आईच्या गावात… लेखक : अण्णा धगाटे

0
आईच्या गावात... लेखक : अण्णा धगाटे

आईच्या गावात

आईच्या गावात हे खरोखरीच एक मंगलमय पवित्र संस्कार देणारे मानव जिवनाच्या जडण घडणीचे स्थान होते.मुलाचा जन्म देखील आईच्या माहेरीच होत असे.मुल जन्म येत होते तेच मुळात आईच्या गावात.परंतु आजच्या लोप पावत चाललेल्या संस्काराने आईच्या गावात या शब्दाची, त्याची टिंगल टवाळी माजविली. जात आहे.मानवी जिवनात प्रगती हि निश्चितच झाली पाहीजे.त्याला गती मिळाली पाहीजे.काळच्या ओघात बदलले पाहीजे.

परंतु संस्कार व संस्कृती मुल्य पायदळी तुडवुन त्या पायावर उभी करणारी पिढी घडविणे हे निश्चितच घातक आहे त्याकाळी एवढी आधुनिकता नव्हती.परंतु माणुसपण व मानवता टिकुन होती.रांगडी माणस होती पण बेगडी नव्हती.दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, आईच्या गावात जाण्याची एक पर्वणीच असायची त्याला आम्ही मामाच्या गावाला फार तर आजोळी चाललो असे म्हणायचो.

या मामाच्या गावाला जाणे इतके आनंददायी व महत्वपूर्ण असायचे की,त्याकाळी झुकुझुकु झुकुझुक आगीनगाडी धुराच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहु या! मामाच्या गावाला जाऊ या ! हि बालगीत अबाल वृध्दाच्या तोंडी असायची.मामाचा गाव हा केवळ मामाच्या गाव नव्हता.तर तो जिव्हाळा, बहिण भांवडाच्या नात्यातला बालपणाच्या आठवणी जागविणारा तो एक भाग होता.

आई माहेरी आल्या नंतर तिच्या आई वडीला बरोबर भावाबहिणी बरोबरच्या त्या आठवणी जाग्या करून जिवनाला एक रंगतदार पणा येत होता.लग्न होऊन सासरी आलेल्या आपल्या परिवारासाठी दिवस रात्र राबणाऱ्या स्रिला कधी वाटत नव्हते की ,आपण लग्न झाले. म्हणुन आपल्या आई वडीला पासुन भावंडा पासुन जन्मस्थाना पासुन दुरावलो हि भावना कदापी हि तिच्या मनात येत नव्हती.

मला माझ्या सासरचा जसा जिव्हाळा आहे.तसा माहेरचा आधार हि आहे.माझ्या सुखदुखःचे क्षण मी दोन्ही परिवारात वाटुन घेऊ शकते.तेथे ते ऐकणारे आहेत.म्हणुन स्रियाच्या जिवनात कधी विफलता,नैराश्य,उद्विग्नता येत नव्हती.बहीण भावंडाचे प्रेम तु तुझ्या बालपणापासूनचे या पासुन तुटली गेली आहेस याची कधी हि उणीव होत नव्हती व मायेची जाणीव सतत निर्माण होत होती.काही काळ तरी ती सबला होती.आनंदी असायची.

आज आम्ही,वृध्दत्वाकडे जात असलो तरी आजच्या पिढीपेक्षा बर्‍याच अंशी निरामय आहोत. सक्षम आहोत.कारण.आमची आई मानसिक सक्षमतेकडुन शारीरीक सक्षमतेच जिवनहि जतन करीत होती.वडील केंद्र सरकारच्या नोकरीत होते.त्यामुळे आमचे वास्तव्य पुण्यात होते.ते देखील त्याकाळचे एस.एस सी १९४२ साली पास झालेले होते महिन्याच्या महिन्याला पगार मिळत होता.त्यामुळे त्यांचे राहणीमानावर व शरिराच्या बाह्य सजावटी पेक्षा अंतर्गत प्रकृती कडे लक्ष देत राहणे हे ठरलेल होते.

पगार झाल्याबरोबर येणार्‍या पहिल्या,रविवारी सकाळी सकाळी एरंडेल तेलाचा जुलाब व दुपारी जाऊन कटिंग करणे या शिस्तीमुळे आमची ग्रामिण भागाशी व शिरस्त्याच्या जिवन शैलीशी नाळ तुटलेली नव्हती. त्यामुळे आम्ही सुट्टीच्या दिवसाची वाट आईच्या गावात जाण्यासाठी वाट पाहत होतो.

माझ्या आईचे माहेर हे नासिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातले पांगरी हे गाव त्याकाळी एका गावाची नाळ दुसर्‍या गावाशी नाळ जोडुन ओळख धरून ठेवत होते.त्यामुळे शेजारच्या मोठ्या गावा बरोबर त्या गावाला जोडले जात होते.त्यामुळे वावी-पांगरी असाच उल्लेख सर्वत्र होत होता.
सुट्टीत आईला नेण्यासाठी मुर्‍हाळी म्हणुन मामा येत होता.
पुण्याहून आम्ही सिन्नरच्या स्टॅण्ड उतरत असे कारण पुण्याहून पांगरीला जायला थेट गाडी नव्हती.तर यामुळे सिन्नरला उतरून जावेच लागत होते.

आजच्या सारखे पिझा वडापाव असे काही नव्हते.तर भेळ फार तर भजी जिलेबी हे असायचे गावाकडे जायचे म्हणजे गावाकडच्यासाठी देखील गोडधोड खायला व आम्हाला देखील चार दोन दिवस पुरेल एवढा खाऊ जवळच्या हलवायाकडे जाऊन मामा आणायचे हलवायाची दुकाने पावलो पावली असायची आजच्या सारखी भेसळयुक्त पदार्थाची उपलब्धता नव्हती.भेळभत्ता गोडीशेव रेवड्या हे असायचेच मग पगाराने भरलेला खिसा असो आठवडी बाजार असो किवा अन्य कोणत्याही गावाकडे आले असताना हि नात्याची गोडधोड रेलचेल असायचीच

गावामधुन देव नदी वाहत होती. त्यामुळे गावाचे दोन भाग जरी पडले होते.तरी आजच्या सारखे स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे असे त्या काळी घडत नव्हते तर गावाशी जोडलेली नाळ तशीच राहत होती अगदी सयामी जुळ्या सारखी माझ्या मामच गाव हे मोठे असल्यामुळे त्याला बुद्रुक व पलीकडचे गाव हे छोटे असल्यामुळे त्याला खुर्द असे म्हणायचे असे हे पांगरी खुर्द व बुद्रुक असे होते.

गावातुन पावसाळी हंगामात वाहणारी नदी व पुढे वाहता प्रवाह बंद होणारी तरी देखील माणसाचे जिवन तारता येईल एवढा पाण्याचा साठा तिच्या गर्भात असायचा गर्भात यासाठी म्हणत होतो की, वरकरणी पाहता कोणालाहि वाटेल येथे वाळूच वाळू आहे.परंतु तिच्या उदराला हात घातला की, तिच्या पोटात मायेचे झरेच झरे माणसाच्या जिवनाशी जोडलेले असायचे

सकाळच्या प्रहारी आख्खा गाव त्या नदी पात्रात असायचा कोणी बैलगाडीत टिपाड घेऊन यायचे, तर कोणी कावडी घेऊन यायचे त्या नदी पात्रात वरवरची वाळु दुर करायची फार मोठी दुर करावी लागत नव्हती फार तर फुट दिड फुटाचा खोल खड्यातली वाळु दुर केली की, पाणीच पाणी दिवसभर कुटुंबाच भागेल एवढ पाणी वाहायचे दारात दोन रांजण होते.घरातले मडके हंडे घंगाळे भरून ठेवले जायचे. रांजणा भोवती बांधकाम केले होते.

सकाळी सकाळी न्याहरी असायची सिन्नर तालुक्याच महत्वाच पीक म्हणजे बाजरी, करडई त्यामुळे बाजरीची भाकरी करडई तेल याची रेचचेल असायची.आईचे वडील हे नामवंत घोड्याचे व्यापारी होते.व्यापारी व हेडे यात मोठा फरक असतो.हेडे हे दलालीवर व्यापार करीत असतात तर व्यापारी हे घोडे खरेदी करुन ते सांभाळून विकत असतात. त्यातले व्यापारी होते.

जवळ पास चाळीस पन्नास जणाचा हा परिवार होता.सारेच जवळच्या नात्यातले घोड्याच्या जोडीला घरच्या दुधदुभत्या एवढी गाय व म्हैस तशाच चार दोन
बकऱ्या होत्या.त्यामुळे शिळी ताजी भाकरी दुधात कुस्करून खाल्ली जायची,खरे तर चुरून खाणे,आजच्या प्रथेत अशोभनिय व रानटीपणाणाचे मानतात.परंतु शास्रीय दुष्टीकोनातुन ते योग्य होते.कारण मुलताच अन्नाचे बारीक बारीक कण आधीच होत होते.त्यामुळे उत्तम प्रकारे चर्वण होत होते व पचन क्रिया उत्तम राखली जात होती.

अशी ती न्याहरी आजच्या सारखी ती अंथुरूणात पडुन राहण्याची ती वेळ नसायची ती न्याहरी करून रानावनात खेळण्या बागडण्याची वेळ होती.आईचे वडील हे घोड्याचे व्यापारी होते. त्यामुळे राहणीमान सुसंस्कृत टापटिपीचे होते दोन्ही मामा, शिक्षक होते.त्यामुळे गावगाड्यात जातीयतेच्या ज्या झळा बसतात त्या कधीच बसल्याच नाही रामभाऊ पेखळे,पगार हे मराठा परीवारातले तसेच बुढणभाई डाॅ इरफान हा मामाचा मित्र परिवाराचा गोतावळा त्यामुळे जातीभेद धर्म भेद नव्हते.

सोनोपंत दांडेकराचे मामा शिष्य ते देखील ह भ प. होते.विशेष म्हणजे मध्ये पंचाळे गावाकडे जाणारी वाट सोडली तर समोरच्या महादेवाची मुर्ती भव्य अशा मंदिरातील दारात उभी राहुन देखील दिसत होती.समोरच एक जुन्या चुन्याच्या घाणीचे दगडी चाक होते.त्यावर किवा एक चौकोनी बारव होती.त्याच्या कड्यावर उगाच जाऊन बसायचो कारण का,येथे येऊन बसतो हे कळत नव्हते.केवळ गम्मत म्हणुन

त्यानंतर उन्ह तापायला लागली की समोरच्या लिंबाखाली किवा गावातुन वावीकडे जाणार्‍या व हम रस्त्याच्या बेचकाळ्यात आमचेच खळे होते.खळ्याच्या चोहोबाजूला झाडे होते.तेत जाऊन बसायचो परंतु वडीलधारी
माणस सहसा खळ्यात जाऊ देत नव्हते कारण बाजरीच्या बणग्याने खाज सुटेल किवा कडब्यात वळईत एखाद किडुक असायचे हि भिती होती. एखादी दुसरी सतरंजी असायची ती हि मामाने कोठे शाळेची ट्रेनिंग शिबिर असताना वळकटी करून नेण्यासाठी घेतलेली.

बारदान,गोधड्या या मुबलक त्या घेऊन झाडाखाली बसायचो आम्ही सख्ये भावंड,मावस भावंड झालेच मावश्या आई सर्वात थोरली असल्यामुळे चुलत आईच्या भावकीतल्या मामा मावश्या या माझ्यापेक्षा लहान होत्या.झाडाखाली बैठे खेळ असायचे,काही झोपा काढत होते

मध्येच कोणी तरी भेळभत्ता खायला घेऊन.यायचे त्यानंतर दुपारचे जेवण मुग,मटकी,चवळी हुलगे हुलग्याचे पदार्थ कुळीदाचे शेंगुळे,पुरणाचे मांडे त्याकाळची रेसीपी आजच्या संजिव कपुराला यांना हि शोध घ्यायला लावेल असे पदार्थ बनविले जायचे डाळीचे कोंबड आळण मोठ मोठ्या मडक्यात भरून ठेवलेले लोणचे याची रेलचेल होती.

वावीच्या बाजारात आम्ही गेलो की, मामा कधी खांद्यावर घेत होते तर कधी घोड्यावर बसवत होते. खरे तर ते आईचे चुलत भाऊ होते.पण सख्खे चुलत हे नाते कधी नव्हते तर एकाच परिवारातील एकता त्यात होती केवळ आईचे भाऊ म्हणुन
वावीच्या आठवडी बाजारातुन आणलेला भाजी पाला वांगे बटाटे
तर कधी शेजारच्या शेतातुन आणलेला भाजीपाला तो आणायला आवडा आजी हि भक्कम होती ती आईची चुलती पण चुलत भावकीच हे नात नव्हतच एकसंघ जिव्हाळा होता. आवडा आजीची धिप्पाड शरीरयष्टी, भारदस्त व्यक्तीमत्व हे सार जबरदस्त होते.तिच्या पुढे वस्तीतलेच काय गावातले देखील भले भले झुकत होते.

पाच साडेपाचच्या दरम्यान मामा शेजारच्या गावी असणार्‍यां शाळेतुन यायचे त्यांच्या जवळ सायकल होती.ती घ्यायची सायकल झेपता आली म्हणजे झाले.मधल्या नळीच्या त्रिकोणाततुन पलीकडच्या पायडलवर पाय मारून सायकल चालविणे कधी वाऱ्या च्या तर उताराच्या दिशेने केवळ पायडल पाय ठेवुन सायकल पळताना आनंद होत होता.तर उलट दिशेन कधी चढ तर कधी वारा यामुळे दमझाक व्हायची पण आपल्याला सायकल चालवता येते हा आनंद व्हायचा.

मामा मावश्या यांना झालेल्या मुलात सर्वात मोठा मी असल्यामुळे कोडकौतुकाचा पहिला मान माझाच असायचा. सुर्य अस्ताला जातो कुठे आणि दिवाबत्ती होऊन काही वेळ जाताच जेवणाची तयारी असायची आवडनिवड नव्हती.सरसकट सर्वासाठी एकच भात त्या भागात दुर्मिळ.होता. सणावाराला किवा पुरणपोळी बरोबर सारभात खायची मजा काही वेगळीच असायची लहान मुलाच्या पंगती बसायच्या एक ताटात दोघे पण बसायचे

रात्रीच्या.जेवणाची हि सारी तयारी असायची.त्यात आवडा आजी महान खेत्री शेतावरून येता येत वस्तीच्या जवळपासच एखाद कोंबड सहज धरायची.मग काय रातच्याला भारीच बेत असायचा घरोघरी कोंबड्या या मुबलक पाळलेल्या असल्यामुळे कधी काही बोभाटा होत नसायचा, चुकुन एखाद्या वेळी झालाच.तर व शोधत शोधत करीत कोणी आलेच तर आवडा आजीला आधी विचारायचे.खरे तर चौकस दरारा असणारी म्हणुन तिच्यावर संशय कधी घेतले जात नव्हता.

आवडा काकु आमचा कोंबडा पाहिला का? तशी आवडा आजी अती जिव्हाळ्यान सांगायची नाही र बाबा अन केवढा होता कसा गेला कधी गेला.एवढा जीव लावुन कोंबडे पाळावे अन ते असे जावे कनवळा बोलण्याची ढब पट्टीच्या अभिनेत्याहि लाजविल अशी असायची माझा कोंबडा कोणी मारीयला अस म्हणणार्‍याचा अन आवडा आजीने मारलेला कोंबडा एकच का? याची खात्री करून घ्यायची व वर त्याला म्हणायची.

अर वांग्याची शाखभाजी केली नातवासाठी घेऊन जातो का थोडी? म्हणायची तो नाहीच म्हणायचा,तशी ती म्हणायची अरे थोडीच केली नातवा पुरती
तर आवडा आजी हा कालवणाचा सुटलेला घमघमाटाच्या वासाने त्याच्या मनातली शंका पण दुर करून टाकायची व दुसरे दिवस डोक्या पाया सहीत असणार पोस्ट मार्टम केलल कोंबड्याच पार्थिव वळपास टाकुन त्याला दाखवुन द्यायची हंबरडा फोडायचेच बाकी राहायचे.

हे.बघ कुत्र्या मांजरान खाऊन टाकल असल.आवडा आजी पाप मुक्त होत असे.वाल्या कोळ्याने जसे हत्या करून रांजण भरले होते.तसे आवडा आजीन कोंबडे मारून रांजण भरले.होते असे म्हटले तरी.ते वावगे ठरणारे नव्हते.

चापुन चोपुन जेवण झाले की काही वेळ गाणे गायचे तर मध्येच एखादा अभंग.मामा म्हणायचा वारकरी सांप्रदायिक वातावरण. होत रात्री गोधड्या घेऊन घराच्या धाब्यावर झोपायला जायचो.कमी पावसाचा दुष्काळी तालुका त्यामुळे बहुतेक घर हि धाब्याची होती.काही.ठिकाणी त्याला माळवदाची म्हणतात.

किरळाच्या लाकडाचा सांगाडा करून वर मातीच्या थर टाकुन केलेले स्लॅबचे घर हा.आजच्या भाषेतला साधा सुटसुटीत सोफा अर्थ अशा माळवदावर झोपयचे झोपेतुन उठवायला सुर्य नारायण येत असे उन्हाची तिरिप
डोळ्यावर पडली की,आपोआप जाग येत होती.कधी शिडी लावुन. तर कधी उड्या टाकुन खाली उतरत होतो.सुट्टी कधी संपायची हे कळत नव्हते.

परतीच्या प्रवासाला मामा आईसाठी व आमच्या साठी कपडे आणायचा त्यावेळचे कपडे म्हणजे याला हे त्याला ते असे व्हारायटी नव्हते.तर सरळ एक पांढऱ्या ताग्यातला अन खाकी ताग्यातला कपडाआणायचा.टेलर पुढे उभे करायचे,चार दोन दिवसात पोषाख शिवुन तयार. त्यावेळी खाकी प्याॅट अन पांढरा सदरा तोच साजरा दिवाळी दसरा अन शाळेतला पोषाख कधी तरी रंगीत कपडे पण असायचे तयार शिवलेले.

गावातल्या मोटार आड्यावर यायच शेजारच्या पान टपरी वाल्याला नाहीतर आसपास बसलेल्या प्रवाश्याला अमुक अमुक गाडी गेली का?विचारायचे तो पर्यत सख्ये चुलत मामा गोंजारायचे कोणी रूपया दोन रूपये खिश्यात कोंबायचे आजी आजोबा डोक्यावरून हात फिरवित सुट्टी लागल्या बरोबर या बर का, म्हणत आधीच बोलावुन मोकळे होत होते.

नाही म्हटल तरी आईला माहेर सोडताना डोळ्यात पाणी यायचे मामा सहज.म्हणायच गंगा जमुना डोळ्यात उभ्या का? नाय तर अशी चार आठ दिस थांब तुझ्या डोळ्याच्या धाराने आमची देव नदी तरी भरेल सारेच हसायचे.देव नदी खरोखरच देव नदी होती खरे तर आज हि सर्व नद्या देव नद्या आहेत.परंतु आम्ही.तिच्या उदरात मायेचा ओलावा ठेवलाच नाही देव नदीच्या शरिरावर वाळचा थर असायचा अशी वाळू कोणत्याच नदीत ठेवत नाही.हि वाळु किती काढावी,कधी काढावी,याच भानच आज आम्ही ठेवत नाही.उलट.पक्षी आम्ही त्या नदीशी कृतघ्न होऊन अनेक वाळु माफीया पोसु लागलो.

एखादी बस दिसताच एकसाथ सारे उभे राहुन हात करायचे. आज तशी परिस्थिती नाही. नासिक- शिर्डी हायवेवरच हे गाव.प्रगत झाले आहे.गाड्याची वर्दळच वर्दळ नासिकला वडीलाचे वडील,चुलते राहायचे सुट्टी संपायला वेळ असला तर नासिकला जात होतो.नाही तर सिन्नरच्या स्टॅण्ड वरून पुण्याकडे कधी कसे मजेत गेले ते सुट्टीतले दिवस आईच्या गावात या दिवसाचे कुतुहल मित्राना सांगत होतो.

मित्र हि आम्हाला त्याच्या आईच्या गावात कशा केल्या गमती जमती हे सांगत होते.घरोघरी हाच अलिखीत शिरस्ता होता.सुट्या लागल्या कि सुट्या घालवायच्या त्या आईच्या गावात पण आज याच आईच्या गावाची होत असणारी टवाळकी ऐकुन मन उद्विग्न होते.आम्ही नात्या गोत्या पासुन दुरावत चाललो आहे.आई हे किती पवित्र नात आहे. आई हे शब्द आहेत.परंतु त्याच पण आजच्या पिढीने भरित करून टाकल.आईला मम्मी माॅम म्हणु लागले.

पण या मम्मीला तिचे बालपण घरदार सोडुन आल्यावर आपल्या मनाच्या संवेदना मोकळ्या करायला आस्थेन जाऊन राहायला जिव्हाळ्याचे माहेर ठेवले.का ? उलट आम्ही त्याची टवाळकी करीत आहोत.एवढेच काय प्रत्येक शब्दात आयला हे बिभत्सक बोलत असतो. एवढच काय आयला पोरगी मस्त मस्त म्हणत नाचतो.

मला तर हे ऐकतो तेव्हा वाटते की , केवळ आईला पोरगी मस्त मस्त म्हणत आम्ही त्या पोरीला घेऊन आई या भावनेलाच पाय दळी तुटवित आहेत. संस्कार व संस्कृती देखील पायदळी तुडवतो त्यात आई तिचे माहेर संसाराचा गडा ओढताना माहेरला जाऊन क्षणभराचा मिळणारा विसाव्याची देखील राखरांगोळी करून ती अंगाला फासुन.पिकनीक समर व्हेकेशन विन्टर व्हेकेशन टुर नावाचे बेगडी जिवन जगत आहोत. कारण विसरून गेलो.ते दिवस.जे सुट्टीतले होते आनंदाने जे उपभोगत होतो.आईच्या. गावात…
आण्णा

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here