, पाहुण्यांची रेलचेल, माणुसकीचा अवीट गोडवा, पण हाच गोडवा आज मात्र कोठेतरी हरवला आहे कारण, “कुणाचा वेळ कुणासाठी कुठे एवढा स्वस्त’..? ही ओळ तेच तर दुखणे सांगत आहे…

कोंदण काव्यसंग्रह वाचून झाल्यावर जास्त अवास्तव, अवाजवी, असे भाव कवियत्रीच्या शब्दांत नाहीच आहे. सगळे भावविश्व जगण्याच्या सचोटीतून षड्रिपुंच्या कसोट्याना छेद देत खंबीरपणे चमकणारा अमूल्य असा हिराच तर आहे. कवियत्रीने आपल्या बऱ्याचशा कवितेतून शेतकऱ्याची जीवनकहाणी शब्दातून अशी पाझरली आहे की, वाचकांचे डोळे ही डबडबल्या शिवाय रहाणार नाहीत. “सुगी” ही कविता अशाच धाटणीची आहे..

यंदाच्या या सुगीत
नाही ऐकली भल्लरी
वृक्षासम ना उभी ठाकली
हिरवीकंच वल्लरी

या ओळी असोत की, “फाळ” ही कविता.

ऋतू आला ऋतू गेला
नाही न्हाली माती
बोहल्यावर चढण्याआधी
लेक गेली सती”

हृदयाचा ठाव घेत हृदयाला पीळ पाडणारे शब्द परिस्थितीचा जणू आरसाच आहेत. रीती कणगी, काळजाच्या ठिकऱ्या, डीवचणारा इचार, वंगाळ वकुत, कंठात दाबला जीव हे शब्द कागदावर उतरायला कवियत्री किती प्रगल्भ विचारांची आहे हेच दिसून येते..आज जी शेतकऱ्याची अवस्था आहे. तो हंबरडा ही पापणीत कसा आटून गेला हे सांगताना खरी गहन परिस्थितीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते हंबरडा या कवितेत.

भुईच्या उदरातील ओलावा पापणीत आटलेला
ओसरला कालचा दिमाख अवघा आज वठलेला

बापाची ही अवस्था लेकीच्या हंबरड्यात कासावीस तर होते…अशातच देवाला हात जोडताना गाऱ्हाणं ही मनाला छेद देऊन जाते

कवियत्री लिहते की,

डबडबणाऱ्या डोळ्यांची
वलाई कोरडया व्हटाला
ढेकर नको बाप्पा
फक्त भाकर दे पोटाला

दुष्काळानं हवालदिल झालेला शेतकरी बाप…
लेकरांच्या घासासाठी कसा शरमिंदा होतो
जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी बाप हा प्रामाणिकपणे काळ्या आईशी इमान राखतो..शेतकरी वर्गाची खरी अवस्था सार्थपणे कवियत्रीने आपल्या शब्दांनी मांडली आहे. “फाटका प्रपंच” ही कविता बाप कसा असतो त्याचे यथार्थ दर्शन होते. फाटका संसार उसवतो तेव्हा त्याला शिवताना बाप आतून कसा उसवतो सांगताना कवितेतील
बा च्या रक्ताचा थेंब पाटापाटात आटला अशा ओळी अस्वस्थ करून टाकतात.
कोंदण कवितांचा आवाका कुटुंब, नाती, प्रेम, जिव्हाळा, भक्ती, गरीबी, देशनिष्ठा, सद्यस्थितीला साकारणारा आहे.

हे सगळं मांडताना कवियत्री परमार्थ कसा साधावा हे ही सुरेख सांगते. ती म्हणते की, नेमाने जोडावा परमार्थ, जाणून त्यागावा स्वार्थ किती सुरेख! परमेश्वरावर निरागस निस्सीम भक्ती सांगताना देवाला ती काही सूनवायला ही कमी करत नाही…हे भक्तीचे रूप. ती पांडुरंगाला सांगतेय

पंढरीच्या पांडुरंगा
कमरेवरचे काढून हात
डोळे उघडून पहा
मानवतेची वाताहत

पायाखालची सोडून वीट काळावर मात कर असे सांगताना वाचकाचे मन ही हात जोडून देवाला नमस्कार करतील. प्रीतीची नाजूक भावना व विरह अलवार मांडताना ही कवियत्री दिसते. कोण? या कवितेत “स्वप्नांची राख झाली, सावडून कोण गेले”
अशा ओळी वाचून विचारांच्या प्रगल्भता किती खोलवर रुजल्यात कवियत्रीच्या मनात ज्या शब्दांतून भाव व्यक्त करायला समर्थ आहेत. पाहुणी, भाऊराया सारख्या कवितेतून मायेची ओल पाझरताना दिसते.

सख्याचे भावविश्व ही किती सहज शब्दांत सांगितले आहे फुलोरा या कवितेतून
“आठविता तव मुखचंद्र, तनुवर उठे शहारा
दे दान आलिंगनाचे, झडू दे यौवन फुलोरा..
हेच सांगत असताना कवियत्रीने पुढे जाऊन मौज जगण्याची या कवितेतून स्रीवर्गाला रोजच्या त्याच त्या संसाराच्या गराड्यातून स्वतःसाठी जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. ही कविता ही मनाला साद घालून जाते.

सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर कवियत्रीच्या कविता सार्थ झुलताना आपला तोल सावरून साकार झालेल्या आहेत.
आईचे दुःख मुलगी आई होऊनच जाणते नि हेच माय या कवितेत वाचायला मिळते. एकंदरीतच कवियत्रीने स्त्रीच्या सम्पूर्ण जीवनावरच स्वतःच्या जगलेल्या क्षणांच्या साथीने कवितांच्या रुपात आपल्याला ९० कवितांचे शाश्वत दान दिलेले आहे.ज्यात
मानवी जीवनात, स्त्रीच्या रूपाचे एक दैदिप्यमान स्वरूप दिसेल, जाणवेल इतकेच काय तर मनाला भावेल ही..ही ताकद कवियत्रीच्या शब्दांत नक्कीच आहे. संवेदना, माया, प्रेम, भक्ती, आसक्ती, व्यथा, इच्छा, मनाचा आक्रोश सर्व भाव कवितेतून मनाला भिडणाऱ्या अशाच सशक्त शब्दांनी कोंदण काव्यसंग्रह सार्थ वाटतो हे अगदी खरे!…

हेमा जाधव©️
९५४५०८२८१७

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here