अशक्त मन : आजाराचे कारण

0
अशक्त मन : आजाराचे कारण

अशक्त मन : आजाराचे कारण

यदी खिचडी बर्तन में पके तो
बिमार को ठिक कर देती है,
और यदी दिमाग में पके तो
इन्सान को बिमार कर देती है।

माणूस आहे आणि त्याला कोणताच आजार नाही, असे आता दुर्मिळ झाले आहे. काही आजार जन्मापासून मिळतात. मात्र बहुतांश आजार हे आपल्या आचार, आहार व विचारांपासून अर्थात दिनचर्या, प्रकृतीचे नियम न पाळणे, योग्य आहार न घेणे, वैचारिक व मानसिक प्रदूषण ठेवणे याने होतात. आजही अनेक आजारांना वैद्यकीय शास्त्रात औषध उपलब्ध नाही. मात्र आचार, आहार व विचाराने ते आजार जातात, अशी उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे शारीरिक व्याधींपेक्षा मानसिक आजार जास्त हानीकारक असतात. तर मानसिक आजार योग्य विचाराने दूर केल्या जाऊ शकतात. तसेच अनेक शारीरिक व्याधींवरही चांगली सकारात्मक मानसिकता आणि सशक्त मनाने मात करता येते.

दैनंदिन जीवनात खूप समस्या आहेत. अनेक जबाबदा-या आहेत. त्यामुळेच खूप ताण-तणाव आहेत. नेहमी दाखविण्याची वेगळी व प्रत्यक्ष आतून राहण्याची वेगळी अशी दुटप्पी भूमिकाही करावी लागते. प्रामाणिकपणाने जगणे कठीण आहे. भाऊबंदकीचा खूप त्रास आहे, स्वार्थ सर्वत्र पसरलेला आहे, प्रत्येक बाबतीत स्पर्धा आहे, अशी शेकडो कारणे दैनंदिन जीवनात आहेत तेव्हा चांगले सकारात्मक सशक्त मन, शुध्द आहार व विचार आणि चांगली मानसिकता कशी येणार? हा प्रश्न नेहमी उपस्थित केल्या जातो. काही अंशी हे बरोबर असले तरी हेच गृहीत धरून चालणे स्वत:च्या, कुटुंबियांच्या व सामाजिक हिताचे नाही, या प्रकाराने माणूस आजारी पडतो व दु:ख आकर्षित करून घेत असतो. या अविचारी विचारांनी असेच संस्कार आपण सर्वत्र रूजवित आहोत, परिणामी खूप भौतिक प्रगती करूनही खरे सुख प्राप्त होत नाही तर जगात कुणीच सुखी नाही, असे सांगून यावर पडदा टाकत आहोत.

प्रत्यक्षात सुख ही कल्पना वाटत असली तरी त्याचे प्राप्तीसाठी सशक्त मन, चांगली मानसिकता, सुदृढ शरीर, सकारात्मक विचार, अपरिग्रह (संग्रह न करण्याची वृत्ती), समाधानी वृत्ती आदी मार्ग आहेत. तर या मार्गावर जाण्यासाठी ख-या अर्थाने आध्यात्मिकता (कर्मकांड नव्हे) व योगशक्ती (ध्यान धारणा) मदत करते, हे सिध्द झालेले आहे. तर याचे मदतीनेच अनेक आजारांवर आणि मानसिक प्रदूषणावर मात करता येते, शरीर (तन), मन व धनही शुध्द करता येते, असे अध्यात्म सांगते. मात्र याचा अर्थ सुरूवातीला खूप चुकीचे करावे आणि नंतर अध्यात्माकडे वळून सर्व शुध्द करून घ्यावे, असे होत नाही. उलट चुकीच्या कर्माची फळे आपण कसे भोगत आहोत, याची जाणीव होते आणि राहणे, बोलणे व वागणे यात अध्यात्माने व योगशक्तीने सकारात्मकता येते, यामुळे माणूस दुरूस्त होतो, शांत व संयमी होतो, आजार व व्याधी दुरूस्त होतात, अशीही पध्दत आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात आध्यात्मिक अधिष्ठान असावे, वैचारिक बैठक असावी, असे म्हटल्या जाते.

एकूणच मानसिक प्रदूषणाचे नियंत्रण आवश्यक असून यामुळेच जगाला चांगले जीवन मिळू शकते. हे नियंत्रण आंतरिक प्रकृतीतून आले पाहिजे तेव्हाच बाह्य प्रकृतीत शांतता, शितलता होवू शकेल. ब्रह्माकुमारीजचे ‘राजयोग’ मेडिटेशन हे या दिशेने एक पाऊल म्हणता येईल. दुसरीकडे सर्व संत, महात्मे, धर्मगुरू पण हेच सांगत आहेत. अनेकांचा तर ‘ओम’ या शब्दाच्या उच्चारावर अभ्यास आहे. ‘ओम’चे लयबध्द उच्चारण हे वातावरणाला शुध्द बनवून आपणास आंतरिक प्रकृती बदलण्यासाठी प्रेरणा देते, त्यामुळे आंतरिक प्रकृती शांत व शितल होते, असे सूत्र मांडण्यात आले असून या सुत्राचा वापर मानसिक प्रदूषणाच्या या काळात वाढला आहे.

अखेर मानवी जीवनाला आवश्यक हवा, पाणी, शुध्द विचार आदी सर्व नि:शुल्क आहेत. मात्र अनेक अनावश्यक बाबींसाठी आपले मानसिक प्रदूषण व अशक्त मन कार्य करते आणि आपण यामुळे अनेक आजार ओढवून घेत आहोत, तेव्हा मन सशक्त करण्यासाठी ‘अभ्यास’ हा खूप महत्वाचा असून सकारात्मक विचाराने, त्यागाच्या वृत्तीने, आध्यात्मिकतेने ते साध्य होते. सध्याच्या अनेक आजारांवरील औषधी हीच इतर आजारांची कारणे झाली आहेत. तेव्हा मनाने व मानसिकतेने अशक्त होवू नका, असा सल्ला अनेक विचारवंत देत आहेत.
शेवटी परिश्रमपूर्वक स्वत:ला बदलून घेणे गरजेचे आहे, तर या आशयाचा एक शेर आठवतो….
वक्त के अनुसार सिर्फ आदत बदल ली मैने,
वरना बुरे कल भी नहीं थे, अच्छे आज भी नही है.

    - - - राजेश राजोरे

खामगाव, जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here