अंतरीचे बोल बालदिन

0
अंतरीचे बोल बालदिन

अंतरीचे बोल बालदिन

दरवर्षी भारतामध्ये 14 नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. नेहरूंना मुले चाच्या म्हणत असत. त्यांना मुले आणि फुले फार प्रिय होती म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून देशांमध्ये साजरा केला जातो. मुले त्यांना आवडीने चाच्या म्हणायची यावर्षी हा बालदिन अगदी दिवाळीच्या दिवशी येतोय म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग! खरंतर शाळांना सुट्टी असेल आणि तसेही आत्ता covid-19 मुळे ऑनलाईन शाळेत सुरू होत्या त्यामुळे एकत्रितपणे बालदिन साजरा करता येणे थोडं अवघड होतं .पण ऑनलाईन पद्धतीने ते साजरे केले जाणार होते. आत्ताही दिवाळीची सुट्टी आहे आणि दिवाळीच्या दिवशी बालदिन आला आहे त्यामुळे तो ऑनलाइन साजरा होणार पण असं असलं तरी या बाल दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे मुलं ही देवाघरची फुले असतात, निरागस असतात,

आपण त्यांना जसं घडवू तशी ती घडत असतात, वळत असतात ,शिकत असतात ,अगदी सगळं काही, चांगल्या गोष्टी पासून वाईट गोष्टी पर्यंत.. मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा तसा तो आकार बदलत जातो अगदी मुलांचे ही तसेच आहे आपण जसा आकार देऊ तशी ती घडतात. एक गोष्टीचा अगदी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे आपल्या मुलांवर संस्कार करत असताना आपणच मुलगा-मुलगी असा भेदभाव करत असतो आणि हे आपली मुलं निरखत असतात, अनुभवत असतात आणि त्यातूनच पुढे विषमता निर्माण होते ,या विषमतेला खतपाणी आपणच घालत असतो ,पण ती गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही प्रत्येक घरांमध्ये अगदी कमी जास्त प्रमाणात हा फरक केला जातो, आजही आपण अगदी एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी उंच भरारी घेतलेली आहे ,

समाजामध्ये वावरत आहेत सावित्रीच्या लेकी म्हणून मिरवत आहेत ,जिजाऊंच्या लेकी म्हणून वावरत आहेत… तरीही मुलगी म्हणून उपेक्षित आहेत हे टाळता येणार नाही. त्यामुळे यावर्षीचा बालक दिन साजरा करताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे मुलगा-मुलगी हा फरक नसावा दोन्ही आपलीच लेकरं असतात, पण मुलाचे लाड जरा जास्तच होतात कारण तो वंशाचा दिवा..पण दिवाळीमध्ये तर आपण असंख्य पणत्या प्रज्वलित करत असतो आणि ती पणती म्हणजे मुलगी असते, अगदी शांतपणे तेवणारी, सभोवतालचा अंधार नाहीसा करणारी, एक तेजोवलय निर्माण करणारी आणि त्या तेजोवलयामध्ये दैदिप्यमान यश मिळवणारी, स्वतःचा ठसा उमटवणारी, जगाला तत्वज्ञान सांगणारी ,घर कुटुंब सावरणारी.. सांभाळणारी ,आई बाबांची लाडकी लेक, भावाची लाडकी बहीण..

दीर-नंणदाची वहिनी इतकच नव्हे तर सासरची सुनबाई ही सगळी नाती ती अगदी पणती बनून निभावत असते इतकेच नव्हे तर अगदी ब्लॉक झालेल्या मनांमध्ये जिव्हाळ्याची आपुलकीची ज्योत ती तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि वृद्धाश्रमाच्या वाटेवर असणाऱ्या आई-बाबांसाठी ती आधाराची काठी बनते .कुठे कमी पडते ती? मग का तिला कमी लेखलं जातं ?का तिच्यावर वारंवार अन्याय होतात? का दुजाभाव केला जातो, खरंच मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते, रूणू जूणू पैजणंlच्या निनादात ती माहेरच्या अंगणात वाढते आणि सासरच्या प्रांगणात सुखावते, स्वतःचे आई-वडील, भाऊ बहीण सर्वांना सोडून ती सासरी जाते एका अनोळखी व्यक्तीचा हात धरून, एका अनोळखी घरात आणि ती स्वतःच अस्तित्व निर्माण करते, स्वतःचं माहेर विसरून सासरं जपण्याचा आटोकाट प्रयत्न करते, निर्माण झालेली नवीन नाती जपण्याचा प्रयत्न करते,ती नाती निभावते ,मग अशा मुलीच्या बाबतीत दुजाभाव का करावा ?

अगदी बालदिन साजरा करत असताना शाळेमध्ये तर हा भेदभाव कधीच करत नाहीत, पण घराघरात हा भेदभाव होतो, जरी आम्ही करत नसलो तरी बऱ्याच ठिकाणी हे ऐकायला मिळतं व ती मुलगी आहे म्हणून मराठी मिडीयम च्या शाळेमध्ये , प्रत्येक गोष्टींमध्ये दुजाभाव केला जातो.. हे कुठेतरी थांबायला हवं ,या क्षणाची गरज आहे, या काळाची गरज आहे दिवाळीला आपण प्रज्वलित करणाऱ्या पणत्या म्हणजेच मुलीचा प्रतीक आहे आणि या मुलींना आपण जपलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे या क्षणाची ती गरज आहे काळाची गरज आहे कारण मुलगी आत्ता सज्ञान होतीय, सजग होती आहे हे सगळ्यात महत्त्वाचा आहे ,सर्वगुणसंपन्न आणि विद्वान तर ती पहिल्यापासून आहेच पण आता ती सबला होतीय, कराटे प्रशिक्षण घेत आहे,सायकल शिकते आहे तायकोंडो शिकते आहे स्वतःचं संरक्षण करण्यास समर्थ आहे स्वतःची मतं परखडपणे मांडत आहे आणि स्वत:चं अस्तित्व ती जपत आहे,

सारे संस्कार जपून आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे, अगदी
स्वतःचं अस्तित्व जपत आहे अशा ह्या बालिकेला ,युवतीला, स्त्रीला तिच्या अगदी बालपणातच बालक दिनाच्या शुभेच्छा तर देऊयात ,पण तिच्या भावी आयुष्यासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी आपणही प्रयत्न करूया ,बालदिन तर आहेच सर्व बालकांचा कौतुक होणारच आहे, व्हायलाच पाहिजे.. कारण हीच मुलं आपल्या देशाचे उद्याचे नागरिक आहेत, हे या देशाचे उज्ज्वल भवितव्य आहेत ..भारताचे शिल्पकार आहेत, त्यांना घडवताना त्यांच्यावर संस्कार करताना, आपणही थोडं वास्तवाचं भान ठेवूया आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ,डिजिटल बालक दिन साजरा करुया ..

सरकारचे नियम पाळू या, गर्दीमध्ये जास्त न मिसळता बालकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एकत्र न बोलवता ऑनलाईनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवूया ,उपक्रम राबवूया त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करूया, खरंच मुलं म्हणजे देवाघरची फुलं ..या फुलांना जपलं पाहिजे, तर त्या फुलांना मातीचा सुगंध येतो यात शंका नाही आणि तो सुगंध कीर्ती म्हणून चहूकडे दरवळतो हेही सत्य आहे अशाच बालक दिनी सर्व बालकांना बालदिनाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!

डॉ शीतल शिवराज मालूसरे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here